मधू य. ना. गावकर
बोरी ओहोळाचा प्रवास संपवून शिरोडा गावच्या तरवळे ओहोळाच्या काठाकडे जाण्यासाठी माझी पावले मार्गस्थ झाली. जुवारीच्या तटाकडील विशाल शेती, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना थंडावा देते. शेतीच्या अंगावर साळूचे दाणे पिकून ते मानव, पशू, पक्षी यांना पोट भरण्यासाठी भांडारभर धान्य आपला निसर्ग दान देत आहे.
शेतीच्या (Agriculture) खालच्या भागात नदी काठी दाट कांदळवनात उडणाऱ्या पक्ष्यांना आश्रय देत, वाऱ्याच्या झुळकेत पानांचा आवाज देत, पक्षांच्या स्वरात वारा आपला स्वर मिसळून सकाळ संध्याकाळ पावा वाजवत, भूपाळी म्हणत प्रकाश देणाऱ्या सूर्याची आराधना करतात. त्या आराधनेला सूर्य प्रसन्न होऊन आपले लाल प्रतिबिंब जुवारीच्या निळ्या पाण्यात दाखवतो. त्या प्रतिबिंबाला गिळण्यास बांधावरील मगरी पाण्यात सूर मारून धावतात आणि गोफ, वालगडी खेळणारे मासे त्या मगरींच्या घशात जातात. हे निसर्गचित्र दररोज पाहत पाहत त्या बांधावरील मानशीच्या मुखातून वाहणारा गोडे पाणी असलेला तरवळ्याचा ओहळ त्या जागी विरघळत संपलेल्या मासळीच्या पुनर्जन्म देण्याचे काम करतो. निसर्गाचा हा सोहळा अनुभवत ओहोळाच्या मुखाकडे पाहून माझा खालून वरच्या दिशेने, उगमाकडे प्रवास सुरू झाला.
थोडीफार पिकणारी भातशेती, शेतजमिनीत पडलेले मँगनीज, पडीक असलेला शेतीचा परिसर मी पाहत होतो. आमच्या पूर्वजांनी एका समान विचारातून मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी समान पद्धतीने एकत्र राहून गावातून वाहणारे ओहळ स्वच्छ ठेवले. शेती, बागायती आणि पिण्यासाठी पाण्याचे धन राखले होते. त्यांच्या आयुष्यात प्रगतीचे कोवळे कोंब उगवून त्यांना जगण्यास सकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या किरणांची दिशा मिळाली होती. त्यातून वाटचाल करताना कितीतरी संकटांना त्यांना सामोरे जावे लागले असेल! काम केलेल्या कष्टात प्रेरणेचा ध्यास होता, त्यांच्या कामात आत्मगौरव करण्याची वृत्ती नव्हती.
ओहोळाच्या परिसरात राहणाऱ्या गरीब पूर्वजांनी आनंदाने कुदळीने काम करून कुळागरे, बागायती निर्माण केल्या. शेणखताने वाढवून भात आणि वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाजीपाला पिकवून ओहोळाच्या शुद्ध पाण्यात अन्न शिजवून खात होते. वाहणाऱ्या ओहोळाचा परिसर देवळासारखा पवित्र, शुद्ध ठेवला. सुपारी, आंबा, फणस, नारळ, ओटम, आंबाडा, शेवगा, जायफळ, निरफणस, मिरी, बिंबल, करमल, सुरण, केळ, कावळ्यामिर्ची, तोरींग यांचे पीक घेतले. उगमाकडील भागात असलेल्या जांभूळ, आवळा, मारट, किंदळ, कणकी, बांबू, मोय, रिठा, जंगम, बकुळी, चार, नाणा, किंदळ, शिरस अशा झाडांची फळे पक्ष्यांनी खाऊन त्याच झाडांवर घरटी करून ते राहिले. वटवाघूळ, वानर, गवा, शेक्रू, कावळा, मेरू या जनावरांनी त्या झाडांची फळे, पाचोळा खाऊन त्यांनी वृक्षांच्या बियांची पेरणी केली, वनस्पती झाडे वाढवण्यास मदत केली.
ओहोळाच्या उगमाकडील भागातील जंगलाची राखण करण्यास बिबटा, अस्वल, डुक्कर, नागसर्प, भुजंग, मांडोळ तिथे वास्तव्यास राहिले. हे सारे काम प्रत्येक प्राण्याला वाटून देणारा ओहळ आणि त्याच्या पाण्यावर वाढलेली वसुंधरा हाच खरा देव हे जाणून आमचे पूर्वज नतमस्तक झाले. कुदळ, पिकास, कल्ले, नांगर, लाठ, कोयता, कुर्हाड चालवण्याआधी किंवा अगदी आपला पायही जमिनीवर ठेवण्याआधी मान वाकवून ‘विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे’ अशी तिची क्षमा मागितली. खणण्याआधी परवानगी मागितली. अहोरात्र काम करीत घाम गाळून या भूमीची सेवा करून न शिकलेल्या पूर्वजांनी पर्यावरण सांभाळले होते. या लेखमालेत लिहिलेल्या ओहोळांचे लांबलचक वर्णन वाचताना व तिथून प्रत्यक्ष फिरताना हिरवीगार वनराई पाहून पूर्वजांच्या विचारांना आणि कामाला मुजरा करावा.
शिरोडा गावच्या तरवळे भागात पोहोचताच आठवण होते ती भात बियाण्यांची. पोर्तुगीज काळात वाहनांची कमतरता होती. पणजी-फोंडा-सावर्डे रस्ता लाल मातीचा होता. त्या रस्त्यावरून ट्रकासारखे रूप असलेल्या ‘कार्रेत’ (बस) होत्या. या बसेसना पितळीच्या पत्र्याने मढवायचे. त्या दिवसाला एक दोन खेपा सावर्डे ते पणजीला मारायच्या. त्या ‘कार्रेती’वर आमच्या भागातील म्हणजे भोम, अडकोण, तिवरे, वरगाव, खांडोळा, बेतकी गावांचे शेतकरी लोक बाणास्तारीला गाडी पकडून वरवळे, शिरोडा, पंचवाडी गावांतील शिट्टा भात बियाणे आणायला जात असत. त्याची पेरणी आमच्या परिसरात वायंगण शेतीत करत. वायंगण पिकल्यावर ते भात-बियाणे सरद पीक घेण्यास वापरीत. इतके चांगले भात बियाणे शिरोडा आणि पंचवाडी गावचे शेतकरी पिकवीत होते.
तरवळे भागातून वाहणाऱ्या ओहोळाचा उगम बिभळ पकरतळे या ठिकाणी होतो. पूर्वज त्या तळ्याच्या परिसरात भातशेतीची लागवड करत होते. तिथून ओहोळाचा प्रवाह खाली येत पंढरशी कुळागरास पाणी देत खालच्या भागातील मैगाळ कुळागरास पाणी पुरवठा करतो. त्या भागात त्याच्या पात्रात बंधारे घालून पाटाने पाणी दूरवर कुळागरास नेऊन सिंचन करतात. मैगाळकडून ओहळ खाली येत मुख्य रस्ता पार करून वल्लट भागात पोहोचतो. वल्लट ठिकाणी त्याला दुसरा ओहळ मिळतो, ज्याचा उगम करमणे डोंगर भागातील घळीत होतो. त्या ओहोळास धबधब्याचे सौंदर्य आहे. त्याच्या खालच्या परिसरात काकणतळे आहे. त्या परिसरात पूर्वी शेतकरी शेती पिकवीत होते. त्या परिसराकडून तो आपला प्रवाह खालच्या भागातील चुन्नट कुळागरास पाणी पुरवतो. पुढे खालच्या मळे भागातील कुळागरास पाणी देत आणखी खालच्या कुळागर बागायतीस पाणी देऊन वल्लट या ठिकाणी मुख्य ओहोळास मिळतो.
इथे त्याचा प्रवाह मोठा होतो. पुढच्या टप्प्यात शेतीला पाणी देत तो भाटले भागात पोहोचतो. भाटले भागात त्याला कोनाझरीचे पाणी मिळते. पुढच्या भागात त्याला तिथल्या लवले तळ्याचे पाणी मिळते. त्या तळ्याच्या पाण्यावर तरवळेची सरद वायंगण शेती पूर्वज पिकवून खांडी, कुंभांनी भाताच्या राशी घरी आणीत होते. वाजे परिसरात ओहोळाच्या काठावर नारळाची बागायती आहे. वाजेकडून त्याचा प्रवाह हळदये परिसरातील शेतीला पाणी देतो. पुढे सोनाळे परिसरातील शेतीला पाणी देऊन तो जुवारी नदीच्या काठावरील मानशीच्या दारातून नदीकडे झेप घेतो.
पांढऱ्या शुभ्र फेसाने हसत जुवारीच्या खाऱ्या पाण्यात मिसळून जातो. त्या मीलनातून जैवविविधतेचा जन्म होतो. ओहोळाच्या गोड्या पाण्यात ‘थिगुर’, ‘देखळे’, ‘पिठ्ठोळ’, ‘वाळेर’, ‘कडुख्खा’, ‘करणकाटके’, खेकडे, कासव यांचा संचार असतो. ते गोड्या पाण्याला स्वच्छ करण्याचे काम करतात. खाऱ्या पाण्यातील ‘शेवटा’, ‘काळुंद्र’, ‘तामसा’, ‘खरचाणी’, ‘शेतुक’, ‘पालू’, ‘घोळशी’, ‘केर’, ‘सांगट’, ‘वाशी’, ‘तोकी’, ‘झिंगे’ पाण्यातील घाण खातात. त्यामुळे नदीचे पाणी स्वच्छ राहते. गोड्या पाण्यातली मासळी खाऱ्या पाण्यात राहू शकत नाही आणि खाऱ्या पाण्यातील मासळी गोड्या पाण्यात वावरू शकत नाही, हे आमच्या पूर्वजांना माहीत होते. म्हणून ते तलाव, ओहळ, तळीत खारे पाणी आत येऊ नये म्हणून नैसर्गिक बंधारे घालून दोन्ही पाण्यांना उन्हाळ्यात वेगवेगळे ठेवीत होते. पावसाळा सुरू होताच तळ्यातील पाणी सुकवून गोड्या मासळीला पकडून त्यावर जेवणात ताव मारीत होते. त्याच प्रकारे शेतातील खळ्यांचे पाणी कमी करून खाऱ्या पाण्यातील मासळी पकडून चवीने खायचे.
‘जीवो जीवस्य जीवनम्’ (एक जीव दुसऱ्या जिवावर जगतो) हे तत्त्व आपल्या पूर्वजांनी आचरणात आणले. म्हणूनच निसर्गाच्या प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे, याची जाणीव आमच्या पूर्वजांना होती. ओहोळाच्या पाण्यावर स्वकष्टाने जे निर्माण केले, त्यातले गरजेपुरते घेतले. उरलेले पुढच्या पिढीसाठी जतन केले. आम्ही काय करतोय?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.