Diwali 2025 Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

..त्यावेळी दिवाळीला कडाक्याची थंडी पडायची, पहाटे उठून हांड्याखाली जाळ घालायचा, पणत्या पेटवायच्या; समाधान देणारा सण

Diwali 2025: अंधाराला मागे टाकून प्रकाशाकडे वाटचाल करणारा आपला आवडता सण म्हणजे दिवाळी, दीपावली लक्ष लक्ष दीपांनी अवघे वातावरण प्रकाशमान करणारी आपली दिवाळी.

गोमन्तक डिजिटल टीम

अंधाराला मागे टाकून प्रकाशाकडे वाटचाल करणारा आपला आवडता सण म्हणजे दिवाळी, दीपावली लक्ष लक्ष दीपांनी अवघे वातावरण प्रकाशमान करणारी आपली दिवाळी. दीपावली ही सर्वांसाठी एक आनंद पर्वणीच.

दिवाळी जवळ आली की, आकाश कंदील बनवायची कोण घाई! रानातून मोठा कोंडा (बांबू) कापून आणायचा. तो मधोमध फोडून त्याच्या हव्या तेवढ्या, हव्या तितक्या लांबीच्या कापट्या काढायच्या.

जाड सुताच्या दोऱ्याने त्या बांधून एकदाचा आकाशकंदिलाचा सांगाडा तयार करायचा. हे करायला दोन-चार दिवस लागत. मग बाजारातून हव्या त्या रंगाच्या फोली आणायच्या, कापायच्या खळ तयार करून त्याने त्या सांगाड्याला चिकटवायच्या खाली भरपूर शेपट्या लावायच्या.

मधोमध पणती किवा मेणबत्तीसाठी पोकळ बांबूची रुंद कापटी बांधून जागा ठेवायची.एकदा का आकाश कंदील तयार झाला की, गड जिंकल्याचा आनंद होई.

आता आकाशकंदील एक तर तयार मिळतात, किंवा सांगाडेही मिळतात, वर चिकटवायचे रंगीत कागद व्यवस्थित कापून मिळतात. गमने चिकटविले की झाला आकाशकंदील तयार, पण त्यावेळची ती आकाशकंदील बनवण्याची मजा काही औरच असायची.

आमच्या शेजारचा अशोक मात्र अजूनही कल्पक रित्या बिनपैशाचे पण भरपूर श्रमाचे आकाशकंदील बनवतो. कधी माडाच्या चुडत्तापासून तर कधी पोयांपासून माडीच्या पोवळ्यांचाही त्याने आकाशकंदील बनवला आहे. असो, हा आकाशकंदील दिवाळीच्या आदल्या रात्री अंगणात उंच चढविला जातो.

घरात आई दिवाळीच्या आदल्या दिवशी हांडा (मडकी) स्वच्छ घासून पाणी भरून न्हाणीच्या चुलीवर ठेवायची. मडक्याच्या गळ्याभोवती गंधाचे टिळे व त्यावर कुंक‌वाची बोटे लावून मडक्याच्या गळ्यात झेंडूची फुले व कारीटे यांची तयार केलेली माळ बांधायची. चुलीभोवती शेणाने सारवून त्यावर रांगोळी रेखायची.

पणत्यांची तेल-वात रात्रीच तयार करून ठेवली जाई. त्यावेळी दिवाळीला कडाक्याची थंडी पडायची. दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून हांड्याखाली-जाळ घालायचा पणत्या पेटवायच्या.

देवा - तुळशी समोर, मागील दारी, न्हाणीघरात पणत्या पेटवून उरलेल्या पणत्यांची अंगणात छान आरास करायची. फटाके लावायचे. तद्‍नंतर देवासमोर बसवून आई आम्हाला आरती ओवाळायची.

तेल उटणे लावून कडकडीत पाण्याने आंघोळ घालायची. अभ्यंग स्नान झाल्यावर नवीन कपडे परिधान कररून तुळशी-समोर पायाने कारीट फोडायचे. (नरकासूर वधाचे प्रतीक, मग माग आम्हाला ताज्या दूधाचा गरमागरम चहा आणि फराळ खायला मिळायचा. एकूण

दिवस खूप आनंदाचा असायचा. या दिवसाचे वेगळेपण म्हणजे गावात जितकी घरे तितके पायी चालत जायचे. आधी कोणाकडे, नंतर कोणाकडे हे ठरायचे. त्या सर्वांच्या घरी सर्वांनी पोहे खायला चालत जायचे. पोहे खाणे, पत्ते खेळणे यात संपूर्ण दिवस आनंदान, गजाली करण्यात पत्ते खेळण्यात जाई, अन् दिवाळी मंगलमय होई.

अजून काही ठिकाणी ही परंपरा चालू आहे. पण याला आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. पण त्यावेळचा आनंद आता अनुभवायला मिळतो, की नाही सांगता नाही येत. आता ‘बूफे’पध्दती, किंवा आईस्क्रीम वगैरे दिले जाते. एकंदरीत दिवाळीचा पहिला दिवस एकमेकांतील स्नेह वृद्धिंगत करण्यात जाई. आत्ताही तो तसा जातोच, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मिठाई, चिरमुऱ्याचे वाटप होते. पूर्वी साखरेच्या पाकातले पोहे प्रसाद म्हणून वाटीत असत.

आपल्याबरोबर ज्यांच्या जीवावर आपले ग्रामीण जीवन अवलंबून आहे, अशा गायी गुरांचा पाडवा या दिवशी सकाळी गायी- बैल वासरे सर्वांची पूजा करून त्यांना कुंकूम तिलक लावून गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा घालून गोडाचे पोहे व पोळी खायला दिली जायची.

त्यांची दिवाळीही आनंदाची जावी म्ह‌णून देवाकडे प्रार्थना केली जाई. नंतर अंगणात शेणाने गोठ्याची प्रतिकृती तयार करून एक हा गोठा झेंडूच्या फुलांनी सजवायचा व कारीटांनी हीर टोचून गुरे तयार करून या गोठ्यात ठेवली जात.

एक कारीट मधोमध फोडून त्यात दूध तूप घालून ठेवले जाई. या गोठ्याचीही पूजा, नैवेध केला जाई. संध्याकाळी गुरे गोठ्यात यायच्या वेळी हा गोठा सगळा आहे तसा, एकत्र गोळा करून गोठ्याच्या दारात ठेवला जाई, त्याला ‘फतला गौर’ म्हणतात त्यावर दोन काकडे पेटवून ठेवले जात.

अशा तऱ्हेने मुक्या प्राण्यांप्रती भक्ती आणि आदर्शवत भावना मनात निर्माण व्हावी. आपल्याबरोबर त्यांचाही दिवस आनंदात घालवता यावा, सर्वांची दिवाळी आनंदाची व्हावी ही एकच इच्छा असायची.

या निमित्याने नात्यांचा उत्सव आणि नात्यांची वीण घट्ट राहावी या हेतूने दिवाळीच्या दिवशी पत्नी-पतीला तर भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. सगळे एकमेकांना उदंड आयुष्य आरोग्य व सुख समाधान मागतात, असा हा दिवाळीचा सण कमी अधिक फरकाने गोव्यात साजरा केला जातो.

पूर्वी कडाक्याच्या थंडी इतकेच ओतप्रोत निरपेक्ष प्रेम असायचे, आताच्या युगात पैसा श्रेष्ठ ठरत असल्याने त्याला थोडा व्यावहारिकतेचा बाज आला आहे एवढेच. थंडीही आत्ता कमीच पडते, वातावरणातील फरकाचा परिणामही असावा.

एकूण काय तर गणेशचतुर्थी, दिवाळी, होळी सारखे सण सर्व समाजातील माणसांना एकत्र आणतात. सहजीवन ज‌गायला मिळते. सोबत दुखरे कंगोरेही जपले जातात. सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा.

- शुभदा मराठे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

SCROLL FOR NEXT