प्रमोद प्रभुगावकर
केवळ गोव्यातच नव्हे तर देशाच्या विविध भागांत नवरात्र-दसऱ्यानंतर सध्या दिवाळीचा माहोल चाललेला आहे. नवरात्र व दुर्गापूजा तब्बल दहा ते पंधरा दिवस चालते, दिवाळीचेही तसेच असते. त्यापूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थीचा माहोल असाच अकरा ते पंधरा दिवस चालतो. भारतात हिंदू संस्कृती ही अशीच सण व उत्सवांनी व्यापली आहे.
प्रत्येक जण आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता अशा विविध उत्सवांत रमतो. हे उत्सव साजरे करताना सर्व प्रकारचे भेदाभेद वगैरे दूर लोटले जातात व त्यामुळे असे हे विविध उत्सव साजरे करण्यामागील खरा उद्देश सफल होतो. पण हल्लींच्या काही दशकांत या उत्सवातही एक वेगळीच विकृती मूळ धरत चाललेली आहे.
कारण हल्लींच्या काळात वेगवेगळ्या कारणास्तव हे प्रकार वाढत आहेत. ते तसेच चालू राहिले तर या उत्सवांचा मूळ हेतू बाजूस पडून भविष्यात त्यांना वेगळेच स्वरूप येईल. दसरा असो वा दिवाळी, वाईटावर चांगल्याने मिळविलेला विजय अशीच त्याची गणना होते. पण प्रत्यक्षांत मात्र वेगळेच चित्र दृष्टीस पडते. त्यामुळे दसरा म्हणजे रावणाला व दिवाळी म्हणजे नरकासुराला उदात्त करण्याचे प्रकार प्रत्यक्षात घडत आहेत व वर्षागणिक ते प्रमाण वाढतच आहे.
आज केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागांतही दसऱ्यादिवशी रावणवधाचे निमित्ताने जो कार्यक्रम होतो व दिवाळीच्या आदल्या दिवशी ज्या भव्य स्वरूपातील नरकासुर प्रतिमा स्पर्धा होतात त्यांतून तेच वास्तव पुढे येत चालले आहे. स्वतःला हिंदू संस्कृतीचे पाईक म्हणविणारेही तोंड बंद करून आहेत ही खेदाची बाब आहे. हे असेच चालू राहिले तर आणखी काही पिढ्यांनंतर हे उत्सव रावण व नरकासुराच्या नावाने तर ओळखले जाणार नाहीत ना असे वाटल्याशिवाय राहत नाही.
मला हा प्रश्न आज नव्हे तर दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पडला होता. त्या वेळी आमच्या शेजारी राहणारी गुजराती कुटुंबांतील लहान मुले खेळण्यासाठी आमच्या घरी आली होती. दिवाळीच्या सुट्टीचे ते दिवस होते, मुलांमध्ये कसली तरी दिवाळी विषयींची चर्चा चालू होती पण त्यांच्यातील अगदीच लहान असलेल्यांना दिवाळीविषयी जास्त माहिती काही नव्हती त्यामुळे एकाने दिवाळी म्हणजे काय, नरकासुर का अशी हिंदीत विचारणा केली व मी थक्क झालो.
म्हणजे दिवाळीची ओळख लहान मुले नरकासुराद्वारा घेतात असे दिसले. आपली मुले आपल्या संस्कृतीबाबत किती अनभिज्ञ आहेत ते दिसून आले. या परिस्थितीला एक पालक म्हणून आपण जबाबदार आहोत का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आपला कोणताही सण वा उत्सव असो. पूर्वीच्या काळात त्याची सगळी तयारी घरीच केली जायची व त्यामुळे साहजिकच मुलेही त्यात सामील होत व त्यामुळे त्यांना एकेक बारकावे कळत व साहजिकच संपूर्ण माहिती होई.
साधे पतंग बनविणे असो वा आकाशकंदील तयार करणे असो, सगळी कामे घरीच केली जात असत. मला आठवते पतंग तयार करण्यासाठी रंगीत कागद आणण्यासाठी घरांतून पैसे मिळत नसत; मग आम्ही जुन्या वर्तमानपत्रांचा वापर पतंगासाठी करत असू. आकाशकंदिलांचेही तसेच होते.
भाटातील उन्मळून पडलेल्या बांबूचा लहानसा तुकडा कापून आणून त्याच्या बारीक कापट्या करणे, गव्हांच्या पीठाची खळ करणे वगैरे सगळी कामे करावी लागत. त्यावेळी वीज नव्हती म्हणून पणती त्यात ठेवली जाई. कधी कधी ही सगळी धडपड करूनही दिवाळीच्या दिवशी तो पूर्ण होत नसे. पण तरीही तो उशिरा का होईना पेटविण्यात व झाडावर दोरीच्या साह्याने चढविण्यात जो आनंद मिळतो तो आताच्या पिढीला मिळत नाही. कारण बाजारांतून तयार आकाशकंदील आणून पेटविण्यात काहीच ‘थ्रील’ नाही.
केवळ आकाशकंदिलाची गोष्ट नाही दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्यात जी मजा असते त्यालाही आताची पिढी पारखी झालेली आहे. कारण पहाटेपर्यंत जो नरकासुरांचा धागडधिंगाणा असतो त्यात ती दंग असते व त्यामुळे दुसऱ्या दिवशी उशिरा उठण्याची प्रथा आता सुरू झाली आहे. पहाटे उठून रांगोळी घातलेल्या पाटावर बसून तेल लावून घेणे, उटणे लावून घेऊन कढत पाण्याने स्नान करणे हे प्रकारही कालौघात बंद पडत चालले आहेत आता गावांतसुद्धा गीझर आल्याने न्हाणीघराऐवजी बाथरूम झाले आहेत.
त्यामुळे न्हाणीघरांतील हंडेही बंद झालेले आहेत. पूर्वी आपल्या कुळागरांतील कोपऱ्यात झालेल्या कारिटांच्या व रानदोडक्याच्या (घोसाळी) वेली फळांसकट आणून त्या घासून चकचकीत केलेल्या हंड्याला बांधल्या जात. पण आता हंडेच नाहीत मग त्या वेली कुठे बांधणार? त्याऐवजी बाजारात मिळणारी कारिटे आणून ती पायाने चिरडून नरकासुराचा वध केल्याचा सोपस्कार करण्याकडे बहुतेकांचा कल आहे.
पूर्वीप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने विविध प्रकारच्या पोह्याची चव घेण्याची प्रथाही आरोग्याची कारणे पुढे करून लोप होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोह्यासाठी एकमेकांकडे जाणेही कमी होत चाललेले आहे. केवळ दिवाळीच नव्हे तर अन्य अनेक सणही अशाच मार्गावर आहेत. आपली वाढत चाललेली संकुचित वृत्ती हे त्यामागील कारण असून त्यामुळे नव्या पिढीला आपण आपल्या संस्कृतीपासून तोडत आहोत याचे भान ठेवले जात नाही. एरव्ही आपण आपल्या पूर्वजांचे, त्यांच्या वारशाचे मुक्तपणे गोडवे गातो. पण इतकी वर्षे पूर्वजांनी सांभाळून ठेवलेल्या सणांचा वारसा जतन करून तो पुढील पिढीकडे सोपविण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हे असेच राहिले तर दसरा रावणाच्या नावाने व दिवाळी नरकासुराच्या नावाने ओळखली जाण्याचे दिवस दूर नसतील, हे मात्र खरे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.