साकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये गेल्या काही महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचे झालेले मृत्यू संबंधितांचे कुटुंबीय सोडल्यास प्रथम कोणीच गांभीर्याने घेतले नव्हते. प्रसार माध्यमांनी काही दिवस ते लावून धरले होते, पण वैद्यकीय अहवालात कोणतेच संशयास्पद आढळले नाही व कोणालाच त्यांत काही गैर वाटले नव्हते.
नाही म्हणायला काहींनी त्याचे राजकीय भांडवल करण्याचा अवश्य प्रयत्न केला; पण मयतांच्या नातेवाइकांनी प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात रस घेतला नाही व त्यामुळे खरेच ते मृत्यू संशयास्पद होते की काय ते उघडकीस आले नाही. पण चतुर्थीच्या दिवसांत वसतिगृहांतील खोलीत मृतावस्थेत सापडलेल्या ऋषी नायर याच्यामुळे बऱ्याच प्रकरणांची पोलखोल होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे.
गोव्यात ड्रग्सने किती गंभीर प्रमाणात हातपाय पसरले आहेत त्याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. खरे तर सरकारने आता या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालण्याची गरज आहे. सरकारने या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू केली आहे तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त केलेली असली, तरी तेवढ्याने भागणार आहे का?
कारण ऋषीच्या उलटीच्या रेड्रोक्स चाचण्या घेतल्या असता त्यांत अमलीपदार्थाचा अंशच नव्हे तर तीन प्रकारचे सिंथेटिक ड्रग्स सापडले आहे. त्यावरून हे प्रकरण साधेसुधे नाही तर गुंतागुंतीचे आहे. सध्या वेर्णा पोलिसांचे एक पथक बिट्सच्या कॅम्पसमध्ये तळ ठोकून आहे त्यावरूनही प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट होत आहे.
सुरुवातीपासूनच केवळ नायर याचाच नव्हे तर अन्य विद्यार्थ्यांच्या मृत्युबद्दलही जनमानसात संशय व्यक्त होत होता; पण त्या संशयाला वैद्यकीय तपासणीत पुष्टी मिळाली नव्हती. एकाच संस्थेत उच्च शिक्षणाची भव्य स्वप्ने बाळगून आलेले सधन कुटुंबांतील विद्यार्थी कसे मृत्युमुखी पडतात हे मात्र हल्लीपर्यंत कोडेच होते. नायर याच्या मृत्यू अहवालामुळे त्याचे कारण उघड झाले आहे.
या मृत्यूनंतर गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना या प्रकरणाचे राजकीय भांडवल करण्याची संधी मिळाली असली तरी खरा मुद्दा आहे तो राजकारण चार हात दूर ठेवून या समस्येचा सामना करण्याची. सरकार व विरोधी पक्षांनीही याची नोंद घेण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात सध्या तरी ही मंडळी या समस्येचे राजकारण करण्यातच धन्यता मानत आहेत. खरे तर नियोजनशून्य पर्यटन हेच या समस्येचे मूळ आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
गोव्याचे अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे असा समज आजच्याच नव्हे तर गेल्या अनेक दशकांच्या सरकारांनीच करून वाटेल तशा पर्यटन व्यवसायाला ज्या पद्धतीने कवटाळले, त्यातूनच ड्रग्सचे भूत गोव्याच्या डोक्यावर बसले. त्यातून अनेक अनिष्ट वृत्ती राज्यांत बोकाळल्या व त्या आता आपल्या गळ्याशी आल्या आहेत. आज जे कोणी राजकारणी ड्रग्सच्या नावाने कोकलत आहेत ते वा त्यांचा पक्ष सत्तेवर असतानाच ही कीड गोव्याला लागलेली आहे याचे भान त्यांनी तरी ठेवायला हवे.
राज्यातील किनारी भागात जी बेसुमार संख्येने तारांकित हॅाटेले उभी राहिली त्याच्या जोडीनेच केवळ अमली द्रव्येच नव्हे तर अन्य विविध गैर व्यवसायही येथे उभे ठाकले व फोफावले. कॅसिनो हेही त्याचेच फळ आहे हेही यासंदर्भात लक्षांत घेण्याची गरज आहे. खरे म्हणजे साकवाळमधील बिट्स पिलानी ही केवळ सुरुवात आहे; त्याची गंभीर फळे भविष्यात दिसणार आहेत.
वस्तुतः ड्रग्स हे केवळ पर्यटनापुरते म्हणजे त्या व्यवसायातील व्यवहारापुरते मर्यादित राहिलेले नाही.
ते खेड्यापाड्यातही पोहोचलेले आहे, हे विविध भागांत पडत असलेल्या धाडी व जप्त केलेल्या द्रव्यावरून दिसून येते. सत्तरच्या दशकांत म्हणे मडगाव, पणजी, वास्कोसारख्या भागांत व कळंगुट, हणजूण, वागातोर यांसारख्या किनाऱ्यावरच नव्हे तर विविध शहरांतील कॉलेजांलगत असलेल्या गाड्यांवरही ते मिळत असे; मात्र त्यासाठी सांकेतिक शब्द वापरले जात. अर्थात तो व्यवहार एका मर्यादेत चालायचा; पण नंतर ते शाळांच्या जवळच्या गाड्यांवरही पोहोचले.
म्हणजे शालेय स्तरावरही त्याचा वापर होऊ लागला हे उघड आहे. पण कोणीच ती बाब गांभीर्याने घेतली नाही. आता ते सार्वत्रिक झाले आहे. म्हणजे अनेकदा कोट्यवधीचे अमली द्रव्य जप्त केले तरी कोणाला त्याचे काहीच वाटत नाही. कोणाला ते कोठून येते व कुठे जाते, त्याचे ग्राहक कोण त्याची चिकित्सा करावी असे वाटले नाही.
सत्ताधाऱ्यांचे सोडा, त्यांना त्यात त्यांचा वाटा मिळतो असे म्हणता येते पण विरोधकांचे, समाजसेवी मंडळीचे काय, त्यांना त्याविरुद्ध आकाशपाताळ एक करावे असेसुद्धा वाटू नये?
विविध विद्यार्थी संघटना एरवी अन्य प्रश्नांवर आवाज उठवतात पण या प्रश्नांवर तसा आवाज उठवावा असे का वाटू नये? गोव्याच्या अनेक गावांत गांजा पकडल्याच्या बातम्या हल्ली वरचेवर वाचायला मिळतात पण हा गांजा येतानाच का सापडत नाही?
काही भागांत तर गांजाची लागवड पकडल्याचीही उदाहरणे आहेत. हे सगळे पाहिले तर गोव्याची ओळख ‘अमली द्रव्याचा हब’ म्हणून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय संस्कृतीचे रक्षक म्हणवून घेणाऱ्यांसाठी ही बाब निश्चितच लज्जास्पद ठरेल.
बिट्स पिलानीतील या प्रकरणामुळे सरकारसमोर एक नवे आव्हान आता उभे राहणार आहे. पाचव्या विद्यार्थी-मृत्यूनंतर त्या कॅम्पसमध्ये ड्रग्स कसे पोहोचले, याचा शोध म्हणे घेतला जात आहे व त्यासाठी तेथे खाद्यपदार्थ घेऊन जाणारे स्वीगीसारखे पुरवठादार पोलिसांच्या रडारवर आले आहेत; पण त्याला काही अर्थ आहे का?
कारण चिरेबंदी सुरक्षा व्यवस्था असलेल्या कोलवाळसारख्या मध्यवर्ती तुरुंगातील कैद्यांना जर ड्रग्स सहज मिळत असतील तर तेथे बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! म्हणूनच हे प्रकरण सरकारसाठी आव्हानात्मक ठरले आहे हे खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.