Human Trafficking In Goa AI Image Generator
गोंयकाराचें मत

Human Trafficking In Goa: मुलाच्या वाढदिवसासाठी घेतले कर्ज, फेडण्यासाठी गोव्यात गेली; महिला मानवी तस्करांच्या जाळ्यात

Financial Pressure On Families: आपल्या मिळकतीत जे बसणार नाही, ते करू नये, हा साधा विचार नाही का करता आला असता?

गोमंतक ऑनलाईन टीम

डॉ. रुपेश पाटकर

आपल्या मिळकतीत जे बसणार नाही, ते करू नये, हा साधा विचार नाही का करता आला असता? आपला खर्च आपल्या मिळकतीपेक्षा कमी असावा, हा साधा निकष नाही का लावता आला असता?

आमच्या लहानपणी वाढदिवस साजरा करण्याचे फॅड फारसे फोफावले नव्हते. क्वचितच कोणा लहान मुलाचा वाढदिवस साजरा होई. आता परिस्थिती अगदी उलट आहे. वाढदिवस साजरा न करणारे घर मिळणे कठीण आहे. पण कधी विचार केलाय का, की वाढदिवस का साजरा करायचा? वाढदिवस साजरा करायचा, तर ‘केकच कापायचा’ हे कर्मकांड कुठून आले? घरात एखादा गोड किंवा रुचकर पदार्थ बनवून आई-वडिलांनी, घरातील मोठ्यांनी मुलाचे औक्षण करून वाढदिवस साजरा नाही का होणार? त्यासाठी लग्नासारखे लोकांना बोलवायलाच हवे का? आलेल्यांना मेजवानी द्यायलाच हवी का?

डेकोरेशन करायलाच हवे का? गिफ्ट-रिटर्न गिफ्टचा घाट घातलाच पाहिजे का? पूर्वी लोक लग्नाच्या पत्रिकादेखील क्वचितच छापायचे. आता वाढदिवसाच्या देखील पत्रिका छापतात. हे वाचून माझा सूर तुमच्या लक्षात आला असेलच आणि तुम्ही मनातल्या मनात हा विचारदेखील केला असेल, की ‘लोक वाढदिवस साजरा करतात, याचे या गृहस्थाच्या पोटात का दुखते? तू अरसिक असशील, तर तू तुझा वाढदिवस करू नकोस. तुझे ज्ञान का वाटत फिरतोस?’ तुम्हाला असे वाटणे साहजिक आहे. पण हा विषय काहींच्या जीवनात वाटतो तितका निरुपद्रवी नाही!

एक घटना शेअर करतो, म्हणजे माझ्या बोलण्याचे गांभीर्य लक्षात येईल. मुंबईतील एक महिला गोव्यात स्वतःहून पोलिसांत मदत मागायला पोहोचली. तिला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जॉब आहे, असे सांगून गोव्यात पाठवण्यात आले होते. दिलेल्या पत्त्यावर जेव्हा ती पोहोचली, तेव्हा तिच्या लक्षात आले, की वस्तीपासून दूर असलेल्या एका बंगल्यात तिला अडकवण्यात आले आहे. तिथे तिला गिऱ्हाईके घेण्याची सक्ती करण्यात आली. तिला आठवड्याभरात त्यांच्या तावडीतून पळून जाण्याची संधी मिळाली. म्हणून तिची सुटका झाली. पण तिने मुळात गोव्यात अनोळखी ठिकाणी येण्याचे धाडसच मुळी का केले?

ती होती कामगारवर्गीय. नवऱ्याचा पगार टुकीने संसार चालवता येईल एवढाच होता. त्यात त्यांना मुलगा झाला. बारसे बेताचेच, घरच्या घरी झाले. पण आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस छान साजरा करायचा, असे तिने ठरवले. ती नवऱ्याकडे ही गोष्ट बोलली. नवरा म्हणाला, ‘उगीच खर्च कशाला? मिळतो त्या पगारात जेमतेम होतो आपला संसार. कोणी आजारी पडले, तर पैसे हवेत म्हणून थोडेसे जमवून ठेवलेत’ ‘सगळे आपापल्या मुलांचे कौतुक करतात. साधा वाढदिवस पण आपण साजरा करू शकत नाही,’ नवऱ्यावर वैतागत ती म्हणाली. ‘आपले झाले होते का पहिले वाढदिवस? काय वाईट झाले आपले?’ तो रागाने म्हणाला.

तिने शेजारपाजारच्या मुलांचे वाढदिवस साजरे होताना पाहिले होते. आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करायचाच, या जिद्दीला ती पेटली. तिला चाळीतल्या कोण्या एका मैत्रिणीने खासगी कर्ज घ्यायचा सल्ला दिला. तिने कर्जाऊ पैसे घेतले. वाढदिवस दणक्यात साजरा केला. ''पैसे कुठून आणलेस?'' नवऱ्याने विचारले. त्यावर ती म्हणाली, ‘तुमच्याकडे मागितले का मी? मी माझं माझं करतेय ना.’ जसा वाढदिवस साजरा होऊन महिना होत आला, तसा कर्ज देणारा पैसे परत मागू लागला. ती पैसे कुठून परत देणार होती? पार्टटाइम नोकरी करून पैसे देण्याचा तिने प्रयत्न केला, पण त्यातून व्याजसुद्धा देता येईना. नवरा संतापणार, हे तिला माहीत होते. म्हणून ती त्याला काही बोलली नाही. ती चाळीतल्या मैत्रिणींकडे आपले टेन्शन बोलत असे. तिच्या एका मैत्रिणीने ती कामाला जात असलेल्या ब्युटीपार्लरची मालकीण मदत करेल, असे सुचवले. ती ब्युटीपार्लरवाल्या बाईला भेटली. ती म्हणाली, ‘मेहनत करणार का?’

‘हो!’, ‘गोव्यात काम आहे.’ ‘गोव्यात?’, ‘हो. इथे ज्या कामाला दहा रुपये मिळतात, त्याला तिथे शंभर रुपये मिळतात. आठवड्याभरात तुला तुझे कर्ज फेडण्याइतके पैसे भेटतील.’ ‘काम काय असेल?’ ‘हॉटेलात वेटर करतात तसे काम. तिथे मोठ्या पार्ट्या असतात, इव्हेंट असतात. त्यासाठी त्यांना माणसे लागतात.’

‘मी कधी गेले नाही गोव्याला.’

‘काळजी करू नकोस. माझी मैत्रीण आहे. तू नक्की जाणार असशील, तर तिला मी कळवते. ती तुझी सगळी सोय करेल,’ ब्युटीपार्लरवाली बाई म्हणाली. तिने मुलाला आईच्या घरी सोडले आणि मैत्रिणीच्या घरी लग्न आहे, असे नवऱ्याला सांगून ती गोव्यात आली. आणि लैंगिक तस्करांच्या तावडीत अलगद सापडली.

ज्या मुलाला वाढदिवस म्हणजे काय, हे कळतही नाही, त्या मुलाचे आभासी कौतुक करण्याच्या भ्रमात ती भयानक संकटात सापडली. हे सर्व तिला नाही का टाळता आले असते? इतरांसारखे करण्याचा मोह नाही का टाळता आला असता? आपल्या मिळकतीत जे बसणार नाही, ते करू नये, हा साधा विचार नाही का करता आला असता? आपला खर्च आपल्या मिळकतीपेक्षा कमी असावा, हा साधा निकष नाही का लावता आला असता? मला वाटते, आजच्या सर्व दिशांनी लालचावले जाण्याच्या काळात आपण झगमगाटाच्या आकर्षणावर नियंत्रण ठेवण्याची तातडीची गरज आहे. ‘इतर काय म्हणतील?’ हा विचार योग्य तऱ्हेने हाताळण्याची गरज आहे. ‘दुसऱ्याकडे आहे म्हणजे माझ्याकडेही असायला पाहिजे,’ हा विचार फेटाळून लावायची गरज आहे. अंथरुण पाहून पाय पसरण्याची सवय लावणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bird Flu Vaccine: बर्ड फ्लूविरुद्ध भारताने बनवली स्वदेशी लस; 20 नोव्हेंबरला होणार लाँच

Quad Summit 2026: 'क्वाड' हिंद-प्रशांतचा विश्वासार्ह भागीदार; मोदींचा सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान अन् सहकार्यावर भर

ICC ODI Batting Rankings: वनडे रँकिंगमध्ये मोठा फेरबदल! शुभमन गिल आणि विराट कोहलीची बादशाहत कायम, रोहित-श्रेयसला झटका

Kendra Drishti Yog 2026: भाग्य उजळणार संयोग! सूर्य-गुरुच्या केंद्र दृष्टीने 5 राशींना मिळणार अफाट संपत्ती; आर्थिक लाभाची पर्वणी

IPL Auction Date: BCCI कडून IPL 2027 ऑक्शनची तारीख जाहीर, 16 डिसेंबरला गोव्यात खेळाडूंवर लागणार कोटींची बोली; पैशांचा पडणार पाऊस

SCROLL FOR NEXT