Maratha history Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Maratha history: प्रतापगडचा रणसंग्राम: शिवरायांच्या गनिमी काव्याने अफजलखानाचा माज उतरवला!

Battle of Pratapgad 1659: निवडक सामग्री घेऊन अफजलखानाचे ५-८ हजारांचे सैन्य वाईहून निघाले. कृष्णा नदीच्या डाव्या काठाने चिखली व तेथून तायघाटाची कष्टप्रद खडी चढण चढून ते महाबळेश्‍वराच्या पठारावर आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

निवडक सामग्री घेऊन अफजलखानाचे ५-८ हजारांचे सैन्य वाईहून निघाले. कृष्णा नदीच्या डाव्या काठाने चिखली व तेथून तायघाटाची कष्टप्रद खडी चढण चढून ते महाबळेश्‍वराच्या पठारावर आले. पुन्हा रडतोंडीच्या तीव्र उताराच्या घाटाने ते जावळीत उतरले. शिवाजीराजांनी आपल्या माणसांना सांगून झाडेझुडूपे कापून त्यांच्यासाठी पुरेशा रुंदीचा रस्ता केला आणि त्यानिमित्ताने आपली माणसे संपूर्ण जावळीत पेरून ठेवली.

खानाचे जावळीत आगमन ः जावळीत आल्यावर वेळूच्या बेटांनी व्याप्त अशा कोयना नदीच्या काठावर पार ते जावळी गावापर्यंत खानाने छावणी उभारली. भोवतालच्या प्रमुख ठाण्यांवर खानाने आपल्या टेहळणीच्या व संदेशवहनाच्या चौक्याही उभारल्या. खानाचे गुप्तहेरांनी आजूबाजूच्या परिसराची व भेटीच्या जागेची कसून पाहणी केली. त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. या सर्व चौक्यांना चकवून राजांनी आपली माणसे ठिकठिकाणी नेमली.

आपल्या सैन्यसंख्येची, सैन्य सामर्थ्याची थोडी सुद्धा कल्पना खानाला येऊ दिली नाही. उलट महाराज व त्यांचे सैन्य अतिशय घाबरट व कच्चे आहे, अशी समज खानाला झाली. त्यानंतर दोघांनीही परस्परांचे कुशल विचारण्याकरिता आपापले वकील एकमेकांकडे पाठविले. खानाला व सोबत आलेल्या सरदारांना शिष्टाचारास अनुसरून भेटी दिल्या पाहिजे म्हणून राजांनी खानाच्या छावणीतील व्यापाऱ्यांना बोलावून घेतले. आणि त्यांच्याकडील रत्ने व अन्य वस्तू आपल्याजवळ ठेवून घेतल्या. या सर्व प्रकारांमुळे खानाचा राजांवर विश्‍वास बसला.

भेटीच्या अटी

एकमेकांनी पाठविलेल्या वकिलांच्या द्वारे भेटीचा तपशील ठरला! सैन्य जसे आहे तसेच ठेवून एकट्या अफजलखानाने सशस्त्र पालखीत बसून यावे. सेवेसाठी दोन-तीनच सेवक सोबत घ्यावेत. आणि गडाच्या माचीजवळ उभारलेल्या शामियान्यात शिवाजीराजांची वाट पहावे. राजांनी सशस्त्र येऊन त्या पाहुण्याचा आदरसत्कार करावा. दोघांच्याही रक्षणासाठी दहा-दहा सैनिकांनी बाणाच्या टप्प्यावर येऊन मागे थांबावे. दोघांनीही भेटल्यावर अत्यानंदकारक असे गुप्त बोलणे (खलबत) तेथे करावे (शि.भा.२१।३-८). स्वतःच्या अफाट अंगसामर्थ्यामुळे अशा एकांत भेटीत आपण राजांना सहज जेरबंद करू शकू, या भ्रमात असलेला खान या अटींना आनंदाने तयार झाला.

खानाभोवतीचा चक्रव्यूह

गडाच्या आग्नेयेच्या माचीवर, की जिला ‘जनीचे टेंब’ म्हणत. तिच्या तीन बाजूंना मोठ्या दुर्गम घळी व माथ्यावर थोडी सपाटी आहे. हा भाग गडाच्या बुरुजावरून नजरेच्या व तोफांच्या टप्प्यात येतो. मात्र कोयनाकाठच्या खानाच्या सैन्याला हा भाग दिसत नव्हता. अशा मोक्याच्या जागेवर राजांनी भेटीचा भव्य शामियाना (सभामंडप) उभारला. भेटीची जागा ही गडापासून सुमारे ७०० मी.वर तर कोयनाकाठच्या खानाच्या छावणीपासून सुमारे २ कि.मी. अंतरावर होती. कोयनाकाठाहून भेटीच्या जागेकडे येणारी डोंगरसोंड गर्द झाडीची व चढणीची होती. या घनदाट झाडीत व शामियान्याच्या मागील घळीत राजांनी आपले सैन्य अत्यंत कौशल्याने लपवून ठेवले.

भेट झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन सैन्यास ईशारती देण्याची महत्त्वाची कामगिरी कान्होजी जेधेंवर सोपविलेली होती. खानाच्या सैन्यास गडाकडे येण्यापासून रोखणे, राजांना दगाफटका झाल्यास मदतीला धावणे आणि त्यानंतरच खानाच्या सैन्यावर तुटून पडणे, ही जबाबदारी जेधेंच्या तुकडीवर होती. बांदलांच्या तुकडीने जावळी, पार व दरे गावातील जंगलात लपून रहायचे आणि शत्रूस डोंगर चढू न देता त्यांच्यावर चहूबाजूंनी हल्ला करायचा. हैबतराव व बाळाजी शिळीमकर यांनी गडावर जाणाऱ्या इतर वाटा रोखून धरायच्या.

गडाच्या दक्षिण बाजूच्या तुकडीने किनेश्‍वरजवळ दबा धरून बसायचे आणि खानाच्या सैन्याला कोकणात उतरू न देता पारघाट रोखायचा व त्यांच्यावर तुटून पडायचे. घाटाखाली व विविध चौक्यांवर असणाऱ्या नेतोजींच्या घोडदळाने, इशारा मिळताच कोयनाकाठच्या शत्रूवर हल्ला करणे, रडतोंडीमार्गे त्यांना महाबळेश्‍वराचे पठार चढू न देणे, वाईकडे जाणारे रस्ते अडविणे व लगोलग वाईवर हल्ला करणे. अशी दीर्घ पल्ल्याची कामगिरी नेतोजींकडे होती. त्यांच्या मदतीला रघुनाथ बल्लाळ सबनीसांना दिले होते. याशिवाय रडतोंडीचा घाट अडविण्याची जबाबदारी बाबाजी भोसलेंच्या तुकडीकडे होती. मोरोपंत पेशवे, शामराव नीळकंठ (पद्मनाभ), त्रिंबक भास्कर यांच्या तुकड्याही जावळीच्या अरण्यमय चक्रव्यूहात ठिकठिकाणी सज्ज होत्या.

युद्धसंकेतांची साखळी

शामियान्याच्या दरवाज्यात राजांनी शिंग वाजविणारा शिंग्या ठेवला होता. राजांनी हत्यार चालू केले की, शिंग फुंकायचे. तो आवाज ऐकला की किल्ल्यावरील तोफांनी सांकेतिक क्रमाने तोफा डागायच्या. धोक्याच्या ईशारतीवर मधमाश्या आग्यामोहोळातून बाहेर पडून सर्वत्र घोंघावतात, त्याप्रमाणे तोफांचा आवाज झाला की, दबा धरून बसलेल्या मराठ्यांनी चहूबाजूंनी येऊन रणकंदन माजवायचे, अशा सूचना राजांनी मावळ्यांना केल्या.

भेटीच्या आदल्या रात्री राजांनी सर्व सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले व आपापली कामगिरी चोख बजाविण्यास सांगितले व म्हणाले की, ‘‘अंबेने कौलही दिला आहे की आम्ही जय पावून येऊ, पण कदाचित वाकडे झाले तरी घाबरे न होता, शत्रूस बुडवून, संभाजीराजांस पुढे करून स्वराज्य वाढवावे.’’ शिवरायांचे हे बोलणे म्हणजे राजाचा आदर्श आहे.

भेटीचा दिवस

भेटीचा दिवस उजाडला! राजांचे वकील खानाच्या छावणीत पोहोचले. खान सैन्याची मोठी तुकडी घेऊन निघाल्याचे पाहून भेटीचा बेत रद्द होईल, असे सांगितले. त्यामुळे हे सैनिक तिथेच ठेवण्यात आले. पालखी उचलणारे भोई, अंगरक्षक व वकील अशी मोजकी माणसे घेऊन खान शामियान्यापाशी आला. खान पोहोचल्याचा निरोप प्रतापगडावर पोहोचला. शिवाजीराजांनी कवच घालून, तुरा खोवलेली शुभ्र पगडी व केशराचा शिडकावा केलेला अंगरखा परिधान केला.

एका हातात तलवार (कृपाण) व दुसऱ्या हातात पट्टा धारण केला (शि.भा.२१।१९-२१). भेटीच्या जागेजवळ पोहोचताच सय्यद बंडा शस्त्र घेऊन खानाजवळ उभा असल्याचे पाहून राजांनी त्याला दूर करविले. आता शामियान्यात आपापल्या वकिलांसह खान व महाराज असे चौघेच जण होते. दोघांची समोरासमोर भेट झाल्यावर, राजांचा विश्‍वास बसावा म्हणून खानाने स्वतःची तलवार जवळच्या सेवकाच्या (कृष्णाजी भास्कर) हातात दिली. दोघांमध्ये थोडे संभाषण झाल्यानंतर आलिंगन देण्याच्या बहाण्याने खानाने राजांना जवळ घेतले. आणि राजांची मान डाव्या हाताने धरून दुसऱ्या उजव्या हाताने त्यांच्या कुशीत कट्यार (कटारिका) खुपसली.

बाहुयुद्धनिपुण शिवरायांनी लगेच त्याच्या हातातून मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीने शामियाना दुमदुमवून टाकला आणि गोंधळून न जाता कट्यारीचा वार चुकविला. आणि सिंहाप्रमाणे अत्यंत चपळाईने स्वतःच्या जवळची तलवार (कृपाण/कृपाणिका) खानाच्या पोटात खुपसली. पोटातून पाठीपर्यंत घुसलेली तलवार सर्व आतडी सोबत घेऊनच बाहेर पडली. राजांनी जेव्हा असा पराक्रम करून दाखविला तेव्हा खानाचे डोके गरगर फिरू लागले. नंतर रक्ताच्या धारांनी जमीन भिजवून, झिंगलेल्या माणसाप्रमाणे झोकांड्या खात, अतिविव्हल झालेला खान पोटातून बाहेर पडलेली सर्व आतडी तशीच आपल्या हाताने धरून ‘ह्याने मला येथे ठार केले, ह्या शत्रूस वेगाने ठार करा’ असे आपल्या मागच्या (पार्श्ववर्ती) सेवकास म्हणून तो बाहेर पडू लागला

तेवढ्यात राजांनीही वायुवेगाने शस्त्र चालवित दोन्ही शत्रूंचा निःपात केला व ते शामियान्याच्या बाहेर पडले. खान मारला गेल्याचे पाहून त्याचे १० अंगरक्षक (पृष्ठरक्षक) राजांना मारण्याकरिता धावून आले. राजांनी आपल्या हातातील तलवार व पट्टा असा काय फिरविला की, जणू त्याचा स्वतःभोवती तटच उभा केला. तेवढ्यात संभाजी कावजी, काताजी इंगळे, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सूरजी काटके (सूर्याजी काकडे), जीवा महाला, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि इब्राहिम सिद्दी (बर्बर) हे राजांचे १० अंगरक्षकही पुढे धावले. बडा सय्यद राजांवर चालून आला तेव्हा जीवा महाला यांनी स्वतःजवळील तलवारीने त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले. राजांच्या इतर रक्षकांनी खानाच्या रक्षकांसह सेवकांचाही खातमा केला. अशा प्रकारे, शालिवाहन शक १५८१, विकारी संवत्सरी, मार्गशीर्ष मासी, शुक्लपक्षी, सप्तमी तिथीस, गुरुवारी, मध्यान्ही (दुपारी) अर्थात, १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानास ठार केले (शि.भा.२१।५७-८४). तह होऊन खान राजांना मारणारच, या भ्रमात असलेले खानाचे कोयनाकाठचे सैन्य बेसावध होते.

जावळीतील लढाई

(१० नोव्हेंबर)

दुपारपर्यंत जनीच्या टेंबावरील सर्व शत्रूंना ठार केल्यानंतर गडावरील ईशारतीनुसार ठिकठिकाणी लपून बसलेले सैन्यही बाहेर पडले. कमळोजी साळुंखे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी वडखले व रामाजी पांगेरे (पांगारकर) या पाच जणांनी प्रत्येकी एक हजार व नारायण ब्राह्मण (नारो बापूजी) यांनी पाच हजार पायदळासह धावून येऊन खानाच्या सैन्यास घेरले व जोरदार हल्ला चढविला. अचानक झालेला हल्ला व आपला नेता अफजलखान ईश्‍वरास प्यारा झाल्याची बातमी ऐकून खानाचे सैनिक गोंधळून पळू लागले. खानाच्या सैन्याकडून लढणारा शाहजीराजांचा चुलतभाऊ मंबाजी भोसले मारला गेला.

मूसेखान, याकूतखान, हसनखान, अंकुशखान यांसारख्या बलाढ्य सेनापतींनी पळ काढला. अफजलखानाचा थोरला मुलगा फाजिलखान वेशांतर करून व आपल्या भावांना वाऱ्यावर सोडून पळून गेला. प्रतापराव मोरे याने या सर्वांना जंगलातून वाट दाखवून जावळीच्या बाहेर नेले. रनदुल्लाखान (रनदौलाखान), अंबरखान, राजाजी घाटगे, अफजलखानाची दोन धाकटी मुले व इतर अनेक सरदार कैद झाले. खंडोजी खोपडे हा देखील कैद झाला व पुढे राजांनी त्याचा एक हात व एक पाय कलम केला. अखेर मराठ्यांच्या लाटेमुळे खानाचे सैन्य अरण्यसागरात बुडून गेले.

सुमारे ६५ हत्ती, ४००० घोडे, ३ लाख जडजवाहीर, १२०० उंट, २००० कापड ओझी, ७ लाख नगद व मोहोरा व होन सोने रुपये तसेच सर्व भांडी तोफखाना, पालख्या, गुरेढोरे व इतर मालमत्ता अशी भरगच्च संपत्ती मराठ्यांच्या हाती पडली (सभासद बखर). अशी ही जावळीची अरण्यभूमी ‘जयवल्ली’ नावास पात्र झाली. विजयानंतर स्वतः शिवरायांनी युद्धक्षेत्राची पाहणी करून मृत व जखमी लोकांची यादी केली. सर्व कैद्यांना एकत्र करून जे आपल्याकडे येऊ इच्छित होते त्यांना सैन्यात घेतले.

काहीकडून खंडणी घेऊन सोडून देण्यात आले. सर्व लूट एकत्र करून त्याचा हिशोब करण्यात आला. सर्व मृतांचे अंत्यसंस्कार केले. मृत झालेल्यांची वतने त्यांच्या वारसांना व निपुत्रिक विधवांना निम्म्या वेतनाची तरतूद केली. लढाईत विशेष शौर्य गाजविणाऱ्यांना मानसन्मान देण्यात आले. अशा प्रकारे एका लोककल्याणकारी राज्याचा आदर्श शिवरायांनी घालून दिला.

वाईतील लढाई (११ नोव्हेंबर)

भेटीच्या दिवशीच म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी वाईवर हल्ला करण्याची राजांनी नेताजीला सूचना केली होती. मात्र वाईला वेळेत पोहचू न शकल्याने, खानाचे सरदार जीव मुठीत धरून वाघ मागे लागल्यासारखे रानावनातून पळून वाईला व तिथून विजापुराच्या दिशेने पळून गेले. नेताजींच्या तुकडीने दुसऱ्या दिवशी पहाटे वाईतील उर्वरित सैन्यावर चहूबाजूंनी हल्ला केला. मागोमाग शिवाजीराजेही आदिलशाही मुलूख त्वरेने जिंकण्याच्या हेतूने वाईला आले. माणको राम यांस वाईचा प्रमुख नेमून राजे त्वरेने आदिलशाही मुलूख जिंकण्यासाठी विजेच्या वेगाने बाहेर पडले.

प्रतापगड युद्धाचे महत्त्व व निष्कर्ष

खानाचा कपटी हेतू ओळखून राजांनी अत्यंत संयमाने त्याला चक्रव्यूहात ओढले व त्याला ससैन्य संपवून मुबलक संपत्ती मिळविली.

बंडखोर व सामान्य समजले जाणारे शिवाजी महाराज सर्वत्र सुपरिचित झाले.

राजगडावर पुरलेले खानाचे शीर, खानाच्या उर्वरित धडाच्या जागी बांधलेली कबर, श्रीमहाबळेश्‍वरास अर्पण केलेला शामियान्यावरील सुवर्णकळस आणि प्रतापगडावर उभारलेले भवानीमातेचे मंदिर ही सर्व स्थाने म्हणजे महाराजांच्या विजयाचे ‘विजयस्तंभ’च आहेत.

या युद्धाचा महत्त्वाचा भाग म्हणजे जिवावर बेतलेले संकट येऊनही या युद्धानंतर महाराजांनी केलेले ‘वैक्रमण’. दुर्दैवाने, आपण मात्र महाराजांनी खानाचा कोथळा बाहेर काढल्याच्या चित्राचे स्तोम माजवितो किंवा कृष्णाजी भास्कर सारख्या यःकश्चित व्यक्तीला मारले की नाही यांमध्ये गुंतून पडतो.

- अनिकेत यादव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: 'सिग्नल' बनले शोभेची वस्तू, डिचोली बगलमार्गावर यंत्रणा कार्यान्वित कधी होणार?

Canacona municipal election: काणकोण पालिका निवडणूक; इच्छुक उमेदवार लागले कामाला, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

Margao parking project: मडगावात पार्किंग प्रकल्प अजूनही कागदावरच, वाहतूक कोंडीची समस्या वाढली; आरक्षित जागा कचऱ्याचा ढिगारा, प्रशासनावर टीका

Tourist deaths in Goa: राज्यात पर्यटकांच्या मृत्यूंनी वाढली चिंता, सव्वातीन महिन्यांत 29 प्रकरणे समोर; ड्रग्स, अपघातांसह गुन्ह्यांचे सावट

जतन सिंगला दणका; पुन्हा जामीन नाकारला, 532 ग्रॅम मेथमफेटामाइन केले होते जप्त

SCROLL FOR NEXT