पणजी: ‘आप’चा दिल्ली नमुना कितीही आकर्षक असला आणि तेथील सुशासनाला लोक भुलले असले, तरी शेवटी नेत्याचे चारित्र्य, हेच त्याचे खरे राजकीय भांडवल असते. केजरीवालांनी भाजप किंवा नरेंद्र मोदी यांना पर्याय निर्माण करण्याच्या नादात सौम्य हिंदुत्ववादाची कास धरली. गुजरातमध्ये जाऊन तेथे हत्याकांडाचे गंभीर आरोप असलेल्यांकडे डोळेझाक केली, संघाला निकट जाण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या गंभीर चुका होत्या. ही अत्यंत लज्जास्पद तडजोड म्हणून इतिहासात नोंद होईल...
अरविंद केजरीवालांवर भरपूर लिहून आलेय. ‘आप’ हा एक फुगा किंवा बुडबुडा होता. तो फुगत होता. हळूहळू त्याचा आकार बदलताना लोक पाहत होते. तो फुटणारच होता.
भ्रष्टाचाराविरुद्धचा पुकारा करून केजरीवाल पुढे आले होते. त्यांची संपूर्ण मोठी टीम भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकली. आता कोणीही म्हणेल, भाजप काय धुतल्या तांदळासारखी पार्टी आहे का? नरेंद्र मोदी यांची ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ ही घोषणा किती तकलादू आहे, हे साऱ्या राजकीय पंडितांना माहीत आहे.
राजकारण चालवायचे असेल तर पैसा, काळा पैसा हवाच; परंतु भ्रष्टाचार आता मुद्दाच नाही. मात्र, मतदारांशी केजरीवालांनी जो धागा बांधला, तो लोककल्याणाचा होता. मतदारांना लागणाऱ्या किमान सोयी मोफत द्यायच्या, हा फंडा होता. शिवाय गरिबातील गरिबाला शिक्षण व आरोग्य सेवा किफायतशीर दरात द्यायची. ‘आप’वाले म्हणायचे, राजकारणी पैसे खातात. त्यामुळे त्यांनी बळेच या सेवा महागड्या बनवून ठेवल्या आहेत. मग नेत्यांनी वैयक्तिक पैसा खायचा नाही, तो पक्षाला मिळायला हवा. हा मंत्र या पक्षाने स्वीकारला. भाजपचीच ही रीत; परंतु त्यासाठी मतदारांकडून त्यांना वैधता मिळाली नाही.
राष्ट्रीय पक्ष बनवून स्वतः मोदींपुढे स्वतःला उभे करण्याची ईर्षा, यामधून केजरीवालांना दिल्ली गमवावी लागली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी त्यांनी एकाचवेळी तीन-चार राज्यांमध्ये राजकीय मोहिमा सुरू केल्या. दुसरे, पक्षात त्यांनी एकाधिकारशाही सुरू केली. सारे अधिकार त्यांना स्वतःच्या हातात हवे होते.
परिणामी पक्षात गट निर्माण झाले. राष्ट्रीय पक्ष म्हणून कार्य चालविण्यासाठी राज्यांमध्ये कार्यकर्त्यांची फळी निर्माण करायला हवी होती. केवळ केजरीवालांचा चेहरा बघून ते होणार नव्हते. गोव्यात स्थानिक मुद्दे हवे होते. गोव्यानंतर तेलंगणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये थेट निवडणुकीत उतरण्याऐवजी मोहल्ला क्लिनिक, सरकारी शाळांचा नमुना, अशी कामे सुरू व्हायला हवी होती; परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून ‘आप’ला उभा करण्याच्या नादात त्यांचे दिल्लीकडे दुर्लक्ष झाले.
गोव्यात दोन वर्षांत ते अनेकवेळा आले आणि दिल्लीतही त्यांनी अधिकारांची विभागणी केली नाही. तसेच पंजाबबाबत घडले. सारे निर्णय त्यांच्या भोवतीच फिरत होते. महत्त्वाचे म्हणजे, दिल्लीच्या पैशांतून देशभरातील प्रसारमाध्यमांना जाहिराती दिल्या जाताहेत, हे लोकांना दिसत होते. दिल्लीत तयार होणारा पैसा, विशेषतः अबकारी धोरणातील काळा पैसा गोवा व अन्य राज्यांत निवडणुकीसाठी वळविल्याचा आरोप दिल्लीतील मतदारांपर्यंत पोहोचला.
गेल्या काही वर्षांत निकटच्या सहकाऱ्यांना दूर करणाऱ्या केजरीवालांनी सत्ता स्वतःभोवतीच फिरती ठेवली होती. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता, जनतेसाठी रस्त्यावर येऊन लढणारा सरळ, साधा, सामान्य माणूस ही त्यांची प्रतिमा पुसट होत गेली.
परंतु केजरीवालांच्या त्या प्रतिमेपेक्षा देशभरातील बुद्धिवादी लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले होते, ती होती निधर्मी प्रतिमा. मात्र, ती काळवंडून गेली. कारण केजरीवालांनी सौम्य हिंदुत्ववादाचा पुरस्कार केला. मोफत तीर्थयात्रा, हनुमान चालिसा पठण, संघाच्या प्रमुखांना पत्र लिहिणे असे अनेक प्रकार त्यांनी केले, ज्यामुळे भाजप आणि त्यांच्यात फरक काय, असा प्रश्न लोकांना पडला.
किमान राहुल गांधी उजव्या शक्तींचे कडवे टीकाकार म्हणून स्वतःला पुढे आणतात. त्यामुळे विरोधकांमध्ये त्यांचा चेहरा उजळ वाटतो. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना आव्हान देऊ शकणारा एकमेव चेहरा, अशी केजरीवालांची प्रतिमा निर्माण झाली होती; परंतु भाजपच्या प्रवृत्तीपासून ठळक वेगळेपण त्यांनी काय जोपासले, असा प्रश्न उपस्थित झाला. भाजपने आपल्यावर समोरून थेट हल्ला करू नये म्हणून केजरीवालांनी पांघरलेली ती शाल आहे, असेही सांगण्यात आले. मुळात केजरीवालांना संघानेच आंदोलनातून पुढे आणले होते, असा आरोप होताच. आपल्याला आजच्या लेखात याच त्यांच्या प्रतिमेची चिरफाड करायची आहे.
२०२२च्या गुजरात निवडणुकीपर्यंत केजरीवाल नरेंद्र मोदींचे थेट विरोधक, कडवे टीकाकार होते. ‘मालिका हत्यारे’ (सिरीयल किलर) अशी संज्ञाही त्यांनी तयार केली होती, जिला जनमानसात पोहोचायला वेळ लागला नाही. त्यांची प्रचारातील रोखठोक भाषा, पंतप्रधानांची खिल्ली उडविण्याची पद्धत, यांमुळे त्यांना प्रसार माध्यमांमध्ये वारेमाप प्रसिद्धी मिळू लागली. एवढेच नव्हे, तर ‘आप’ला भाजपच्या समोर आणून उभे करण्यातही ते यशस्वी ठरले. त्यावेळी त्यांच्या हातात असलेला आरोग्य व शिक्षण सेवांचा दिल्ली नमुना जबरदस्त पर्याय म्हणून पाहण्यात आला.
परंतु गुजरातमध्ये प्रचाराची राळ उडवून दिलेल्या केजरीवालांनी त्यावेळी बिल्कीस बानो प्रकरणात ‘ब्र’ काढला नाही. गुजरात दंगलीत सहभागी झालेल्या ११ जणांची मुक्तता देशभर धक्का देणारी घटना होती. परंतु खून व बलात्कारासारखे गंभीर आरोप असलेले हे लोक उजळ माथ्याने तुरुंगातून बाहेर आले आणि ठिकठिकाणी त्यांचे सत्कारही केले जाऊ लागले. त्यांनी बिल्कीस बानोच्या तीन वर्षीय बालकाची हत्या तर केलीच; परंतु बानोवर अमानुष बलात्कार केला होता. त्याच सुडाच्या भावनेतून त्यांनी हत्यांचे सत्रच आरंभले, ज्याच्या भयंकर कथानकांनी लोकांच्या अंगावर शहारे आणले होते.
राजकीय भाष्यकार पीटर रोनाल्ड डिसुझा यांनी (‘फाऊस्टियन बार्गेन’ या लेखात) केजरीवाल्यांच्या मौनाचा योग्य शब्दांत समाचार घेतला आहे. गुजरातेत त्या काळात विद्वेषाची होळी पेटवण्यात आली. त्यामुळे वातावरण प्रक्षुब्ध बनले. लोकांच्या डोक्यावर सैतान स्वार झाला. माणुसकीने शरमेने खाली मान घातली.
त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे, न्यायालयाने या लोकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली; परंतु सरकारने आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून त्यांची सजा पूर्ण झाल्याचा दावा करून त्यांची सुटका केली होती. त्यांचे पुष्पहार घालून स्वागत झाले. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची छायाचित्रे पाहून या देशाची आणखी किती अधोगती होणार आहे, असा प्रश्न जनतेला पडला. समाजाची सदसद्विवेकबुद्धी कुठे गहाण पडली आहे, जनतेमध्ये संताप का उसळी मारून उठत नाही, असे प्रश्न निर्माण झाले. राजकारण्यांना किमान नैतिकता राहिली नाही का? केवळ सत्ता हीच त्यांच्यासाठी प्राधान्याची गोष्ट बनली आहे काय? गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपने हा नीचांक कसा काय गाठला?
एका बाजूला देशभर लोक आक्रंदन करीत होते, अस्वस्थ बनले होते आणि अरविंद केजरीवाल मौनीबाबा बनले होते. गुजरातची निवडणूक लक्षात घेऊन या गंभीर; परंतु संवेदनशील विषयावर भाष्य करायचे नाही, अशी त्यांची भूमिका होती.
पीटर रोनाल्ड डिसुझा यांनी या त्यांच्या प्रवृत्तीची ‘अत्यंत लाजिरवाणी तडजोड’ असे वर्णन केले होते. (फाऊस्टियन तडजोडीसारखीच लाजिरवाणी! ‘फाऊस्त’ ही जर्मनीतील एक दंतकथा, ज्यात फाऊस्त स्वार्थासाठी तत्त्वे खुंटीला टांगतो. त्यावर खूप साहित्य रचण्यात आले आहे.) कोलंबिया विद्यापीठाचे राजकीय संशोधक इरा काजनेल्सन यांनी अमेरिकी अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचे वर्णन असेच केले होते, त्याचा हवाला देत डिसुझा यांनी म्हटले, निवडणुकीत जिंकण्यासाठी रुझवेल्ट अत्यंत खालच्या पातळीवर घसरून घाणेरडी तडजोड करू लागले होते. त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील मंदी दूर झाली असेल, अर्थव्यवस्थेचे नवे स्रोत तयार झाले व भांडवली राज्याचे नव्याने सबलीकरण घडले असेल - पुढे या अध्यक्षाने त्या देशाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईतही लोटले.
- परंतु हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रुझवेल्टनी अनेक गंभीर तडजोडी केल्या, ज्यामुळे इतिहासात त्यांची प्रतिमा काळवंडली. १३ दक्षिणी राज्यांमध्ये गुलामगिरीला अधिकृत मान्यता होती. १८१२ ते १८५० या काळात अमेरिकेत कृष्णवर्णीयांची गुलामगिरी अनेक दृष्टीने उपयुक्त असल्याचा दृष्टिकोन होता. अमेरिकन काँग्रेसला काही कायदे संमत करण्यासाठी या राज्यांचा पाठिंबा मिळवावा लागला.
या नव्या व्यवस्थेसाठी रुझवेल्टनी या १३ राज्यांच्या सरंजामी वंशवादी प्रतिगामित्वाकडे काणाडोळा केला. एवढेच नव्हे, तर कृष्णवर्णीयांच्या देहदंडाला नेस्तनाबूद करण्याच्या नागरी हक्क कार्यकर्त्यांच्या मागणीवर हस्तक्षेप करण्यास नकार दिला. शिवाय कृष्णवर्णीयांना आपापसात मिसळू न देणे, त्यांच्या वस्त्या अलग ठेवणे आदी कालबाह्य प्रकारांचे रुझवेल्टनी समर्थन करून अमेरिकेत वंशवाद जोपासला, तरी अमेरिकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आपण हे सारे करतो आहोत, असा त्यांचा दावा होता.
पीटर डिसुझा यांच्या मते, केजरीवालांचे मौन याच फाऊस्तांच्या ‘लाजिरवाण्या तडजोडी’सारखे होते. कारण दिल्ली आणि पंजाब येथे त्यांनी सार्वजनिक शिक्षण व आरोग्यविषयक योजना राबविल्या, ज्या त्यांना नंतर गुजरातमध्ये न्यायच्या होत्या, त्यासाठी त्यांना ‘सौम्य हिंदुत्ववाद’ गरजेचा वाटला. केजरीवालांचा जबरदस्त प्रतिस्पर्धी भाजप जेव्हा कडव्या हिंदुत्ववादाची फळे चाखतो आहे, तेव्हा सौम्य हिंदुत्ववाद - जोडीला सुव्यवस्थापनाची कार्यवाही आपल्याला जिंकणारे राजकीय सूत्र मिळवून देईल, असे केजरीवालांचे मत बनले होते.
प्रा. काजनेल्सन यांना रुझवेल्ट यांची दक्षिणी वंशवादी तडजोड महाभयंकर वाटली. तसाच काहीसा समझोता केजरीवाल करीत होते व ११ जणांच्या मुक्ततेची दखल घ्यायलाही ते तयार नव्हते, तेथेही अश्लाघ्य पातळी ते गाठत नव्हते काय?
ब्रह्मदेशाच्या आंग सान स्यू यांनी सत्तेवर येण्यासाठी ब्रह्मदेशाच्या लष्करी हुकूमशहांशी तडजोड केली होती. रोहिंग्यांवर लष्कराने दडपशाही केली. परिणामी त्यांना देश सोडून जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला. सत्तेवर येण्यासाठी या दडपशाहीकडे काणाडोळा करण्याच्या स्यू यांच्या प्रवृत्तीचे वर्णन पीटर डिसुझा यांनी अशाच ‘अश्लाघ्य तडजोडी’ असे केले. या प्रवृत्तीसाठी स्यू यांची जगभर निर्भर्त्सना झाली. एवढी की, त्यांचे नोबेल परत घेण्यात यावे, अशी मागणी झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी असाच समझोता केला. नवीन पटनाईक यांनीही भाजपची साथ केली. न्या. रंजन गोगोई यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.
गोव्यात भाजपने खाण व्यवसायातील ‘गुन्हेगारांची’ पाठराखण केली. पर्रीकरांची ही कोलांटी उडी होती. गोवा फॉरवर्डने पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पाठिंबा दिला. शशिकला काकोडकर यांनी मगोप काँग्रेसमध्ये विलीन केला. लुईस प्रोत बार्बोझा यांनी काँग्रेस फुटिरांना घेऊन मगोपशी हातमिळवणी केली. माथानी साल्ढाणा यांनी पर्रीकरांची साथ केली. दिगंबर कामत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवाची शपथ घेऊनही भाजपमध्ये प्रवेश केला. उदय भेंब्रे यांनी आमदारकीची कारकीर्द संपण्यापूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला; त्यांनी नंतर प्रादेशिक भाषांमधील शिक्षणाच्या ‘उदात्त हेतूने’ सुभाष वेलिंगकरांशीही हातमिळवणी केली... या सर्व अक्षम्य घोडचुका किंवा प्रमाद राज्याच्या हिताशी तडजोड करणाऱ्या म्हणून ‘महाभयंकर’ नव्हत्या काय?
ही महाभयंकर तडजोड म्हणजे काय? आपल्या सर्वोच्च तात्त्विक व मूलभूत वैचारिक भूमिकेशी फारकत घेणे! सत्ता सवलत प्राप्त करण्यासाठी, एखादा क्षणिक आर्थिक लाभ किंवा स्वार्थी हेतूने तडजोड! या तडजोडीची शरम सहजासहजी निघत नाही. ती चिकटून बसते. लोकांच्या स्मरणात राहते.
अशा पद्धतीच्या तडजोडी- ज्या चुकाच असतात व सर्वसामान्यांच्या जीवनात, राजकीय व्यवस्थेत खेळखंडोबा निर्माण करतात. कारण ज्यांच्याकडे आशेने पाहिले, तो त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करीत असतो. त्या केवळ मोठ्या राजकीय नेत्यांना- रुझवेल्ट सारख्यांनाच लागू होतात का? नाही, तर सर्वांनाच लागू होतात. त्या तडजोडी करण्यामागे काहीवेळा सार्वजनिक हिताचा विचार असेलही.
परंतु सर्वच अशा तडजोडी करीत नाहीत...
पीटर डिसुझा म्हणतात, अनेक राजकारणी लाजिरवाण्या तडजोडी करण्यापेक्षा आपले राजकीय चारित्र्य अबाधित ठेवण्यासाठी कितीही मोठ्या त्यागाची तयारी ठेवतात. आपली वैचारिक भूमिका लवचीक ठेवून कसल्याही पातळीवर जात तडजोडी करीत, नफ्याला चिकटून राहत, भविष्यातील काही लाभांसाठी हे लोक मिळेल त्याची शय्यासोबत करीत असतात. गांधीजी अशा नेत्यांपैकी नव्हते, म्हणून ते ‘महात्मा’ बनले.
आयुष्याची किंमत देण्याची वेळ आली, तरी त्यांनी तडजोड केली नाही. त्याचप्रमाणे नेल्सन मंडेला, जवाहरलाल नेहरू किंवा रवींद्रनाथ टागोर. बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू बिलासंदर्भात नेहरूंशी पटले नाही, तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यांचे राजीनामापत्र एका तत्त्वनिष्ठ नेत्याची नीती तेजस्वी असू शकते, याचा प्रत्यय आणून देते.
पीटर डिसुझा विचारतात, सध्याच्या नेत्यांना इतक्या सहज नीतिमूल्यांचा त्याग करताना काहीच कसे वाटत नाही? त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- केवळ दिल्लीतच या शरमेच्या तडजोडीचा ‘आप’ला फटका बसला नाही, तर गोव्यासारख्या ठिकाणीही लोकांनी ‘आप’ आणि केजरीवालांकडून अपेक्षा ठेवली होती. त्या भावनांचा त्यांनी चक्काचूर केला!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.