मिलिंद म्हाडगुत
इफ्फीची आणखी एक आवृत्ती संपली. या देशातील ५५व्या व गोव्यातील २१व्या आवृत्तीत जमेच्या बाजूने हाताला काही विशेष लागले असेही नाही. नाही म्हणायला यंदा फोंड्यात इफ्फीचे चित्रपट दाखवून एक चांगला पायंडा पाडण्यात आला खरा, पण तिथेही नियोजनाच्या अभावामुळे निराशाच पदरी पडली. चित्रपटांना प्रेक्षकच नसल्यामुळे तो एक ‘फ्लॉप शो’ ठरला.
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत इफ्फीत बाहेरचे लोकच अधिक दिसत होते. उद्घाटन व समारंभाच्या सोहळ्याचे सूत्रसंचालकसुद्धा बाहेरचे. गोव्यात इफ्फीचे सूत्रसंचालन करू शकणारा एकही सूत्रसंचालक नाही, असाच याचा अर्थ होतो. गोवा हे इफ्फीचे यजमान केंद्र आहे, याचा आपल्याला विसर पडत चालला आहे असेच यावरून दिसते. मुख्यमंत्री तर म्हणतात की, ‘गोवा व इफ्फी एकरूप झाला आहे’; असे असेल तर मग आपल्याला लाखो रुपये देऊन बाहेरच्या सूत्रसंचालकाला आयात करायला का लागावे? २१ वर्षांत आपण या सोहळ्यांना योग्य असा एकही स्थानिक सूत्रसंचालक तयार करू शकलो नाही, असाच याचा अन्वयार्थ निघू शकतो.
गोमंतकीय चित्रपटांबाबतही असेच म्हणता येऊ शकेल. यावर्षी गोमंतकीय विभागात १४ चित्रपट निवडले गेले, असे म्हटले जात असले तरी त्यातले बहुतेक हे माहितीपट व लघुपट होते. त्यात परत या चित्रपटांचे प्रदर्शन एका चित्रपटाच्या वेळेत लागोपाठ तीन-चार कलाकृती अशा पद्धतीने करण्यात आले. आता या कलाकृतींची वेळच कमी असल्यामुळे(सरासरी पंधरा ते वीस मिनिटे) आम्हांला तसे करणे भाग पडले असे आयोजक सांगतात. काहींना तर सकाळची ९:१५ ची वेळ देण्यात आली होती. हा म्हणजे आंघोळीच्या नावाखाली पाण्यात बुचकळून बाहेर काढण्याचा प्रकार झाला!
२००४साली झालेल्या पहिल्या इफ्फीत ‘आलिशा’ आणि ‘सूड’ हे दोन पूर्ण लांबीचे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यापैकी ‘आलिशा’ नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन चांगला यशस्वीही ठरला होता. ‘सूड’ व ‘आलिशा’ हे दोन चित्रपट इफ्फीत प्रदर्शित झाल्यानंतर आता गोमंतकीय चित्रपटांचे पीक येईल, असा आशावाद तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला होता. पण आज २१ वर्षानंतर हे पीक कोठे गेले याचा शोध खरे तर विद्यमान सरकारने घ्यायला हवा.
तसा बऱ्याच अन्य गोष्टींचाही शोध घ्यावा लागेल. इफ्फीला गोव्यात येऊन २१ वर्षे झाली तरी या महोत्सवाचा उद्घाटन व समारोप सोहळा साजरा करण्याकरता अजूनही श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम का गाठावे लागते, याचाही शोध घ्यावा लागेल. या सोहळ्याकरता दोनापावला येथे भव्य परिषदगृह बांधणार असे अनेक वेळा जाहीर करण्यात आले आहे. खरे तर इफ्फीला ज्या साधनसुविधा आवश्यक होत्या, त्यात या परिषदगृहाचाही समावेश होता आणि दोन वर्षांत हे परिषदगृह उभारू, असे गोवा सरकारतर्फे आश्वासनही देण्यात आले होते. पण २१ वर्षे होऊनही अद्याप, ‘बोलाची कढी व बोलाचाच भात’, असा प्रकार आहे. त्यामुळे आता उद्घाटन व समारोप सोहळे एकीकडे तर चित्रपट प्रदर्शन दुसरीकडे असा द्राविडी प्राणायाम प्रतिनिधींना करावा लागत आहे. या वेळच्या इफ्फीतले काही चित्रपट चांगले होते पण एकंदरीत विचार केल्यास चित्रपटांचा दर्जा घसरायला लागला आहे एवढे निश्चित. म्हणूनच तर आजसुद्धा २००५च्या इफ्फीत प्रदर्शित झालेल्या ‘ओलगा’सारख्या चित्रपटांची याद येते. त्यात परत यंदा चांगल्या चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ न दिल्यामुळे प्रतिनिधींचा हिरमोड झाला.
उद्घाटन सोहळा बराच लांबला तर समारोप सोहळा अपेक्षेएवढा रंगू शकला नाही. समारोपाचा चित्रपट ‘ड्राय सीजन’ मात्र प्रतिनिधींची मने जिंकून गेला. इफ्फीची यंदा म्हणावी तशी वातावरणनिर्मितीही झालेली दिसली नाही. पूर्वी इफ्फीच्या काळात कला अकादमी ते आयनॉक्स परिसरात ठिकठिकाणी व्यासपीठे घालून विविध प्रकारचे कार्यक्रम केले जायचे. त्यामुळे वातावरणनिर्मितीबरोबर गोव्यातील कलाकारांनाही कला सादर करण्याकरता चांगली संधी मिळायची. यंदा कला अकादमीत इफ्फीचे चित्रपट दाखवले गेले नसले तरी रमेश सिप्पी, सुभाष घई यांसारख्या नामांकित कलाकारांनी घेतलेल्या ‘मास्टर क्लासेस’नी प्रतिनिधींच्या ज्ञानात चांगलीच भर पडली.
यावेळी एक रणवीर कपूरचा अपवाद वगळता बॉलिवुडातील एकही मोठा कलाकार इफ्फीत दिसला नाही. मात्र बऱ्याच जुन्या सिताऱ्यांनी प्रेक्षकांची मने वेधून घेतली. खास करून एक काळ गाजवणाऱ्या राखी या अभिनेत्रीचे प्रदीर्घ काळानंतर झालेले जाहीर दर्शन बऱ्याच प्रतिनिधींचा उत्साह वाढविण्यास कारणीभूत ठरले. पण यंदाच्या इफ्फीतील सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे गोव्यातील फिल्ममेकर्स करता आयोजित केलेले ‘मास्टर क्लास’.
तीन दिवस आयोजित केलेल्या या क्लासेसना दोन वर्षांपूर्वी मिळाला तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी उपस्थित असलेल्या स्थानिक फिल्ममेकर्सची ऊर्जा, हा उपक्रम वाढवून गेला यात शंकाच नाही. खास करून शरीक पटेल यांचे मार्गदर्शन युवा सिनेकर्मींना बरेच काही शिकवून गेले. म्हणूनच हा उपक्रम मनोरंजन संस्थेने विनाखंड चालू ठेवायला हवा. बॉलिवूडचा ‘शोमॅन’ राज कपूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेला ‘राज कपूर महोत्सव’ जुन्या आठवणी ताज्या करून गेला.
या एकविसाव्या इफ्फीच्या बऱ्या वाईट आठवणी मनावर रेंगाळत असताना ‘उम्मीद पे दुनिया कायम है’ ही उक्ती याद यायला लागते. पुढील वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीचा अजरामर चित्रपट ‘शोले’चे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे ५६वा इफ्फी ‘शोले विशेष’ असणार आहे. त्यामुळे पुढचा इफ्फीतरी सिनेप्रेमींसाठी व खास करून गोव्यातील फिल्ममेकर्ससाठी ‘विशेष’ असेल अशी आशा उराशी धरून प्रतिनिधी या ५५व्या इफ्फीला ‘अलविदा’ करताना दिसत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.