काही दिवसांपूर्वी ‘मगोप’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सध्या पक्षाचे ‘एकला चलो रे’ हे धोरण असल्याचे (Goa Politics) स्पष्ट केले. त्याचबरोबर भाजपबरोबर युती (Alliance with BJP) करण्याचा संभव नाही, हे घोषवाक्यही परत एकदा आळवले. तत्पूर्वी मगोपचे (MGP) सर्वेसर्वा आमदार सुदिन ढवळीकर (MLA Sudin Dhawalikar) यांनी भाजपशी युती करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे असल्याचे सांगून पक्ष भाजपच्या विरोधात असल्याचे वक्तत्व केले होते. लगेच ‘घुमजाव’ करून त्यांनी भाजप जर ‘ज्या’ बारा जागांवर आमचे उमेदवार ठरले आहेत, त्या जागा दिल्या तर भाजपकडे युती होऊ शकते, असे सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी परत ‘यु टर्न’ घेऊन सुदिनांनी ते माझे गोंधळलेल्या अवस्थेतील वक्तव्य होते, असे म्हणत जनतेलाच गोंधळात टाकले.
आता एकामागोमाग एक अशा या वक्तव्यातील गोंधळामुळे कोणत्या वक्तव्यावर विश्वास ठेवावा, हेच जनतेला कळेनासे झाले आहे. केंद्रीय समिती निर्णय घेणार वगैरे सांगणे ठीक आहे. पण, मगोपची केंद्रीय समिती कुणाच्या इशाऱ्यावर नाचते, हे सांगायला तत्वेत्याची गरज नाही. जेव्हा सुदिन आम आदमीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटायला गेले होते, त्यावेळी ‘आप’ व ‘मगोप’ यांची युती होणार अशी चर्चा होती. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जेव्हा गोव्यात आल्या होत्या, तेव्हा त्यांची भेट घेणाऱ्या सुदिनांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगून युतीबाबतच्या शक्यतेवर पडदा टाकला होता. यातून सुदिन आपली ‘बार्गेनिंग पॉवर’ तर वाढविण्याचा प्रयत्न करत नाही ना? असेच वाटायला लागले आहे. सध्या मगोपचे बारा जागांवर उमेदवार निश्चित आहेत, हे सत्य आहे.
पण उमेदवार निश्चित केले म्हणून संघटनेला बळकटी मिळतेच असे नाही. 2017 साली निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बाबू आजगावकर यांनी ‘मगोपा’त उडी मारून उमेदवारी मिळविली होती आणि ते निवडूनही आले होते. पण, त्याचा फायदा मगोपेक्षा भाजपलाच अधिक झाल्याचे सध्या दिसते आहे. दीपक पाऊसकरांबाबत तेच सांगता येईल. आपण ‘मगोपा’त होतो तेव्हा आपल्याबरोबर 15 हजार कार्यकर्त्यांची फौज होती, असे ते प्रतिपादन करत असतात. आज सावर्डे मतदारसंघात मगोपजवळ हजार कार्यकर्तेही नाहीत, अशी ते आपल्या प्रतिपादनाला पुस्तीही जोडतात. पाऊसकर हे निवडून येऊनही मगोपात का राहिले नाहीत, हाच खरा प्रश्न आहे. मगोपला हा मोठा शाप आहे. मगोपच्या अनेक नेत्यांच्या फुटीर वृत्तीमुळे पक्षाची ही आज अशी दुरावस्था झाली आहे.
1999 पासून सुदिन यांनी मगोपात प्रवेश केल्यापासूनचा इतिहास पाहिल्यास सुदिन व दीपक सोडल्यास पूर्वीचा असा एकही नेता मगोपात दिसत नाही. पांडुरंग मडकईकर, लवू मामलेदार, बाबू आजगावकर, दीपक पाऊसकर या सर्व आमदारांनी मगोपातून निवडून येऊनसुद्धा पक्षाला कधीच रामराम ठोकला आहे. यामुळेच मगो पक्ष ही विधानसभेत पोहोचण्याची शिडी तर नाही ना? असेच वाटायला लागले आहे.
आता जे बारा उमेदवार पक्षाने निवडले आहेत त्यापैकी फक्त सुदिन व दीपक यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार 2017 साली झालेल्या निवडणुकीच्यावेळी पक्षात साधा कार्यकर्ता नव्हता. निवडून आल्यावर दीपक पाऊसकरांसारखे स्वतःच्या शक्तीवर निवडून आलो, असे सांगायला ते यामुळेच मोकळे होतात. पक्षाचे कार्य न केल्यामुळे त्यांची पक्षांशी बांधिलकीच राहत नाही. मगो पक्ष स्वबळावर सत्तेवर येणे शक्य नाही, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे मगोपला सरकारात येण्यासाठी काँग्रेस वा भाजपशी जुळवून घ्यावे लागते. आता या सोयरीकीत सुदिनांचे मंत्रिपद निश्चित असते. इतरांपैकी एखाद्याला मंत्रिपद मिळू शकते. मग, राहिलेले मगोचे आमदार सरळ त्या मुख्य पक्षात उडी घेऊन थेट मंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सध्या या राजकारणाला व्यावहारिक दृष्टीकोनाचा वास यायला लागला आहे. आता हे जे बारा उमेदवार पक्षाने घोषित केले. त्यापैकी काहीजण निवडून आले, तर ते मगोमध्ये राहतील की काय? याची यामुळेच शंका वाटते. सुदिन- दीपकांना ते माहित नाही असे नाही. पण त्यांच्या पुढे दुसरा पर्यायही नाही.
सध्या राज्यात भाजपची स्थिती तशी बिकटच आहे. मगोपशी युती न केल्यास ती अति बिकट होऊ शकते, याचा अंदाज एव्हाना भाजपला आला आहे. म्हणूनच तर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे युतीला अनुकुल व्हायला लागले आहेत.
युती झाली म्हणून भाजप मगोपला बारा जागा देईल, याची सूतराम शक्यता नाही. याचे कारण म्हणजे ज्या बारा जागांवर मगोपने काम सुरू केले तिथे भाजपचाही प्रभाव दिसतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाच ते सहा जागांवर ही युती होऊ शकते. काँग्रेसशी युती करून मगोपचा विशेष फायदा होणार नाही. याचे कारण म्हणजे मगोप व काँग्रेसचे मतदार हे भिन्न आहेत. यासाठी मगोपला जोडी जुळवावी लागेल, तर ती भाजपाशीच. तीनवेळा भाजपने आपला घात केला, असे मगोप नेते कंठशोष करीत असले, तरी याच भाजप सरकारात सुदिन ढवळीकरांनी सार्वजनिक बांधकाम खात्यासारखे महत्त्वाचे मंत्रीपद भूषविले होते, हे विसरता कामा नये. म्हणूनच आता जरी पक्षाची भूमिका ‘एकला चलो रे’ अशी असली तरी येत्या काही दिवसांत ‘तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना’ असे म्हणत एकाचे दोन व्हायला वेळ लागणार नाही हेच खरे.
मिलिंद म्हाडगुत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.