Goa Politics : In 22 years, Congress ruled for seven years and BJP for fifteen years  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपाची दैना.. सावंतांचा उपद्रव कसा भरून काढणार?

गेल्या 22 वर्षांत काँग्रेसने सात तर भाजपाने पंधरा वर्षे सत्ता भोगली. या दरम्यान त्यांनी गोव्याला जुगार-सेक्स-ड्रग पर्यटनाची राजधानी बनवून टाकले.

दैनिक गोमन्तक

सन 2012-17 कार्यकाळांतील “यू-टर्न” राज्यकारभारामुळे गेल्या निवडणुकीत भाजपा एकवीस वरून तेरावर कोसळली होती. तरी त्यांनी जनाधार नसताना मागील दाराने सत्ता काबीज केली. त्यानंतर सरकार आजारी बनले. (Goa Politics) धोरण लकवा व ठप्प प्रशासनामुळे प्रजा जर्जर झाली. मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर कार्यक्षम असे नवे सरकार बनवण्यासाठी भाजपाकडे माणसे होती; परंतु त्यांत संघाचा खोडा पडला. भाजपा (BJP) विधिमंडळांतील संघाच्या वळणाचे एकच वासरू व बाकी काँग्रेसी गायी. नाईलाजाने अनुभव नसलेल्या वासराच्याच गळ्यांत मुख्यमंत्रीपदाची माळ घालावी लागली. मुरब्बी मनोहर पर्रीकर जसे मित्रपक्षांना हाताळायचे तशी क्षमता प्रमोद सावंतांना नव्हती; त्यामुळे मित्रपक्षांना लाथाडून भाजपाचेच सरकार बनवल्याशिवाय सरकारच्या स्थिरतेला धोका होता. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) तेरा व मगोच्या (MGP) दोन अशा पंधरा जणांना फितुरी करण्यास भाजपाने फूस लावली. अशा प्रकारे सत्तावीस आमदारांच्या भारदस्त समर्थनावर सावंतांनी दिवस काढले.

पंधरा आमदारांच्या घोडेबाजाराने पर्रीकरांची त्रुटी भरून काढली; परंतु सावंतांचा उपद्रव कसा भरून काढणार? भर पावसांत झाडांना पाणी देणे, मास्कने तोंड पुसणे या गोष्टी बाजूला ठेवा; परंतु लॉकडाऊन वेळच्या घोळास सर्वथा तेच कारणीभूत होते. लॉकडाऊन अकस्मात लादला गेला होता. अन्नसाठा करण्यास जनतेस वेळ मिळाला नव्हता. घरी कुटुंब उपाशी; बाप गेलाय रेशन आणण्यास. अशांची कींव करण्याऐवजी त्यांना पोलिसांकरवी बदडले. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यामागच्या भ्रष्टाचारी कारस्थानाला हल्लीच वाचा फोडली. घरपोच माल पोहोचविण्याच्या सबबीवर बक्कळ नफेखोरी करण्याचा मंत्र्यांचा इरादा होता. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील व्यक्तींना हे कंत्राट देण्यासाठी सगळा अट्टाहास चालू होता, असा आरोप माजी राज्यपालांनी केला.

प्राणवायूचा तुटवडा व त्यामुळे गेलेला कित्येकांचा जीव याच्याशी भाजपाला सोयर-सुतक नव्हते. खाण अवलंबितांना आगामी निवडणुकीत पण फसवू असा त्यांचा होरा आहे. विधानसभा, लोकसभा, झेडपी, पंचायत व नगरपालिका अशा तब्बल आठ निवडणुकीत त्यांना अक्षरशः मामा बनवले आहे. खाणकाम चालू होईल असे गाजर दाखवून प्रत्येक निवडणुकीत त्यांची मतें मिळविली. बेरोजगारी राज्याला वाळवीसारखी खोकला बनवीत आहे. शिक्षणाचा घसरलेला दर्जा गोव्याला जडलेला कर्करोग आहे. गेल्या 22 वर्षांत काँग्रेसने सात तर भाजपाने पंधरा वर्षे सत्ता भोगली. या दरम्यान त्यांनी गोव्याला जुगार-सेक्स-ड्रग पर्यटनाची राजधानी बनवून टाकले.

भाजपाने गोव्याला "कॅसिनो राजधानी" बनवली याचे श्रेय घेत भाजपाचे केंद्रीय संस्कृती मंत्री किशन रेड्डी शेखी मिरवत होते. अजून एक केंद्रीय मंत्री पियुष गोयल गोव्याला "मिनी पोर्तुगाल" बनवण्याची भाषा करत होते. भाजपा हाय-कमांडचे आदेश पण गोव्यांत दूरगामी अनर्थ घडवणारे असेच आहेत. म्हादईच्या होऊ घातलेल्या निर्जलीकरणाला जबाबदार भाजपाचे केंद्रीय श्रेष्ठी. कर्नाटक मोठा व गोवा छोटा; म्हणून गोव्याचे पाणी कर्नाटकाला? सत्तेसाठी न्यायाचा खून? हाय-कमांडचे "क्रोनी" गोव्याची वाट लावत आहेत. कोळसा प्रदूषणाने वास्को काळवंडलेय; लोक त्रस्त झालेय. कोळसा गोव्याबाहेरून येतोय व गोव्याबाहेर जातोय. गोव्याला ना गरज ना फायदा; तरी गोवेकरांना कोळशाची धूळ व भुकटी. प्रवासी गाड्या १० टक्के सुद्धा नाहीत; फक्त अदानी-जिंदालसाठी दुपदरीकरण? स्वस्त सौर उर्जेऐवजी कोळशाची महागडी वीज भाजपा गोव्यावर कां लादतेय? शिवाय पश्चिम घाटास मारक अशी महागडी तनमार ट्रान्समिशन लाईन?

राज्य सरकारच्या घोळांमुळे प्रजेत असंतोष माजलेला आहे तर केंद्राच्या अरेरावीमुळे भाजपाबद्दलची घृणा शिगेस पोहोचली आहे. एक मंत्री सेक्स लफड्यांत अडकला आहे. भाजपा पाठीराखे बाकी काँग्रेसी आमदारांचा तिरस्कार करत आलेले आहेत. हे आयात आमदार भाजपा कार्यकर्त्यांना किंमत देत नाहीत तरी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काम करावे, अशी पक्षश्रेष्ठींचा अपेक्षा. जुने निष्ठावान नेते प्रभावी नाहीत व ते निवडून येऊ शकत नाहीत असे भाजपाचे मत बनले आहे. त्यामुळे कार्यकर्ते व नेत्यांचा कडीपत्ता करत भाजपा अजून काँग्रेसी नेत्यांना चुचकारत आहे. हल्लीच रवी नाईक व जयेश साळगावकर यांना आयात करावे लागले. भाजपा पूर्ण काँग्रेससयुक्त झालेली आहे.

हिंदुबहुल मतदारसंघांत अहिंदू उमेदवार लादण्याचा अपराध गोव्याच्या इतिहासांत क्वचितच झाला आहे. फक्त भाजपाने इतक्या घाऊक प्रमाणात तसे केले. हिंदू-हिंदू करत शेवटी दगा दिला. लोकसंख्येच्या फक्त 25 टक्के असलेल्या समाजाला 55 टक्के प्रतिनिधित्व व 67 टक्के हिंदूंना 45 टक्के प्रतिनिधित्व? हिंदू मतदारांचा हाअधिक्षेपच नव्हे काय? भाजपने केलेली बहुजन समाजाची अवहेलना न सहन होऊन त्या समाजाने भाजपाच्या बहुसंख्य उमेदवारांना गेल्या निवडणुकीत पाडले होते. आगामी निवडणुकीत या पेक्षाही उग्र रूप दिसेल. मगोपने दिलेला दणका भाजपाच्या आकांक्षां ठोकलेला शेवटचा खिळा आहे.

राजेंद्र काकोडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT