Shri Jagareshwar Temple Jagor Jatra Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Siolim Jagor Jatra: "सगळे देवू एकूच..."! मध्यरात्री सगळे ‘दांडो’ वाड्यावरील जागरेश्वराच्या दिशेने वळतात; शिवोलीचा जागोर

Shri Jagareshwar Temple Jagor Jatra Siolim: ज्या रात्री हा सुप्रसिद्ध जागोर सादर होतो, त्या रात्री शिवोली गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सारे रस्ते तिथल्या ‘दांडो’ या वाड्यावरील जागरेश्वराच्या दिशेने वळलेले असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

ज्या रात्री हा सुप्रसिद्ध जागोर सादर होतो, त्या रात्री शिवोली गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सारे रस्ते तिथल्या ‘दांडो’ या वाड्यावरील जागरेश्वराच्या दिशेने वळलेले असतात. दांडो परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. खेळण्याच्या, मिठाईच्या, विविध वस्तूंच्या तिथे थाटलेल्या दुकानांबरोबरच ‘गडगडो’, ‘अंदर-बाहर’सारख्या जुगाराच्या तिथल्या असंख्य पटाभोवती देखील गर्दी तुंबून राहिलेली दिसते. 

बिनमूर्तीच्या तिथल्या जागरेश्वर मंदिरात ताटात ठेवलेला पाच वातींचा दिवा संथपणे तेवत असतो. त्या दिव्यालाच सांगणे केले जात असते, फुले वाहिली जात असतात.‌ या दिव्यासमोर लोकांची गर्दी आपापला नवस घेऊन दाटून उभी असते. या मंदिराचा भाग असलेल्या हॉलमध्ये, तिथे ठेवलेल्या खुर्च्या घेऊन प्रत्येक जण आपले आसन मांडताना दिसतो.

प्रत्येकाला प्रतीक्षा आहे मध्यरात्री सुरू होणाऱ्या जागराची. सुमारे पाऊण ते एक तास चालणाऱ्या जागरानंतर तिथे तियात्रही सादर होणार असते. एरवी कुठल्याही उत्सवात किंवा जत्रोत्सवात मंदिरात भजन किंवा भक्तिगीतांचे सूर आपल्याला ऐकू येतात; परंतु येथे तियात्रातील कोकणी कांतारे मस्तपैकी वाजत होती.

हा जागरोत्सव गावातील हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या शेकडो वर्षांच्या एकत्रित परंपरेचा भाग आहे, याची छोटीशी झलक ही कांतारे देत होते. तिथल्या गाभाऱ्यात समईच्या वाती जळत होत्या, तर त्यासमोर दोन्ही बाजूंना जळत असलेल्या ‘मेढीं’वरील ज्वाळांमध्ये काहीजण मेणबत्त्या वाहत होते.‌ विशेष म्हणजे काही परदेशी कुटुंबेही जागरेश्वराला मेणबत्त्या आणि फुले वाहताना दिसली.

हा उत्सव हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धर्मीयांकडून साजरा होत असला तरी तिथल्या गर्दीत ख्रिश्चन धर्मीय मात्र तुरळकपणेच दिसत होते. तिथे सादर होणाऱ्या तियात्रात काही ख्रिश्चन बांधव भूमिका करत असले तरी हे तियात्र गावातीलच एका हिंदू लेखकानेच लिहिले होते व ते हिंदू दिग्दर्शकानेच दिग्दर्शित केले होते.

रात्री बारा वाजल्यानंतर दोन विरुद्ध दिशांनी येणाऱ्या सुवारीवादनाचे सूर कानावर पडल्यानंतर सारेजण अंगावर आलेली शिथिलता झटकून उभे राहतात. आदीस्थानाला नमन करून,  हातात जळणारे चुडतांचे पलिते घेऊन घुमट, म्हादे आणि कांसाळे या वाद्यांच्या तालावर नाचत जागरेश्वरपाशी पोहोचण्यापूर्वी, या दोन्ही सुवारी मेळांनी वाटेवरील कपेलपाशी थांबा घेऊन तिथेही आपले नमन सादर केलेले असते.‌

हे दोन्ही मेळ जागरेश्वराच्या तेवणाऱ्या दिव्यापाशी पोहोचतात आणि सुवारी आटोपते. त्यानंतर तिथला प्रत्येकजण तिथे होणाऱ्या ‘भरभरिया’ या गोलाकार नृत्यात आपला सहभाग नक्की करण्यासाठी जागा घेऊन राहतो. वादक आपापली चर्मवाद्ये तिथे पेटवलेल्या ज्वाळांवर शेकायला सुरुवात करतात.

‘आधी नमन देवाबाप्पा सर्वेशा...’ ही ओवी गायला पुरोहित (पुरोहिताची भूमिका कन्हैया शिरोडकर त्यांच्याकडे परंपरेने चालत आली आहे.) सुरुवात करतात आणि मग दाटीवाटीने जागरेश्वरासमोर सारेजण फेर धरतात. “सगळे देव एकूच...’ या भावनेला नृत्याला चर्मवाद्यांची आणि कासाळ्याची जोरदार ताल साथ मिळत असते.

गोलाकारात फेर धरून सुरू असलेले हे ‘भरभरिया’ नृत्य साधारण दहा मिनिटे चालते. हे नृत्य म्हणजे जागराची सुरुवात असते. हे नृत्य आटोपल्यानंतर ज्याची लोक आतुरतेने वाट पाहात असतात, ती इतर वेगवेगळी पात्रे मंचावर प्रवेश करायला सुरुवात होतात.

या प्रत्येक पात्राला त्यांच्या वैशिष्ट्यानुसार ओव्यांची साथ मिळत राहते. सर्वांत प्रथम येतो तो सईद. याचे दुसरे नाव आहे इन्त्रुमेंत. त्याच्याबरोबर राजा प्रवेश करतो. राजा आणि सईदचा प्रवेश संपल्यानंतर माळीणी येतात, काही वेळाने त्यांचे पती येऊन त्यांना मिळतात.

त्यानंतर सर्वांत महत्त्वाचे पात्र प्रवेश करते-जागरियाचे. जागरिया प्रभावीरीत्या मंचावर पदन्यास करतो.  जागरिया हे महत्त्वाचे पात्र बरीच वर्षे रॉड्रिग्ज घराणे सादर करत होते; परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी रॉड्रिग्ज कुटुंबीयांनी आपली असमर्थता दर्शवल्यानंतर सध्या परेरा कुटुंबीयांचा सदस्य, पाऊलो, जागरियाची भूमिका रंगवतो आहे. 

‘जागर’ म्हणजे संपूर्ण रात्र जागवण्याची एक परंपरा. जागराचा महत्त्वाचा भाग संपल्यानंतर तियात्र सुरू होते. तियात्राचे हे सादरीकरण हा जणू रात्र जागवण्याच्या व्यवस्थेतील एक विरामाचा भाग असतो. ‘तियात्र’ हा जागोर परंपरेचा भाग नाही. काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन कलाकार तिथे फक्त गाणी (कांतार) सादर करत असत. कन्हैया शिरोडकर यांच्या म्हणण्यानुसार, त्याहीपूर्वी ओव्या गाऊन हा विरामाचा भाग सारला जात असे. आता तियात्र हे जागरोत्सवाचे अभिन्न अंग बनले आहे.

तियात्र आटोपल्यानंतर, पहाटेच्या सुमारास या उत्सवाचा अंतिम भाग सुरू होतो. म्हारीण, म्हार, त्यांचा मुलगा व मुलगी गावातील घराघरांतून खाद्यपदार्थ (सान्ना हा त्यापैकी पूर्वीपासून चालत आलेला पदार्थ आहे.) गोळा करू लागतात.‌ कन्हैया शिरोडकर सांगतात, ‘या जागरात समाजाच्या चारही वर्णांमधील व्यक्तिरेखांना स्थान दिले गेले असावे.‌’ (सादरीकरणातील पुरोहित, राजा, माळी, महार ही पात्रे या चारही वर्णांचे प्रतिनिधित्व करतात.) जागर देवाच्या भोवती चारही वर्णांतील (हिंदू-ख्रिश्चन पात्रे) आपापल्या भूमिका निभावतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: हडफडे दुर्घटनाप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 2 बडे अधिकारी निलंबित; दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

वरगाव-पिळगावच्या ऐतिहासिक चामुंडेश्वरीची 2 जानेवारी पासून जत्रा! रंगणार ‘नौकाविहार’; 5 दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Goa Live News: हडफडे आग प्रकरण; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Ponda Accident: भीषण अपघातानंतर मशिनरी पेटवली, कामगारांना मारहाण! दोघांना अटक; 16 जणांविरोधात गुन्‍हा दाखल

Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

SCROLL FOR NEXT