Kamakshi Temple Shiroda Shri Kamakshi Devi Facebook
गोंयची संस्कृताय

Goa Navratri 2024: पोर्तूगीजांच्या भीतीपोटी स्थलांतर; श्री कामाक्षी रायेश्वर संस्थानाचा इतिहास जाणून घ्या

Shiroda Kamakshi Temple History: काही देवळेराऊळे ही शांततेसाठी प्रसिद्ध असतात तर काही देवळं ही भक्तांच्या तुडुंब गर्दीमुळे सुप्रसिद्ध असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Shri Kamakshi Temple in Shiroda Goa History in Marathi

प्रा. विघ्नेश शिरगुरकर वांते, सत्तरी गोवा

शिरोडा गावातील 'थळ'(स्थळ) या ठिकाणी वसलेलं श्री कामाक्षी रायेश्वर हे संस्थान तसंच प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या तुडुंब गर्दीसाठी सुप्रसिद्ध आहे. त्या दिवशी शिरोड्याच्या बाजारपेठेत पाय ठेवायला जागा असतं नाही अन् गाड्यांच्या पार्कींगचं तर विचारूच नका. दर अमावस्येला संपूर्ण गोव्यातून तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातून भाविक देवीच्या 'भेटी'साठी आवर्जून येतात. नवरात्रीत या मंदिरातील नियमित मखरोत्सव हे खास आकर्षण असते. शिरोडा म्हटलं की कोणत्याही 'शाक्त' किंवा देवीभक्ताला 'कामाक्षी' हे देवीचे नाव आठवल्याशिवाय राहत नाही.

इतिहास ( History of Kamakshi Temple in Marathi)

श्री कामाक्षी रायेश्वर संस्थान हे मूळचे सासष्टी (ऋषींची सहासष्ट कुळे इथे येऊन वसली म्हणून सासष्टी हे नाव मिळाले.) वा साष्टी वा सालसेत या तालुक्यातील राय या गावात होते. गोव्यावर पोर्तुगीजांनी कब्जा केल्यावर सुमारे पाऊणशे वर्षे शांततेत गेली असावीत.

नंतर पोर्तुगालच्या राजाने इनक्विझिशन जाहीर केले व इनक्विझिशनच्या वेळी जेव्हा धर्मवेड्या जहाल जेझुईट धर्मगुरूंचे गोव्यात व त्यातही साष्टीत आगमन झाले तेव्हा या अशा अनेक मंदिरांवर हातोडा पडायला सुरूवात झाली.

Kamakshi Temple Shiroda

जेझुईटांच्या भयाने 'कामाक्षी रायेश्वर' या दोन्ही देवांच्या मूर्ती तिथल्या लोकांनी उचलून तिथून निघून ते पैलथडीला आले. सर्वप्रथम भाविक त्या मूर्ती घेऊन राय गावाच्या पैलथडी अगदी समोर अर्थात 'बरभाट' या ठिकाणी आले पण समोरच यवन आहे व ते येऊन कधीही हल्ला करू शकतात या भितीने भक्तांनी पुन्हा 'वाजें' या ठिकाणी स्थलांतर केले.

उपरोल्लेखित दोन्ही स्थलांतरे ही एक व दोन वर्षांत झाली व तेथे देवस्थान म्हणून कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम झाले नाही. तद्नंतर तिसरे व शेवटचे स्थलांतर म्हणजे 'थळ' शिरोडा येथे झालेले व आज आपल्यास जो काही देवस्थान परिसर दिसतो तो म्हणजे आजचं देवीचं स्थान.

'राय' गावात देवीचे मूळ अस्तित्व असण्याच्या दृष्टिकोनातून ठोस अशा प्रकारचं संशोधन झालेलं नाही. गोव्यात अनेक ठिकाणी कदंब घराण्याशी संबंधित वा संचलित अशी मंदिरे फोडण्यात आली व त्यावर चर्चचे बांधकाम करण्यात आले असा एक संशोधनवजा मतप्रवाह प्रचलित आहे.

Kamakshi Temple Shiroda

या देवस्थानचा आजवरचा इतिहास व मूळ स्थान लक्षात घेता हे देवस्थान शिरोडा गावामध्ये 'अतिथी देवस्थान' आहे या तथ्यावर शिक्कामोर्तब होते. 'आम्ही व देवी इथले पाहूणे आहोत' हा इतिहास महाजन व देवस्थानशी संबंधित कुळ नम्रपणे नमूद करतात.

काही वर्षांपूर्वी श्री कामाक्षी रायेश्वर संस्थानला पुरातत्व खात्यातर्फे राय येथील देवीच्या स्थानावर दावा करून उत्खनन करण्याचा प्रस्ताव आला होता पण मालकीहक्क सिध्द करणारी आवश्यक कागदपत्रे संस्थानाकडे उपलब्ध नसल्याने संस्थान प्रशासनाने या प्रस्तावाला नम्रपणे नकार कळविला.

महत्व ( Importance Of Kamakshi Temple Shiroda)

इनक्विझिशन व त्यामुळे नृशंसपणे झालेल्या देवीदेवतांच्या मूर्ती भंजनाचा व बाटाबाटीचा दुष्परिणाम लोकमानसालर झाला. लोकांनी मोठ्या प्रमाणावर शेजारील प्रदेशात म्हणजेच आत्ताचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात स्थलांतर केले.

सर्वाधिक स्थलांतर हे कर्नाटक वा कानडी प्रदेशात झाले असावे कारण या राज्यात प्रत्येक देवस्थानच्या महाजनांची लक्षणीय संख्या आहे. या राज्यात वसलेल्या कुळांसाठी आपला देव व देवी फार महत्वाची मानली जाते. चारशे वर्षांपूर्वी स्थलांतर केलेल्या व आजही कर्नाटकमध्ये वास्तव्य करून असले तरीही आपले देवदेवता न विसरलेल्या कुळांसाठी गोमंतक व गोमंतकात असलेलं आपलं कुलदैवत हे 'कुळार' (माहेर) आहे.

Kamakshi Temple Shiroda

आजही जर का जुनेजाणत्या वयस्क व्यक्ती विशेषतः महिला जेव्हा गोव्याचा माणूस त्यांच्या घरी पाऊल ठेवतो तेव्हा अगदी आनंदून जातात. 'तुमी आमचे कुळाराचे लोक' हे वाक्य त्यांच्या तोंडून अलगद बाहेर पडतं व नकळत त्यांचा पदर डोळ्याला लागतो.

वैशिष्ट्य

दर महिन्याला मोठ्या दिमाखात साजरी होणारी अमावस्या हा या देवीचा प्रमुख मासिक उत्सव आहे. 'कामाक्षीची उमास व ओमास' ही तशी संपूर्ण गोव्यात 'फामाद' (प्रसिद्ध) आहे. जशी अमावस्या सुप्रसिद्ध आहे तसंच देवीचं शारदीय नवरात्रही तितकंच प्रसिद्ध आहे.

कसे पोहोचाल? ( How To Reach)

  • श्री कामाक्षी रायेश्वर संस्थान दाबोळी विमानतळापासून २९.६ किमी आहे व हा या मंदिरापासून सर्वात जवळचा एअरपोर्ट आहे.

  • नव्याकोऱ्या चकचकीत मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे देवस्थान ६७.४ किमी आहे‌.

  • गोव्यातील रेल्वेचे एकमेव जंक्शन म्हणून ओळखले जाते त्या मडगाव रेल्वेस्टेशनपासून हे ठिकाण फक्त १८.८ किमी आहे.

  • फोंडा आंतरराज्य व राज्यांतर्गत बस स्थानकापासून थळ शिरोडा फक्त १२.३ किमी आहे.

नवरात्री उत्सव ( Navratri in Goa)

या शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीची घटस्थापना होते. जाई, जुई, मोगरा, तुळशी, झेंडु, गुलाब अशा विविध फुलांनी घट व देवी सजवली जाते. खास नवरात्रीसाठी बनवलेले 'म्होवाळें' (मुखवटा) देवीला चढवले जाते.

Kamakshi Temple Shiroda

सकाळी भक्तांसाठी अभिषेक व मानकरी महाजनांतर्फे महापूजा, दुपारी देवला महानैवेद्य अर्पण केल्यावर समस्त भक्तांसाठी अन्नसंतर्पण (अन्नसेवा), नवरात्रीनिमित्त सायंकाळी किर्तन, आतल्या देवीच्या मुर्तीची आरती झाली की देवीची मखरात बसलेल्या उत्सवमूर्तीसह भव्यदिव्य असे ते रंगीबेरंगी मखर मखरोत्सवाला सज्ज होते.

कुठे थांबाल? (Where To Stay)
इतर सर्वसाधारण गोमंतकीय मंदिरांसारखी याही मंदिराभोवती अग्रशाळा, सभागृह, संस्थान कार्यालय, प्रमुख व प्रसिद्ध महाजनांची मूळ निवासस्थाने अशा कैक इमारती व पुरातन बांधकामे आहेत. देवस्थानच्या भक्तनिवासात फक्त भक्तमंडळींना खोली मिळते, पर्यटकांना मिळत नाही. पण फोंडा, मडगांव तसेच आर्ले, फातोर्डा, रावणफोंड हे मडगावचे उपनगरीय भाग व वेर्णा या ठिकाणी स्वस्तात हॉटेल्स उपलब्ध आहेत.

खर्च (cost)

हे तसेच फोंडा तालुक्यातील इतर देवस्थानाचे दर्शन एकत्रित हिशेबात धरल्यास एका दिवसाचा खर्च सुमारे ₹३०००-४००० होतो. ज्या देवस्थानात दुपारी व रात्री अन्नसेवा असते तिथल्या उत्कृष्ट अन्नदानाचा लाभ घेण्यासही हरकत नसावी.

हे करा (Do's)

  • या देवस्थानात कार पार्कींग करताना आपल्यामुळे इतरांना कार हलवण्यास त्रास होणार नाही हे पाहणे आवश्यक आहे. कार योग्य ठिकाणी पार्क करा.

  • चपलासाठींचा स्टँड असतो त्या ठिकाणी चपला ठेवणे बंधनकारक आहे.

  • देवीचे दर्शन रांगेत उभे राहूनच घ्या.

  • मंदिरातील पुजारी वा विश्वस्तांनी सांगितल्यास अन्नसंतर्पण वा अन्नसेवेचा लाभ घ्या.

Kamakshi Temple Shiroda

हे करू नका (Dont's)

  • बेशिस्तपणे पार्कींग करणे टाळा, यामुळे परगावातील व परराज्यातून येणाऱ्या भक्तांची अडचण होते.

  • अन्नसेवेचा लाभ घेताना पानात अन्न टाकणे टाळावे, देवाचा प्रसाद टाकू नये ही अन्नसेवेची शिस्त आहे.

  • सभामंडपात गोंधळ वा गोंगाट करू नये.

  • मखरोत्सव व आरती झाल्यावर प्रसाद वितरण झाल्याशिवाय सभामंडपातून उठू नये.

  • प्रसादाचा त्याग करू नये, प्रसाद स्विकारल्यानंतर त्याचे सेवन करणे बंधनकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT