Goa Christmas Celebrations : येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी अवघा गोवा 'ख्रिसमस'च्या रंगात न्हाऊन निघाला आहे. बुधवारी (दि.२४) मध्यरात्री गोव्याची राजधानी असलेल्या पणजीमधील 'इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च'मध्ये अत्यंत पवित्र वातावरणात मध्यरात्रीची विशेष प्रार्थना पार पडली. यावेळी चर्चचा परिसर हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. पारंपारिक स्तोत्रे आणि सुमधुर भजनांच्या सुरांनी वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता पसरली होती.
केवळ पणजीच नव्हे, तर गोव्याच्या कानाकोपऱ्यात नाताळचा उत्साह ओसंडून वाहत आहे. घरोघरी आणि चर्चच्या बाहेर डोळ्यांचे पारणे फेडणारे देखणे 'गोठे' साकारण्यात आलेत. येशूच्या जन्माचा प्रसंग दर्शवणारे हे गोठे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. रस्त्यारस्त्यांवर चमकणाऱ्या चांदण्या, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि ख्रिसमस ट्रीमुळे गोव्याचे सौंदर्य अधिकच खुलून निघालेय. गोव्याच्या ग्रामीण भागापासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत सगळीकडे उत्सवाचे वातावरण पाहायला मिळतेय.
या मंगल दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो," अशा शब्दांत त्यांनी आपला संदेश दिला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील गोमंतकीय बांधवांना शुभेच्छा देताना ख्रिसमसचा सण प्रेम आणि बंधुभाव वाढवणारा असल्याचे म्हटले. दरम्यान, कार्डिनल फिलिप नेरी फेराव यांनी शांतता आणि मानवतेचा संदेश देत ख्रिस्ती बांधवांना येशूच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांची मोठी मांदियाळी जमली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि समुद्रकिनाऱ्यांवर उत्सवाचे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ख्रिसमस केक आणि पारंपारिक गोवन मिठाईचा सुगंध सर्वत्र दरवतोय. येशू ख्रिस्ताने दिलेला प्रेम आणि करुणेचा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून गोव्याने पुन्हा एकदा आपल्या वैश्विक संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.