काणाकोण : कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा होय, या दिवसाला साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानलं जातं आणि हा दिवस शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा असतो. याच दिवशी दिवाळी पाडवा साजरा करण्याची देखील परंपरा रूढ आहे, मात्र जसजशी सीमारेषा बदलते तशी सण आणि उत्सव साजरे करण्याची पद्धत सुद्धा आपोआप रूप बदलू लागते.
एखादा भाग कसा आहे, तिथे प्रमुख व्यवसाय कोणता आहे, लोकं कशाप्रकारे जगतायत यावरून त्या भागातील उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलत जाते. महाराष्ट्रात पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, हा पती-पत्नीच्या वैवाहिक नात्यातला एक महत्वाचा दिवस असतो.
मात्र तुम्ही जर का गोव्यात( Diwali Celebration in Goa) डोकावून पाहिलंत तर इथे साजरा होणार पाडवा काहीसा वेगळा आहे. समाजातील विविधता आणि आजही तेवढाच प्रकर्षाने जपलेल्या संस्कृतीचा वारसा इथे पाहायला मिळतो. तो कसा? चला जाणून घेऊया...
गोव्यात पाडवा (Padwa In Goa) म्हणजे गोपूजनाचा दिवस.असं म्हणतात गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा निवास असतो आणि या आधारेच गाईची पूजा केली जाते. मात्र गोव्यातील पाडव्याचा यामध्ये विशेष उल्लेख करावा अशी गोष्ट इथे दडलेली आहे आहे, ती म्हणजे इथे गोठ्यात बनवला जाणारा शेणाचा गोठा.
हो!! या दिवशी गाईंच्या गोठ्यात शेणापासून एक गोठ्याची (Shenacho Gotho) आकृती तयार केली जाते. या गोठ्यात वेगवेगळे भाग बनवले जातात, किंवा खोल्या तयार केल्या जातात असं आपण म्हणूयात.
दिवाळीच्या सणात इथे कारीटाच्या फळाला भारी महत्व असतं. कारीटाला हिर किंवा छोट्या काठ्या जोडून चार पाय तयार केले जातात आणि करीटापासून बनवलेली प्रतिमाच गाईचं स्वरूप म्हणून त्या शेणाच्या गोठ्यात ठेवली जाते.
करीटाच्या फळाला मधोमध कापून त्यात दही, दूध,ताक इत्यादी पदार्थांसह गोठा सजवला जातो. गोव्यातली दिवाळी श्रीकृष्ण आणि नरकासुराच्या कथेवर आधारित आहे, त्यामुळे गाईचा गोठा किंवा दूध, ताक, दही या पदार्थांचं महत्व कुठेतरी श्रीकृष्णाशी जुळणारं वाटतं.
दक्षिण गोव्यातील सांगे, केपे किंवा काणकोण या भागांमध्ये दसरा ते बलिप्रतिपदेच्या काळात वेळीप (Velip Tribals) हा आदिवासी समुदाय धिल्लोनावाचा एक आगळावेगळा उत्सव साजरा करतो. पूर्वीच्या अनुसूचित जमातीत हा आदिवासी समाज डोंगरमाथ्यावर राहायचा.
शरद ऋतूच्या सुरुवातील म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापासून ते दिवाळीतील बलिप्रतिपदेपर्यंत म्हणजेच एकूण बावीस दिवस या समाजातील महिला रात्रीच्या वेळी एकत्र जमतात आणि धिल्लोची आराधना करत फुगड्यांचे खेळ खेळतात. ओल्या मातीने मळलेल्या आणि झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या मातीच्या एक छोट्याशा ढिगाला धिल्लो म्हणून ओळखलं जातं. हा मातीचा ढिगारा बनवण्यासाठी खास डोंगराळ भागातून माती आणली जाते आणि दर पाच दिवसांनी हा मातीचा ढिगारा बदलला जातो.
पाहायला गेलं तर आदिवासी समाजातील कुमारिका किंवा अविवाहित मुलींचा हा सण आहे, मात्र आजकाल लग्न झालेल्या बायका देखील यात सामील होताना दिसतात. एकंदरीत काय तर समाजातील बायका या निमित्ताने एकत्र येऊन नाच-गाणी, फुगड्या किंवा इतर मनोरंजनपर कार्यक्रम घडवून आणतात. धिल्लो हे शिव आणि पार्वतीच्या जेष्ठ पुत्र कार्तिकेयचं प्रतीक आहे. कार्तिकेयाची मनोभावे पूजा करून मुली उत्तम वराची कामना करतात.
असं म्हणतात घरातली मुलगी किंवा स्त्री घराला जोडून ठेवते आणि स्त्रीच्या आयुष्यातील तिच्या नात्याचं महत्व सांगणारी गाणी या कार्यक्रमात गायली जातात. या कार्यक्रमात गायली जाणारी लोकगीतं ऐकली तर नक्कीच बाईसाठी तिची नाती, कुटुंब आणि परिवार किती महत्वाचा असतो याचं स्पष्ट उदाहरण डोळ्यांसमोर उभं राहतं.
शेवटी २१व्या दिवसाच्या रात्रीपासून ते २२व्या दिवसाच्या दुपारपर्यंत फुगड्या किंवा झेमाड्यांसारखे स्थानिक नृत्यप्रकार सादर केले जातात आणि त्यांनतर पाच अविवाहित मुली धिल्लो खांद्यावर धरतात, वाजत-गाजत लोकगीतांच्या गजरात याचं विसर्जन केलं जातं आणि पुन्हा मांडावर परतल्यानंतर शाकाहारी भोजनाचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.