Paris Olympics 2024: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. रशियन सैन्याने मागील काही दिवसांपासून हल्ले आणखी तीव्र केले आहेत. यातच, पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आगोदरच युक्रेनच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने युक्रेनियन खेळाडूंना एक आवाहन केले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान रशियन आणि बेलारुसी खेळाडूंशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात आले, जेणेकरुन संभाव्य "प्रक्षोभक कृती" टाळता येतील. युक्रेनच्या NOC आणि युवा आणि क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, "आक्रमक देशांच्या प्रतिनिधींशी थेट संपर्क टाळण्यात यावा.’’
दरम्यान, युक्रेनियन ऍथलीट्सना रशिया आणि बेलारुसच्या ऍथलीट्स यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेली कोणत्याही प्रकारची सामग्री शेअर करु नये. याशिवाय, त्यांना प्रतिसाद देऊ नये. रशियन आणि बेलारशियन खेळाडूंपासून शक्य तितके अंतर ठेवण्यात यावे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचे टाळावे. मात्र स्पर्धेच्या नियमांचे पालन तंतोतत करावे, असे युक्रेनच्या (Ukraine) राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे.
दुसरीकडे, युक्रेनियन ऍथलीट्सनी स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेनंतर रशियन फेडरेशन आणि बेलारुसच्या ऍथलीट्स यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद, मुलाखती आणि इतर प्रचारात्मक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे टाळावे, असेही समितीने नमूद केले आहे.
कीवने रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाचा निषेध केला होता. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी डिसेंबरमध्ये म्हटले होते की, ‘’IOC ने काही एक गरज नसताना रशियाला ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला."
दरम्यान, रशिया युक्रेन युद्धात बेलारुसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को खास दोस्त मानले जातात. लुकाशेन्को यांनीच 2022 च्या सुरुवातीला रशियन सैन्याला बेलारुसी प्रदेशातून युक्रेनवर हल्ला करण्याची परवानगी दिली होती. रशिया आणि बेलारुस नियमित संयुक्त लष्करी युद्धभ्यास देखील करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.