नेपाळच्या हिमालयीन (Nepal Himalaya) पर्वतरांगांमधील माऊंट मानसलू (Mount Manaslu) येथे हिमस्खलनात (Avalanche) दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 12 हून अधिक गिर्यारोहक जखमी झाले आहेत. सोमवारी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
माऊंट मानसलू हे जगातील 8 व्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर असून जगातील धोकादायक मानल्या जाणाऱ्या शिखरांमध्ये या शिखराचा पाचवा क्रमांक आहे. येथे 297 प्रयत्नांमध्ये आत्तापर्यंत 53 जणांचे मृत्यू झाले आहेत.
नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार माऊंट मानसलूच्या कॅम्प 4 च्या खाली सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमींमध्ये सात ट्रेक ग्रुपच्या सदस्यांचा समावेश आहे. यात सातोरी अॅडव्हेंचर, इमॅजिन नेपाळ ट्रेक, एलाईट एक्सपीडीशन, 8के एक्सपीडीशन या ट्रेक ग्रुप्सचा समावेश आहे. 8के एक्सपीडीशन ग्रुपच्या पेम्बा शेर्पांनी सांगितले की, भारतीय गिर्यारोहक बलजीत कौर आणि त्यांचे गाईड यांना किरकोळ दुखापत झाली आहे, ते सुरक्षित आहेत.
बलजीत कौर यांनी एका महिन्यात 8000 मीटर उंचीवरील 4 शिखरांवर एका महिन्यात यशस्वी चढाई केली आहे. आणखी एका ग्रुपच्या शेर्पांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकातील 5 जणांना दुखापत झाली आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य (Rescue Operation) सुरू आहे. तसेच शोधमोहिमही राबवली जात आहे. तथापि, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे, अशी माहिती या मोहिमांविषयीचे सरकारी अधिकारी यशोदा आचार्य यांनी पीटीआयला दिली. कैलाश एअर, सिमरिक एअर, हेली एव्हरेस्ट यांच्यातर्फे हवाई तपासणी केली जात आहे.
कोविडमुळे दोन वर्षे विविध निर्बंधांमुळे गिर्यारोहकांना परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा सर्व बंधने खुली केल्याने गिर्यारोहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 404 गिर्यारोहकांसह त्यांच्यासोबत 300 गाईड्सना परवानगी देण्यात आली होती. हे गिर्यारोहक 28 ते 29 सप्टेंबर या काळात माऊंट मानसलू या शिखरावर चढाई करण्याचे नियोजन करत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.