Saudi Arabia Airstrikes Yemen Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia Airstrikes Yemen: येमेनमध्ये सौदी अरेबियाचा भीषण हवाई हल्ला! महिला- लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली VIDEO

Yemen Air Attack 33 Killed: मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा भीषण वळणावर पोहोचला आहे. सौदी अरेबियाने येमेनची राजधानी सना परिसरात केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले आहेत.

Sameer Amunekar

मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा भीषण वळणावर पोहोचला आहे. सौदी अरेबियाने येमेनची राजधानी सना परिसरात केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखालील वृत्तसंस्था सबा आणि येमेनच्या आरोग्य मंत्रालयाने या घटनेची माहिती दिली आहे.

घरांवर बॉम्बवर्षाव; अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या लढाऊ विमानांनी सना शहराच्या पूर्वेकडील बनी हुशैश गावाला लक्ष्य केले. हा परिसर हुती बंडखोरांचा प्रभाव असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या कारवाईदरम्यान अनेक निवासी इमारतींवर हल्ले करण्यात आल्याने घरे उद्ध्वस्त झाली. अचानक झालेल्या बॉम्बवर्षावामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधीही मिळाली नाही. अनेक जण इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बचावकार्यातही अडथळे; वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही मृत्यू

सेहतुना रुग्णालयाचे संचालक अब्दुल-अजीज अल-दैलामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके प्रयत्न करत आहेत. मात्र, बचावकार्य सुरू असतानाच पुन्हा हल्ले होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. या हल्ल्यांमध्ये काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. काही जखमींची हाडे मोडली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सौदी अरेबियाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल कम्युनिकेशनने या घटनेची माहिती घेतली जात असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

२०२२ मधील युद्धविरामानंतर पुन्हा संघर्षाला सुरुवात

सौदी अरेबिया आणि हुती बंडखोर यांच्यातील संघर्ष काही काळ शांत झाला होता. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने २०२२ मध्ये दोन्ही बाजूंमध्ये युद्धविराम झाला होता. त्यामुळे हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, जुलै २०२६ मध्ये पुन्हा संघर्ष भडकला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

इराणचा पाठिंबा असलेल्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील विमानतळ आणि तेल प्रकल्पांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सौदी अरेबियाकडून येमेनमध्ये हवाई कारवाया केल्या जात आहेत. जुलैमध्ये संघर्ष पुन्हा सुरू झाल्यानंतरचा हा सर्वाधिक जीवितहानी करणाऱ्या हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे.

१२ वर्षांच्या युद्धामुळे येमेनमध्ये मानवी संकट गंभीर

येमेनमध्ये गेल्या जवळपास १२ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. आधीच गरिबी आणि अन्नटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी नव्या हल्ल्यांनी संकट अधिक गंभीर केले आहे. या संघर्षाचे पडसाद अमेरिका आणि इराण यांच्यातील व्यापक तणावाशीही जोडले जात आहेत.

आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) माहितीनुसार, जुलै २०२६ मध्ये संघर्ष पुन्हा सुरू झाल्यापासून दोन लाखांहून अधिक नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. सातत्याने होणारे हल्ले, विस्थापन आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. राजकीय आणि लष्करी संघर्षात सर्वाधिक फटका मात्र महिला, मुले आणि निष्पाप नागरिकांना बसत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज; काँग्रेसचा 'हात' कोणाबरोबर?

Job Scam: शिक्षिका होण्याचे स्वप्न दाखवून 12 लाख उकळले! सरकारी नोकरीच्या नावाखाली गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Weather Update: गोमंतकीयांना उन्हाचे चटके! तापमानाचा पारा 35 अंशांवर, पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता

Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची एन्ट्री! संकल्प आमोणकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, खाती सोमवारी मिळण्‍याची शक्‍यता

ST Political Reservation: सरकारनंतर 'मिशन'ही सुप्रीम कोर्टात, 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन लढा आणखी तीव्र

SCROLL FOR NEXT