Pentagon Polygraph Test US Joint Staff Military Leak: अमेरिकेच्या संरक्षण विभागातून सैन्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती माध्यमांमध्ये लीक झाल्याच्या संशयावरुन मोठा लष्करी तपास सुरु करण्यात आला आहे. या तपासाचा एक भाग म्हणून यूएस जॉइंट स्टाफसोबत कार्यरत असलेल्या सुमारे 50 लष्करी अधिकारी आणि नागरी कर्मचाऱ्यांची पॉलीग्राफ, म्हणजेच 'लाय डिटेक्टर' चाचणी करण्यात आली.
ऑगस्ट 2026 मध्ये करण्यात आलेल्या या गुप्त चाचण्यांमुळे अमेरिकन लष्करी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. इराणसोबत (Iran) सुरु असलेल्या संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडील लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा आणि 'पॅट्रियट' एअर-डिफेन्स इंटरसेप्टर्सचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यानंतर हा माहितीचा स्रोत शोधण्यासाठी पँटागॉनने ही धडक कारवाई केली.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, जॉइंट स्टाफमधील कोणत्या अधिकाऱ्याने इराण संघर्षाशी संबंधित किंवा अमेरिकेच्या दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या साठ्याबाबतची गोपनीय माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचवली, याचा शोध घेतला जात आहे. जॉइंट स्टाफ ही अमेरिकन लष्कराच्या सर्वोच्च नेतृत्वाला मदत करणारी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, ज्यामध्ये सुमारे 1500 ते 2000 वरिष्ठ लष्करी आणि नागरी अधिकारी कार्यरत असतात. संवेदनशील राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा थेट माध्यमांमध्ये उघड झाल्याने पँटागॉन प्रशासनाने याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.
पँटागॉनचे प्रवक्ते शॉन पारनेल यांनी या अंतर्गत तपासावर थेट भाष्य करणे टाळले असले, तरी गोपनीय माहितीचे रक्षण करणे हे अमेरिका आणि जगभरात तैनात असलेल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले.
या तपासादरम्यान वापरण्यात आलेली 'पॉलीग्राफ चाचणी' किंवा लाय डिटेक्टर ही एक विशेष वैद्यकीय आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. या चाचणीत संबंधित व्यक्तीच्या शरीरावर विविध सेन्सर्स लावले जातात, ज्याद्वारे प्रश्नांची उत्तरे देताना त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वासोच्छवासाचा वेग आणि त्वचेवरील घाम यांसारख्या शारीरिक बदलांवर सूक्ष्म नजर ठेवली जाते.
जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते, तेव्हा निर्माण होणाऱ्या मानसिक तणावामुळे तिच्या शरीरात नैसर्गिक बदल घडून येतात, असा या तंत्रज्ञानाचा सिद्धांत आहे. मात्र, भीती किंवा अतिघबरगुंडीमुळेही हे आकडे बदलू शकत असल्याने, या चाचणीला कायदेशीरदृष्ट्या 100 टक्के फायनल पुरावा मानले जात नाही. परंतु, लष्करी तपासात संशयित व्यक्ती किंवा 'माहिती लीक' करणाऱ्याचा सुगावा लावण्यासाठी या चाचणीचा उपयोग एक महत्त्वाचे साधन म्हणून केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.