Kenya News: केनियामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अर्धांगवायू होण्यास कारणीभूत असलेल्या एका गूढ आजारामुळे पश्चिम केनियातील 95 शाळकरी मुलींना त्यांची शाळा अनिश्चित काळासाठी बंद करावी लागली आहे.
दरम्यान, नैरोबीच्या वायव्येस 374 किलोमीटर (232 मैल) अंतरावर असलेल्या थेरेसाच्या एरेगी गर्ल्स हायस्कूलमधील या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाळा प्रशासन आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाधित विद्यार्थ्यांना (Students) अशा आजाराने ग्रासले आहे, ज्यामुळे त्यांचे पाय सुन्न होतात आणि हालचालही करता येत नाहीत. त्यांच्यापैकी काहींना डोकेदुखी, उलट्या आणि ताप देखील आला आहे.
या गूढ आजाराचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. आरोग्य अधिकार्यांनी सांगितले आहे की, बाधित विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (केईएमआरआय) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत.
जिल्हा आरोग्य संचालक डॉ. कॉलिन्स माटेम्बा म्हणाले की, प्राथमिक चाचण्यांमुळे मेंदुज्वर, टायफॉइड आणि मलेरिया ही आजाराची संभाव्य कारणे नाकारण्यात आली आहेत. ते पुढे म्हणाले की, हा आजार मज्जासंस्थेवर परिणाम करणारा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा व्हायरल इन्फेक्शन असू शकतो.
काउन्टी आरोग्य विभागाने बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याचे बारकाईने निरीक्षण करण्याचे आणि कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे.
उर्वरित विद्यार्थी आणि कर्मचार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागाने आरोग्य कर्मचार्यांची एक टीम शाळेत पाठवली आहे. काउन्टीचे शिक्षण अधिकारी, बोनफेस ओकोथ यांनी सांगितले की, 95 विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारासाठी विविध रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.
त्यापैकी काहींची प्रकृती सुधारत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर काहींवर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती सामान्य झाल्यावर आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर शाळा पुन्हा सुरु होईल, असेही ते म्हणाले.
गूढ आजाराच्या प्रादुर्भावामुळे काकामेगा काउंटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही पालकांनी रोगाचे स्वरुप आणि स्त्रोत याबद्दल अधिका-यांकडून माहिती उपलब्ध नसल्यामुळे भीती आणि चिंता व्यक्त केली आहे.
काही स्थानिक नेत्यांनी संकट हाताळताना सरकारकडून अधिक पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली आहे.
काउन्टी गव्हर्नर, वायक्लिफ ओपरन्या यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की, त्यांचे प्रशासन या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना पुरेसा आधार देण्यासाठी काम करत आहे.
आरोग्य अधिकारी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करत असल्याने त्यांनी शांतता आणि जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.