Iran Execution Erfan Kiani 2026: इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने आणि हेरगिरीच्या आरोपाखाली फाशी देण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारी (25 एप्रिल) इराण सरकारने एर्फान कियानी नावाच्या एका व्यक्तीला फाशीच्या सुळावर चढवले. कियानी हा इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद'शी संबंधित होता आणि जानेवारी 2026 मध्ये झालेल्या सरकारविरोधी हिंसक आंदोलनांमध्ये तो सक्रिय होता, असा खळबळजनक आरोप इराणने केला. या फाशीमुळे इराणमधील मानवी हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आला.
इराणच्या (Iran) न्यायव्यवस्थेशी संबंधित 'मिझान' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एर्फान कियानीवर इस्फहान शहरात सुरक्षा दलांवर हल्ले करणे, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, जाळपोळ करणे आणि लोकांमध्ये दहशत पसरवणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. इराणच्या न्यायालयाने त्याला "मोसादचा भाडोत्री गुंड" असे संबोधले होते. सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर, शनिवारी पहाटे त्याला फाशी देण्यात आली. अलीकडील काळात इराण आणि इस्रायलमध्ये झालेला संघर्ष आणि त्यानंतर जानेवारी महिन्यात इराणमध्ये उसळलेल्या जनक्षोभानंतर आंदोलकांना आणि कथित हेरांना फाशी देण्याच्या मालिकेतील ही ताजी घटना आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच असा दावा केला होता की, त्यांच्या हस्तक्षेपामुळे इराणमधील फाशीच्या शिक्षा थांबल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात तेहरानमध्ये एकापाठोपाठ एक फाशी दिली जात असल्याने ट्रम्प यांचा दावा फोल ठरल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगली. इराण सरकारने स्पष्ट केले की, देशांतर्गत होणारी सर्व आंदोलने ही इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांच्या चिथावणीमुळे होत आहेत. दुसरीकडे, जागतिक मानवाधिकार संघटनांनी इराणच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला.
या संघटनांच्या मते, इराणमध्ये हे खटले अत्यंत गुप्तपणे चालवले जातात आणि आरोपींना स्वतःची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर संरक्षणही दिले जात नाही. गेल्या काही आठवड्यांत मोसादशी संबंध असल्याच्या संशयावरुन इराणने अनेक व्यक्तींना फाशी दिली, ज्यामुळे इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.