Grok AI Controversy: एलन मस्क यांची कंपनी 'X' आणि त्यांचा 'ग्रोक एआय' सध्या एका गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवी प्रगतीसाठी होईल, असे दावे केले जात असताना ग्रोक एआय मात्र अश्लील आणि अत्यंत आक्षेपार्ह फोटो तयार करण्यासाठी वापरला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
एका ताज्या संशोधनानुसार, ग्रोक एआयने दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत सुमारे 30 लाख अश्लील फोटो तयार केले असून, त्यापैकी 23000 फोटोंमध्ये बालकांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. 'सेंटर फॉर काउंटरिंग डिजिटल हेट' (CCDH) या संस्थेने हा खळबळजनक अंदाज वर्तवला असून यामुळे मस्क यांच्या एआय इमेज जनरेशन टूलवर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक युजर्स या टूलचा वापर करुन सेलिब्रिटी आणि अनोळखी व्यक्तींचे फोटो अपलोड करत असून त्यांना अश्लील फोटोंमध्ये रुपांतरित करण्यासाठी 'प्रॉम्ट' देत आहेत, ज्याला ग्रोक एआय कोणतीही सुरक्षा बंधने न पाळता प्रतिसाद देत आहे.
डिजिटल इंटेलिजेंस कंपनी 'पेरिटोन इंटेलिजेंस'ने केलेल्या विश्लेषणानुसार, अश्लील फोटो तयार करण्याचा हा कल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात वाढला. 2 जानेवारी 2026 रोजी एकाच दिवसात सुमारे 1,99,612 वेगवेगळ्या विनंत्या (Requests) ग्रोक एआयला प्राप्त झाल्या होत्या, जे या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करते. CCDH ने 29 डिसेंबर 2025 ते 8 जानेवारी 2026 या 11 दिवसांच्या कालावधीतील डेटाचे सखोल मूल्यांकन केले.
या संशोधनातून असे समोर आले की, ग्रोक एआय दर 41 सेकंदाला मुलांशी संबंधित अश्लील मजकूर किंवा फोटो तयार करत होते. या प्रकारामुळे केवळ सामान्य जनताच नाही, तर विविध देशांची सरकारेही एलन मस्क (Elon Musk) यांच्या कंपनीवर निशाणा साधत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या परिस्थितीचे वर्णन "घृणास्पद" असे केले असून यावर कडक निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत.
त्याचवेळी, वाढता दबाव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली टीका लक्षात घेऊन कंपनीने 9 जानेवारी रोजी इमेज जनरेशनची सुविधा केवळ सशुल्क (Paid) युजर्ससाठी मर्यादित केली. मात्र, तरीही वादाची तीव्रता कमी झालेली नाही. इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या देशांनी अशा एआय टूल्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, 'X' ने यावर आपली अधिकृत भूमिका मांडताना म्हटले की, ते प्लॅटफॉर्म सर्वांसाठी सुरक्षित ठेवण्यास वचनबद्ध आहेत आणि अश्लील मजकुराबाबत त्यांची 'झिरो टॉलरन्स' पॉलिसी कायम राहील. तरीही, ग्रोक एआयच्या माध्यमातून ज्या प्रकारे मानवी प्रतिष्ठा आणि बालसुरक्षेचे उल्लंघन होत आहे, ते पाहता एआयच्या नियमन आणि नैतिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तंत्रज्ञानाचे 'रॉकस्टार' मानले जाणारे टूल आता स्वतःच्याच वादग्रस्त कार्यप्रणालीमुळे जगभरासाठी चिंतेचा विषय ठरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.