Pashtun Protest Pakistan: स्वित्झर्लंडमधील दावोस येथे 56व्या जागतिक आर्थिक मंचाची (WEF) वार्षिक बैठक सुरु असताना पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कराचा खरा चेहरा जगासमोर आला. जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि दिग्गज व्यक्ती या ठिकाणी एकत्र आल्या असतानाच, पश्तून गटांनी पाकिस्तानच्या मानवाधिकार उल्लंघनाविरुद्ध आणि लष्करी अत्याचारांविरुद्ध जोरदार निदर्शने केली. "पाकिस्तान पश्तून लोकांच्या हत्या करत आहे आणि हे संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे," अशा घोषणांनी दावोसचा परिसर दणाणून गेला.
निदर्शन करणाऱ्या आंदोलकांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात निष्पाप नागरिकांच्या सुरु असलेल्या हत्यांचा मुद्दा जागतिक स्तरावर मांडला. आंदोलकांचा सर्वात गंभीर आरोप असा आहे की, पाकिस्तान आपल्या लष्कराचा वापर एखाद्या 'दहशतवादी फौजे'सारखा (Terror Force) करत आहे.
पाकिस्तानकडून (Pakistan) सातत्याने दहशतवादाला खतपाणी घातले जाते आणि स्वतःच्याच देशातील अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जातात, याची पोलखोल या प्रदर्शनामुळे झाली. एप्रिल 2025 मध्ये भारतात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला कठघऱ्यात उभे करुन 'दहशतवादी देश' म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर दावोसमध्ये झालेली ही निदर्शने पाकिस्तानसाठी मोठी नामुष्की ठरली आहेत.
पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर 19 ते 23 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या परिषदेसाठी दावोसमध्ये दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहबाज शरीफ यांची या बैठकीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीत शरीफ अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांवर घातलेली व्हिसा बंदी उठवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे विनंती करण्याची दाट शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या काही घडामोडींमुळे अमेरिका (America) आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यासाठी असीम मुनीर यांचे कौतुक केले होते. ट्रम्प अनेकदा असा दावा करतात की, भारत आणि पाकिस्तानला युद्धविरामासाठी तयार करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी यापूर्वी शरीफ आणि मुनीर यांना अमेरिकेत आमंत्रित केले होते, ज्याची मोठी चर्चा रंगली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.