China Discovers Massive Gold Silver Reserve: भारताचा शेजारी देश असलेल्या चीनच्या हाती असा एक खजिना लागला, ज्याने अवघ्या जगाला चकित केले. चीनी वैज्ञानिकांना पश्चिम प्रशांत महासागराच्या खोल तळाशी हा मोठा खजिना हाती लागला. महासागरातील या गूढ खजिन्यामध्ये सोने आणि चांदीचे इतके प्रचंड प्रमाण आहे की, ते जमिनीवर आढळणाऱ्या मोठ्या खाणींनाही मागे टाकू शकते.
त्सिंगहुआ विद्यापीठ, शंघाई जियाओतोंग विद्यापीठ आणि किंगदाओ इन्स्टिट्यूट ऑफ मरीन जिओलॉजी यांसारख्या चीनच्या (China) अग्रगण्य संशोधन संस्थांच्या वैज्ञानिकांनी 'झांगयांगहॉन्ग 10' या विशेष जहाजाद्वारे ही धाडसी मोहीम फत्ते केली. सुमारे 18 दिवसांच्या सागरी संशोधनात तळाशी जाऊन घेतलेल्या चाचण्यांनंतर या खजिन्याची पुष्टी झाली.
संशोधकांच्या अहवालानुसार, पश्चिम प्रशांत महासागराच्या बॅक-आर्क बेसिनमध्ये 700 ते 1500 मीटर खोलीवर अत्यंत गरम द्रव पदार्थ बाहेर फेकणारे 'हायड्रोथर्मल व्हेंट्स' सापडले. या ठिकाणी समुद्राच्या तळाशी निघणाऱ्या द्रवाचे तापमान 315 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त नोंदवले गेले. सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, येथे मिळालेल्या धातूच्या नमुन्यांची जहाजावरील प्रयोगशाळेत तपासणी केली असता, एका टनाच्या नमुन्यात सुमारे 15.4 ग्रॅम सोने आणि तब्बल 1.27 किलोग्रॅमपर्यंत चांदी आढळून आली.
सोन्या-चांदीव्यतिरिक्त या साठ्यात तांबे, लोखंड आणि जस्त (झिंक) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि महागड्या खनिजांचे मोठे साठे उपलब्ध आहेत. जमिनीवरील नैसर्गिक साठ्यांच्या तुलनेत हे प्रमाण कैक पटीने जास्त आहे.
हा खजिना समुद्राच्या तळाशी तयार कसा झाला, याविषयी स्पष्ट करताना वैज्ञानिकांनी सांगितले की, समुद्राचे पाणी तळातील भेगांमधून जमिनीत शिरते आणि तिथल्या मॅग्माच्या प्रचंड उष्णतेने तापून खडकांमधील धातू स्वतःमध्ये विरघळवते. जेव्हा हा अतिउष्ण द्रव पुन्हा समुद्राच्या थंड पाण्यात येतो, तेव्हा रासायनिक प्रक्रियेतून हे धातू घनरुपात साचू लागतात आणि काळाच्या ओघात खजिन्याचे विशाल शंकू तयार होतात. या भागात फक्त खनिजेच नव्हे, तर अत्यंत कठीण परिस्थितीत जिवंत राहणारे दुर्मिळ झिंगे, खेकडे आणि सूक्ष्मजीवही सापडले आहेत. मात्र, समुद्रातील प्रचंड दाब आणि भौगोलिक आव्हानांमुळे या सोन्या-चांदीच्या खजिन्याचे उत्खनन करणे सध्या मानवासाठी एका मोठ्या आव्हानासारखे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.