Indian Embassy Advisory: शेख हसीना विरोधी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या निधनानंतर बांगलादेशात हिंसाचाराचा वणवा पेटला. या पार्श्वभूमीवर ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी बांगलादेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी तातडीची 'ॲडव्हायझरी' जारी केली. बांगलादेशातील सद्यस्थिती अत्यंत नाजूक बनली असून भारतीय नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि स्थानिक प्रवासाचे साधने वापरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.
शरीफ उस्मान हादी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी भारतविरोधी घोषणाबाजी करत गंभीर आरोप केला की, हादी यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर गुपचूप भारतात पळून गेले. या अफवांमुळे आणि भारतविरोधी भावनांमुळे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला. ढाकासह अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरु असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी देशाला संबोधित केले. "हादी यांचे जाणे हे देशाच्या राजकीय आणि लोकशाही क्षेत्रासाठी भरुन न येणारे नुकसान आहे," अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतानाच आश्वासन दिले की, सरकार या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करेल आणि दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. हिंसाचारामुळे आगामी निवडणुकांच्या प्रक्रियेत अडथळा येईल, असा इशाराही त्यांनी आंदोलकांना दिला.
हादी यांच्या सन्मानार्थ अंतरिम प्रशासनाने शनिवारी (19 डिसेंबर) एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला. या दिवशी बांगलादेशचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल आणि देशभर विशेष प्रार्थना केल्या जातील. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी (Student) उठावानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. तेव्हापासून नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार बांगलादेशाचा कारभार पाहत आहे. येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, मात्र त्याआधीच हादी यांच्या मृत्यूने देशात अस्थिरता निर्माण झाली.
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले:
भारतीय नागरिकांनी कोणत्याही अनावश्यक प्रवासासाठी घराबाहेर पडू नये.
स्थानिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळावे.
गर्दीच्या ठिकाणी किंवा आंदोलने सुरु असलेल्या भागांत जाऊ नये.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत भारतीय उच्चायुक्तालय किंवा सहाय्यक उच्चायुक्तालयाशी त्वरित संपर्क साधावा.
केंद्र सरकार बांगलादेशातील (Bangladesh) घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असून, तेथील भारतीयांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.