Joy Mahapatro Murder Sunamganj: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणारे हल्ले आणि त्यांच्या हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. ताज्या घटनेत सुनामगंज जिल्ह्यात जॉय महापात्रो नावाच्या हिंदू व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून अंतरिम सरकार अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनामगंज जिल्ह्यात जॉय महापात्रो याला स्थानिक कट्टरवाद्यांनी लक्ष्य केले. महापात्रोच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक व्यक्तीने त्याला आधी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला जबरदस्तीने विष पाजले. प्रकृती खालावल्यानंतर त्याला सिल्हट येथील एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हिंदू नागरिकांनी स्वतःला घरांत कोंडून घेतले आहे.
बांगलादेशात (Bangladesh) मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार आल्यापासून हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच नरसिंगदी शहरात मोनी चक्रवर्ती (40) या किराणा व्यापाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली होती. या हत्येमुळे उमटलेले पडसाद अद्याप शांत झाले नसतानाच महापात्रो याची हत्या झाली.
इतकेच नाही तर, 5 जानेवारी रोजी जशोरच्या कोपलिया बाजारपेठेत हिंदू व्यापारी आणि पत्रकार राणा प्रताप यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर 18 डिसेंबर रोजी मैमनसिंह येथे दीपू चंद्र दास या कापड गिरणी कामगारावर ईशनिंदा केल्याचा खोटा आरोप ठेवून त्याला जमावाने मारले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला बांधून जाळण्यात आला. 31 डिसेंबर 2025 रोजी शरियतपूरमध्ये व्यापारी खोकन चंद्र दास याच्यावर धारधार शस्त्राने वार करुन जाळण्याचा प्रयत्न झाला, ज्याचा 3 जानेवारी रोजी ढाका येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुसरीकडे, बांगलादेशात वारंवार घडणाऱ्या या हत्यांमुळे मानवाधिकार संघटनांनी गंभीर चिंता व्यक्त केली. "स्थानिक प्रशासनाची कमकुवत भूमिका आणि आरोपींना अटक करण्यात होणारा विलंब यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढत आहे," असे मत अल्पसंख्याक हक्क गटांनी व्यक्त केले. ईशनिंदा किंवा वैयक्तिक वादाचे नाव देऊन हिंदूंना (Hindu) लक्ष्य केले जात असून त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले जात असल्याचा दावाही केला जात आहे. आज बांगलादेशातील हिंदू समाज एका अशा वळणावर उभा आहे, जिथे त्यांना ना न्याय मिळत आहे, ना सुरक्षा. आंतरराष्ट्रीय समुदायाने याप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.