Mumbai Girl Assaulted Rajasthan : राजस्थानी पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली. इव्हेंटच्या कामासाठी महाराष्ट्रातून उदयपूरला बोलावून एका तरुणीवर फार्म हाऊसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, उदयपूरमध्ये गेल्या 23 दिवसांतील सामूहिक बलात्काराची ही दुसरी मोठी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची मुंबईची राहणारी आहे. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, उदयपूरमधील हिरणमगरी भागातील रहिवासी असलेल्या करण सिंह नावाच्या व्यक्तीने तिला एका इव्हेंटच्या कामासाठी महाराष्ट्रातून उदयपूरला येण्याचे आमंत्रण दिले होते. सुरुवातीला तरुणीने येण्यास नकार दिला होता, मात्र आरोपीने अधिक पैशांचे आमिष दाखवून तिला उदयपूरला येण्यास भाग पाडले.
तरुणी उदयपूरला (Udaipur) पोहोचल्यानंतर आरोपी तिला सुखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन फार्म हाऊसवर घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपी करण सिंह आणि त्याच्या दोन मित्रांनी दारुची पार्टी आयोजित केली होती. आरोपींनी स्वतः मद्यप्राशन केले आणि पीडित तरुणीलाही जबरदस्तीने दारु पाजली. तरुणी नशेच्या धुंदीत गेल्यानंतर आरोपी करण सिंह आणि त्याच्या एका साथीदाराने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
पीडित तरुणीने थेट पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात धाव घेऊन आपली आपबिती सांगितली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या वेळी फार्म हाऊसवर आरोपीचे आणखी तीन साथीदार उपस्थित होते, ज्यांची भूमिकाही संशयास्पद मानली जात आहे. या तक्रारीच्या आधारे सुखेर पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने कारवाई करत मुख्य संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, त्याचे इतर साथीदार अद्याप फरार असून पोलीस पथके त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत.
उदयपूरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. 23 दिवसांपूर्वी एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यासोबतही अशाच प्रकारची सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्या प्रकरणात कंपनीच्याच पदाधिकाऱ्यांनी महिला सहकाऱ्याच्या मदतीने हे घृणास्पद कृत्य केले होते. एकामागून एक घडणाऱ्या अशा घटनांमुळे पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी (Police) फार्म हाऊस मालकाचीही चौकशी सुरु केली आहे. तसेच, घटनास्थळावरुन काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील तरुणीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राजस्थान आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांत या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.