Delhi Mumbai Expressway Accident: राजस्थानमधील दौसा येथून एक काळजाचा ठोका चुकवणारी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. हरिद्वारहून इंदूरच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवासी बसची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर काही वेळातच बसने पेट घेतला आणि आगीने रौद्ररुप धारण केले. अपघाताच्या वेळी या बसमध्ये एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये बहुतांश प्रवासी हे मध्य प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
हा भीषण अपघात कोलावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारपुरा गावाजवळ असलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर घडला. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, ज्यामुळे अनेक प्रवासी आगीत गंभीररीत्या होरपळले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी आणि तात्काळ पोहोचलेल्या मदत पथकाने जीवाची बाजी लावून काही प्रवाशांना बसच्या खिडक्या तोडून सुरक्षितपणे बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, अग्निशामक दल आणि वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन बसला लागलेली आग आटोक्यात आणली. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवत एक्सप्रेसवेवर विशेष 'ग्रीन कॉरिडोअर' तयार केला. या ग्रीन कॉरिडोअरमुळे रुग्णवाहिकांना कोणताही अडथळा न येता अपघातग्रस्तांना थेट दौसा जिल्हा रुग्णालयात वेळेत दाखल करणे शक्य झाले, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या भीषण अपघातामुळे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ वाहतूक इतर मार्गांवर वळवली आणि मदत व बचाव कार्यासाठी रस्ता रिकामा करुन दिला. सध्या पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच मध्य प्रदेशातील त्यांच्या नातेवाईकांना या अपघाताची (Accident) माहिती देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि प्रवाशांच्या गावांवर शोककळा पसरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.