PM Modi Interview: अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत रविवारी (16 मार्च) प्रसारीत झाली. तीन तासांच्या या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या जीवनातील अनेक अनुभव सांगितले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी आपले बालपण, गुजरात दंगल, आरएसएस, पाकिस्तान, रशिय-युक्रेन युद्ध आणि महात्मा गांधींचे त्यांच्या जीवनातील स्थान यासह अनेक विषयावर सविस्तररित्या सांगितले. पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीपूर्वी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी 45 तासांचा उपवास ठेवला होता.
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी आपल्या बालपणाविषयी पहिल्यांदा सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, ''माझे बालपण अत्यंत हालाखीत गेले, पण मी कधीही गरिबीचे ओझे मानले नाही. कधीही धीर न सोडता अडचणींचा सामना करत गेलो. कधीही वंचिताची भावना मनात येऊ दिली नाही.'' पंतप्रधान पुढे म्हणाले की, “मला माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या आईवडिलांबद्दल, भावंडांबद्दल, माझ्या काका-काकूंबद्दल आणि आजी-आजोबांबद्दल अनेक गोष्टी आठवतात. आम्ही सर्वजण तेव्हा एका छोट्या घरात एकत्र राहत होतो. आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घराला खिडकीही नव्हती. ती जागा कदाचित आपण आता जिथे बसलो आहोत त्यापेक्षाही लहान होती. घराला फक्त एक छोटासा दरवाजा होता.''
फ्रिडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) हिमालयातील आपल्या अनुभवाविषयी विचारले असता पंतप्रधान भावूक झाले. पंतप्रधान म्हणाले की, ''मी हिमालयात असताना एकांतात खूप वेळ घालवला. माझ्या या प्रवासामध्ये मला अनेक तपस्वी लोक भेटले. सर्वस्वाचा त्याग करणारे लोक भेटले. यादरम्यान माझे मन कधीही अस्वस्थ राहिले नाही. हे माझे कुतूहलाचे, शिकण्याचे, समजून घेण्याचे वय होते. हा माझ्या आयुष्यातील खूप काही शिकवणारा अनुभव होता. या सगळ्या गोष्टींनी मला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या अनुभवाने मला माझ्या आंतरिक शक्तीचा शोध घेण्याची ओळख करुन दिली. ध्यानधारणा करणे, पहाटे उठणे, थंड पाण्याने स्नान करणे, भक्तीने लोकांची सेवा करणे हे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनले.''
फ्रिडमन यांनी मुलाखतीदरम्यान पुढे पंतप्रधान मोदींना तुम्ही आठ वर्षांचे असताना आरएसएसमध्ये सामील झालात. आरएसएस हिंदू राष्ट्रवादाचे समर्थन करते. तुमच्या आयुष्यावर आरएसएसचा (RSS) काय परिणाम झाला? असा प्रश्न विचारला असता पंतप्रधान म्हणाले की, ''आरएसएसमुळे जीवनाला दिशा मिळाली. मी स्वत:ला भाग्यशाली मानतो की मला माझ्या जीवनाचा उद्देश्य आणि निस्वार्थ सेवेचे मूल्य आरएसएसमधून मिळाले. आरएसएस आज मोठ्या प्रमाणावर शिक्षण आणि आरोग्य सेवा देशभरात उपलब्ध करत आहे.''
मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्यापासून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''प्रत्येक भारतीय व्यक्तीने महान गणितज्ज्ञ रामानुजन यांचा आदर केला पाहिजे. मी पण रामानुजन यांचा खूप आदर करतो. त्यांच्यापासून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. सायन्स आणि अध्यात्मामध्ये फार मोठे कनेक्शन आहे.''
पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींचे जनआंदोलनाचे स्वप्न त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला कसे प्रेरणा देते हे स्पष्ट केले. पंतप्रधानांनी सांगितले की, ''त्यांच्या दृष्टिकोनातून, ते नेहमीच प्रत्येक उपक्रमात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरुन ती सार्वजनिक सहभागासह एक जनचळवळ बनू शकेल. महात्मा गांधी हे केवळ 20व्या शतकातीलच नव्हे तर 21व्या शतकातील आणि येणाऱ्या शतकातीलही महान नेते आहेत.''
पंतप्रधान मोदींना विरोधक ज्या मुद्यावरुन घेरतात त्या गोध्रा घटनेवरही ते स्पष्टपणे मुलाखतीदरम्यान बोलले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''गोध्रा घटनेबाबत खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या. 2002 पूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक दंगली झाल्या होत्या आणि जातीय हिंसाचार वारंवार होत असे. 2002 पासून गुजरातमध्ये अशी एकही दंगल झालेली नाही. दंगलीनंतर लोकांनी त्यांची प्रतिमा कशी डागाळण्याचा प्रयत्न केला हे देखील त्यांनी अधोरेखित केले, परंतु शेवटी न्यायाचा विजय झाला आणि न्यायालयांनी त्यांना निर्दोष सोडले. माझे सरकार मतपेढीचे राजकारण करत नाही तर "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या तत्त्वाचे पालन करते, असे पंतप्रधान म्हणाले.
मुलाखतीदरम्यान रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींना विचारण्यात आले. त्यावर मोदी म्हणाले की, ''दोन्ही देशांनी शांततेने एकत्र येऊन हा प्रश्न सोडवायला हवा तर हा गुंता सुटेल. मी सद्भभावाचे समर्थन करतो. आम्ही निर्सगाविरोधात संघर्ष पसंद करत नाही तसेच राष्ट्रा-राष्ट्रा मधील संघर्षही पसंद करत नाही. आम्ही हा संघर्ष मिठवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहोत. माझे रशियाशी घनिष्ट संबंध आहेत. तसेच युक्रेनशी देखील घनिष्ठ संबंध आहेत. मी दोन्ही राष्ट्रप्रमुखांना एकत्र येऊन प्रश्न सोडवण्याची विनंती करतो.''
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान संबंधांबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. पंतप्रधान म्हणाले की, ''आम्हाला पाकिस्तानकडून चांगली कृतीची अपेक्षा आहे. परंतु त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे नकारात्मक प्रतिसाद मिळाला. आमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना पाकिस्तानने विश्वासघाताने उत्तर दिले. मला वाटते की पाकिस्तानच्या लोकांनाही शांतता हवी आहे कारण तेही संघर्ष, अशांतता आणि सततच्या दहशतीत जगून कंटाळले आहेत.''
पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळांसह आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट संघांबाबत प्रश्न केले. खेळांचा उद्देश हा ऊर्जा संचारित करण्याचा आहे. मी खेळांकडे मानवी विकासाच्या दृष्टीकोनातून पाहतो. तसेच मी खेळाची बदनामी होताना पाहू शकत नाही, असे मोदींनी म्हटले.
जेव्हा लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान मोदींना विचारले की, भारत एआयच्या क्षेत्रात अमेरिकेपेक्षा मागे आहे, तेव्हा सर्वोत्तम होण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? पंतप्रधान मोदींनी या प्रश्नाचे उत्तर खूप चांगल्या पद्धतीने दिले. पंतप्रधानांनी आपल्या उत्तरात फ्रान्समध्ये झालेल्या एआयच्या परिषदेचाही उल्लेख केला. फ्रान्समध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या एआय परिषदेनुसार, भारतात मोठ्या संख्येने अभियंते आहेत. जे जगातील सर्वात प्रतिभावान अभियंत्यांपैकी एक आहेत. इथे खऱ्या प्रतिभेची कमतरता नाही. खऱ्या बुद्धिमत्तेशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता अपूर्ण आहे. खरी बुद्धिमत्ता भारतातील तरुणांमध्ये आहे. ही भारताची एक मोठी ताकद आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.