टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. या सामन्यात त्याला सलग दुसऱ्यांदा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट बनण्याची संधी असून तो इतिहास रचू शकतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना रविवार, २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले असून भारताने दोन्ही सामने जिंकले आहेत. आता निर्णायक लढतीतही भारताचा वरचष्मा टिकवून ठेवण्यासाठी कुलदीप यादवची भूमिका महत्वाची ठरेल.
आतापर्यंत आशिया कपच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला सलग दोनदा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडले गेलेले नाही. कुलदीप यादवला मात्र ती संधी मिळू शकते. २०२३ च्या आशिया कपमध्ये त्याने ९ विकेट्स घेत प्लेअर ऑफ द सीरिजचा किताब पटकावला होता. यावेळीही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
कुलदीप यादवने आतापर्यंत आशिया कप २०२५ मध्ये ६ सामने खेळले असून १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी ९.८४ असून इकॉनॉमी रेट ६.०४ आहे. ७ धावांत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असून ती त्याने यूएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केली होती. फक्त २.१ षटकांत त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजी उद्ध्वस्त केली होती.
कुलदीपचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रमही प्रभावी राहिला आहे. या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध तो नेहमीच मॅच विनर ठरला आहे. त्यामुळेच अंतिम सामन्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. जर तो आपल्या नेहमीच्या फिरकीच्या जादूने पाकिस्तानच्या फलंदाजीला रोखण्यात यशस्वी ठरला, तर भारताला विजेतेपद मिळवणे सोपे जाईल.
काही काळ भारतीय संघातून बाहेर राहिल्यानंतर कुलदीपने जोरदार पुनरागमन केले आहे. संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास त्याने कामगिरीतून सार्थ ठरवला आहे. त्यामुळेच आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात तो भारतीय विजयाचा शिलेदार ठरू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.