केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद'च्या घोषणांबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, या दोन्ही घोषणा पहिल्यांदा दोन मुस्लिमांनी दिल्या होत्या. अशा स्थितीत संघ परिवार या घोषणांचा त्याग करणार का? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) ज्येष्ठ नेते आणि केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी उत्तर केरळमधील मुस्लिमबहुल जिल्हा मलप्पुरममध्ये हे वक्तव्य केले. विजयन म्हणाले की, ''देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम राज्यकर्ते, सांस्कृतिक नायक आणि अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.''
दरम्यान, उदाहरण देताना विजयन म्हणाले की, ''अजीमुल्ला खान नावाच्या मुस्लिम व्यक्तीने 'भारत माता की जय'ची घोषणा दिली होती. येथे आलेल्या संघ परिवारातील काही नेत्यांनी सभेत बसलेल्या लोकांना 'भारत माता की जय'ची घोषणा देण्यास लावले. ही घोषणा पहिल्यांदा अजीमुल्ला खान यांनी दिली होती. हे संघ परिवाराला माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही.'' विजयन उपरोधिकपणे म्हणाले की, 'संघ परिवारातील लोक ही घोषणा देणे बंद करतील की नाही हे माहीत नाही कारण ती एका मुस्लिमाने पहिल्यांदा दिली होती.'
दुसरीकडे, पिनराई विजयन हे वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात राज्यात सीपीआय(एम) ने आयोजित केलेल्या सलग चौथ्या रॅलीला संबोधित करत होते. ते म्हणाले की, ''आबिद हसन नावाच्या व्यक्तीने सर्वप्रथम 'जय हिंद'चा नारा दिला होता. विजयन यांच्या मते, मुघल सम्राट शाहजहानचा मुलगा दारा शिकोह याने मूळ संस्कृत ग्रंथातून 50 हून अधिक उपनिषदांचे फारसी भाषेत भाषांतर केले होते, ज्यामुळे भारतीय ग्रंथ जगभरात पोहोचले.'' ते शेवटी म्हणाले की, ''भारतातून मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवण्याचा पुरस्कार करणारे संघ परिवारातील नेते आणि कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक संदर्भाची दखल घ्यायला हवी.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.