भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आज, २५ सप्टेंबर रोजी दुबई येथे पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर केला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार असून दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात आठ वर्षांनी पुनरागमनाची संधी मिळालेल्या करुण नायरला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. चार सामन्यांत आठ डाव खेळून त्याने २०७ धावा केल्या, पण केवळ एकदाच अर्धशतक गाठले. त्यामुळे आता त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
श्रेयस अय्यरच्या निवडीची अपेक्षा होती. पण दोन दिवसांपूर्वीच त्याने ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या अनधिकृत कसोटीतून अचानक माघार घेतली. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की अय्यरने रेड-बॉल क्रिकेटपासून सहा महिन्यांचा ब्रेक मागितला असून त्यामुळे त्याला या मालिकेतून वगळण्यात आले आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या कसोटीत उजव्या घोट्याला झालेल्या फ्रॅक्चरमुळे अद्याप फिट नाही. त्यामुळे त्याची निवड झाली नाही. तो नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.