Important Advisory Indian Embassy: वादळ आणि मुसळधार पावसामुळे UAE मधील परिस्थिती बिकट झाली आहे. अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. UAE मधील वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. अनेक हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची परिस्थिती आहे. दुबईमध्ये पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. 45 हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली आहेत. एका अंदाजानुसार, गेल्या 75 वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. देशाच्या हवामान संस्थेने या पावसाला 'ऐतिहासिक हवामान घटना' म्हटले आहे. दरम्यान, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने शहर आणि UAE च्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भारतीय आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी 'हेल्पलाइन नंबर' सुरु केले आहेत.
दरम्यान, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये 'हेल्पलाइन नंबर' नमूद केले आहेत, ज्याद्वारे खराब हवामानामुळे प्रभावित भारतीय लोक मदत घेऊ शकतात. वाणिज्य दूतावासाने असेही म्हटले आहे की, अडकलेल्या प्रवाशांची सोय करण्यासाठी ते यूएई अधिकारी आणि विमान कंपनीच्या संपर्कात आहे.
भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले- प्रवाशांना एअरलाइनशी संबंधित अद्ययावत माहिती दिली जात आहे. भारतीय समुदाय संघटनांच्या सहकार्याने मदत कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, आम्ही अडकलेले प्रवासी आणि भारतातील त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत हेल्पलाइन नंबर सुरु राहतील.
दूतावासाने पुढे सांगितले की, यूएईचे अधिकारी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. दरम्यान, विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, उड्डाणांच्या प्रस्थानाची तारीख आणि वेळेबाबत संबंधित एअरलाइन्सकडून माहिती मिळाल्यानंतरच प्रवाशांना विमानतळावरुन प्रवास करता येईल.
दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला UAE मधील प्रतिकूल हवामानामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील फ्लाइट्सची संख्या कमी करण्यात आली आहे, असे भारतीय दूतावासाच्या अॅडवायझरीमध्ये म्हटले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा तेथून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना ऑपरेशन्स सामान्य होईपर्यंत अत्यावश्यक प्रवासाचे वेळापत्रक पुनर्संचयित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दुबईसह देशाच्या इतर भागांमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक महामार्ग आणि हमरस्ते पाण्याने भरले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे लोकांना घरातच राहावे लागले आहे. मात्र या पावसात फारशी जीवित वा वित्तहानी झालेली नाही.
आज, जागतिक विमान कंपन्यांना जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या 'दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' च्या टर्मिनल 1 वरुन उड्डाणे चालवण्याची परवानगी मिळाली आहे. ट्विट करुन सांगण्यात आले की, फ्लाइट्सला सतत विलंब आणि व्यत्यय येत आहे, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्याकडे निश्चित बुकिंग असेल तरच टर्मिनल 1 वर या. एक दिवस आधी, अनेक भारतीय विमान कंपन्यांनी 18 एप्रिलपर्यंत त्यांची विमानसेवा रद्द केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.