डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन शॉपिंगमुळे घरबसल्या वस्तू मागवणे आता अगदी सोपे झाले आहे. मात्र, याच सुविधेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधत आहेत. लिंक पाठवणे, बनावट ग्राहक सेवा क्रमांकावरून फोन करणे किंवा बँक अधिकारी असल्याचे भासवणे, या पारंपरिक पद्धतींबरोबरच आता फेक पार्सलच्या माध्यमातूनही नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. विशेष म्हणजे, एखाद्या व्यक्तीने कोणतीही वस्तू मागवलेली नसतानाही तिच्या घराच्या पत्त्यावर पार्सल आणले जाते आणि ते परत करण्याच्या बहाण्याने गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
सायबर ठग केवळ तांत्रिक पद्धतींचा वापर करत नाहीत, तर लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना जाळ्यात ओढतात. कधी आकर्षक बक्षिसाचे आमिष दाखवले जाते, तर कधी ओळखीच्या व्यक्तीचे नाव घेऊन पैसे मागितले जातात.
एका प्रकरणात ऑनलाइन खरेदी केल्यानंतर एका महिलेला महागडा मोबाइल जिंकण्याची संधी मिळाल्याचा संदेश मिळाला. त्यानंतर आलेल्या फोनमध्ये संबंधित व्यक्तीने कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा संदर्भ देत पैशांची मागणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने तातडीने पैसे न पाठवता परिस्थितीची खात्री करण्याचा निर्णय घेतल्याने संभाव्य फसवणूक टळली.
फेक डिलिव्हरीच्या प्रकरणात ठगांचा पॅटर्न आणखी धोकादायक ठरू शकतो. समजा, तुमच्या नावावर एखादे कॅश ऑन डिलिव्हरी पार्सल आल्याचे सांगत एखादी व्यक्ती घरी आली. तुम्ही कोणतीही ऑर्डर केलेली नसल्याचे सांगितल्यानंतरही ते पार्सल परत नेण्यास नकार देऊ शकतात.
त्यानंतर ‘ऑर्डर रद्द करण्यासाठी’ किंवा ‘पार्सल रिटर्न करण्यासाठी’ मोबाईलवर आलेला OTP सांगण्यास सांगितले जाऊ शकते. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे OTP कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तीला सांगू नये. कारण हा कोड पार्सल रद्द करण्यासाठी नसून एखाद्या खात्याची पडताळणी किंवा अन्य संवेदनशील व्यवहारासाठी वापरला जाण्याची शक्यता असते.
अशा फसवणुकीमध्ये ठगांकडून पीडित व्यक्तीला विचार करण्यासाठी वेळ दिला जात नाही. ‘आत्ताच OTP द्या’, ‘नाहीतर पार्सल परत जाणार नाही’, ‘कंपनीच्या नियमांनुसार कोड आवश्यक आहे’ अशा शब्दांत दबाव निर्माण केला जातो.
त्यामुळे समोरची व्यक्ती संभ्रमित होऊन चुकीचा निर्णय घेऊ शकते. अनेकदा ठग स्वतःला डिलिव्हरी कर्मचारी, बँक अधिकारी, कंपनीचा प्रतिनिधी किंवा सरकारी कर्मचारी म्हणून सादर करतात. त्यामुळे समोरची व्यक्ती विश्वास ठेवते आणि गोपनीय माहिती शेअर करण्याची शक्यता वाढते.
सायबर फसवणूक ही केवळ तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या व्यक्तींनाच होते, असे समजणे चुकीचे आहे. डिजिटल व्यवहारात नियमितपणे सक्रिय असलेले आणि उच्च शिक्षण घेतलेले लोकही अशा घटनांचे बळी ठरू शकतात.
कारण अनेक फसवणुकींमध्ये तांत्रिक कमतरतेपेक्षा मानसिक दबावाचा वापर केला जातो. भीती, लोभ, उत्सुकता आणि घाई या भावनांचा फायदा घेत ठग व्यक्तीला निर्णय घेण्यास भाग पाडतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहारांची माहिती असतानाही अचानक आलेल्या परिस्थितीत व्यक्तीकडून चूक होऊ शकते.
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण ही आता गंभीर समस्या बनली आहे. उपलब्ध सरकारी आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर आर्थिक फसवणुकीशी संबंधित ६५.८९ लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. या प्रकरणांमध्ये नागरिकांचे तब्बल ५५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आकडे सांगतात.
२०२१ मध्ये आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींची संख्या सुमारे २.६२ लाख होती, तर २०२५ मध्ये ती २४ लाखांपेक्षा जास्त झाली. यावरून सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती किती वेगाने विस्तारत आहे, याची कल्पना येते. डिजिटल अरेस्ट, बनावट कुरिअर, केवायसी अपडेट, यूपीआय रिक्वेस्ट आणि गुंतवणुकीच्या आमिषासह अनेक मार्गांचा वापर केला जात आहे.
अनोळखी व्यक्तीने फोन करून किंवा प्रत्यक्ष घरी येऊन कोणतीही गोपनीय माहिती मागितल्यास तात्काळ सावध होणे गरजेचे आहे. OTP, UPI PIN, बँक पासवर्ड किंवा कार्डशी संबंधित संवेदनशील माहिती कोणालाही सांगू नये. आपण कोणतीही ऑर्डर केलेली नसल्यास पार्सल स्वीकारण्यापूर्वी संबंधित शॉपिंग अॅपवर ऑर्डरची माहिती तपासा.
संशयास्पद परिस्थितीत व्यवहार करू नका आणि संबंधित कंपनीच्या अधिकृत माध्यमातूनच माहितीची पडताळणी करा. फसवणूक झाल्यास किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. तसेच संबंधित संदेश, फोन क्रमांक, व्यवहाराच्या पावत्या आणि इतर पुरावे जतन करून ठेवावेत. लक्षात ठेवा, तुम्ही ऑर्डरच केलेली नाही, तर ते पार्सल परत करण्यासाठी आलेला OTP सांगण्याचीही गरज नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.