विजयनगर साम्राज्य आणि विजापूरच्या सल्तनत यांच्यात १५२०मध्ये प्रसिद्ध ‘रायचूरची लढाई’ रायचूर शहरात झाली. हे शहर भारतातील कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्याचे मुख्यालय. रायचूर हे शहर कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या मध्ये स्थित आहे. या लढाईमुळे विजयनगरच्या सैन्याला निर्णायक विजय मिळाला आणि विजापूरच्या सल्तनतचा पराभव झाला. त्यांना कृष्णा नदी ओलांडून पुढे ढकलण्यात आले. रायचूरचा किल्ला १२९४मध्ये काकतीय राजा प्रतापरुद्र याने बांधला आणि काकतीयांच्या पतनानंतर तो विजयनगर राज्याकडे गेला. हा किल्ला जवळजवळ दोन दशके काकतीय राज्याकडे होता.
१३२३मध्ये दख्खनच्या इतर भागांसह हा किल्ला दिल्ली सल्तनतचा मुहम्मद बिन तुघलकने ताब्यात घेतला व थोड्याच वर्षांत म्हणजे १३४७मध्ये बहामनी सल्तनतच्या ताब्यात हा किल्ला आला.
विजयनगर राजा सालुवा नरसिंह देवरायाने बहमनींकडून रायचूर शहर परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. रायचूरच्या प्रसिद्ध लढाईची तात्काळ सुरुवात १५२०मध्ये झाली.
विजयनगर सम्राट कृष्णदेवरायाने त्याच्या सेवेत असलेल्या मुस्लीम सय्यद मराईकला घोडे खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेसह गोव्याला पाठवले. गोव्यात घोडे खरेदीसाठी आलेल्या सय्यद मराईकरने सम्राट कृष्णदेवरायांचा विश्वासघात केला आणि सम्राटाचे पैसे घेऊन आदिल शाहकडे सेवेत गेला. मराईकरला पैशांसह परत करण्याची सम्राट कृष्णदेवरायाची मागणी नाकारण्यात आली. शांततेच्या काळात सम्राट कृष्णदेवरायाने रायचूरवर मोठ्या हल्ल्याची व्यापक तयारी केली होती.
विजयनगरच्या सैन्याचा मुख्य सेनापती सलुवा तिम्मारुसु होता ज्याला सलुवा तिम्मा असेही म्हणत. समकालीन स्रोतांनुसार विजयनगर साम्राज्यात ३२,६०० घोडदळ आणि ५५१ हत्तींचा समावेश होता. सुरुवातीला, रामलिंग नायक ३०,००० पायदळ ,१००० घोडदळ आणि काही युद्ध हत्तींसह अग्रभागाचे नेतृत्व करत होते. त्याच्यानंतर सेनापती हहांडे मल्लाराय, सेनापती तिम्मप्पा नायक, अडापा नायक आणि गंडा राया सारखे सेनापती आपापल्या सैन्यासह मागून येत असत.
इतर उल्लेखनीय नेत्यांमध्ये जगदेव, रायचुरी रामी नायडू आणि कुमार विरय्य यांचा समावेश होता. विजापूर सल्तनतमध्ये ७००० घोडदळ आणि २५० हत्तींचा समावेश होता. १,२०,००० पायदळ, १८,००० घोडे आणि १५० हत्तींचे बलवान सैन्य असलेला आदिल शाह मदत करण्यासाठी पुढे गेला, संख्याबळापेक्षा जास्त असूनही, त्याचा तोफखाना लक्षणीय होता.
कृष्णा नदीवर पोहोचल्यावर, त्याला विजयनगर सैन्याने ती रोखलेली आढळली. त्यानंतर तो नदी ओलांडून सम्राट कृष्णदेवरायाच्या छावणीकडे गेला. दोन्ही सैन्यांनी युद्धाची तयारी केली आणि सज्ज राहून एक रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी, सम्राट कृष्णदेवरायने आदिल शाहवर हल्ला करण्याचा आदेश दिला, सुरुवातीला विजयनगर सैन्य प्रगती करत होते परंतु त्यांना विजापुरींकडून जोरदार तोफखान्याचा सामना करावा लागला.
विजयनगर सैन्य गोंधळात माघारले आणि कृष्णदेवरायाने प्रतिहल्ला करण्यासाठी आपल्या सैन्याची जमवाजमव केली, ज्यामुळे शेवटी शत्रू घाबरला आणि शत्रूने माघार घेतली. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय याने आपल्या उर्वरित सैन्याला प्रोत्साहन दिले, पळून जाण्याऐवजी सैनिक म्हणून मरण्याची प्रतिज्ञा केली. त्याने निष्ठावंत अधिकाऱ्यांना बोलावले आणि त्यांनी एकत्रितपणे शत्रूवर हल्ला केला. या अनपेक्षित प्रतिहल्ल्यामुळे विजापूरला माघार घ्यावी लागली, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि दोन्ही बाजूंनी अनेक लोकांचे बळी गेले.
विजयनगरच्या सैन्यात १६,०००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले, तर विजापुरींनी मिर्झा जहांगीरसह अनेकांना गमावले आणि सलाबुत खानसह पाच महत्त्वाचे सरदार कैद झाले. शत्रू माघार घेत असल्याचे पाहून, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवरायाच्या सेनापतींनी युद्ध सुरू ठेवण्याची परवानगी मागितली. तथापि, शांततेला प्राधान्य देत, सम्राट कृष्णदेवरायाच्या सैन्याला माघार घेण्याचा आदेश दिला.
विजापूरच्या छावणीवर कब्जा केल्यानंतर, सम्राट कृष्णदेवरायने लुटीतील माल मोजला तर १०० हत्ती, ४०० तोफा, तंबू, घोडे, बैल आणि इतर प्राणी होते. त्याने बंदिवान महिलांना सोडले, मृतांचे अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले गेले. युद्धात सम्राट कृष्णदेवराय रायचूरच्या वेढ्यात असताना, क्रिस्टोव्हाओ डी फिगरेडो यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज तुकडीचा वापर करून अग्निशस्त्रांचा वापर केल्याने किल्ला जिंकण्यास मदत झाली होती.
पोर्तुगीजांशी संपर्क साधून मिळवलेल्या मॅचलॉक नावाच्या बंदुकीचा वापर विजयनगर साम्राज्याच्या सैन्यानेही केला असण्याची शक्यता जास्त आहे . या व्यतिरिक्त, निराश होऊन आणि त्यांचा राज्यपाल मारला गेल्याने, सैन्याने शरणागती पत्करली. पोर्तुगीज अहवालात असे म्हटले आहे की विजापूर सल्तनतने तोफांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. विजयनगर साम्राज्याने त्यांचा कमीत कमी वापर केला. विजापूर सल्तनतकडे उत्कृष्ट अग्नी अस्त्र व तोफखाना असूनही विजयनगर साम्राज्य विजयी झाले.
जेव्हा रायचूर शहराने शरणागती पत्करली तेव्हा सम्राट कृष्णदेवरायाने शहरात विजयी प्रवेश केला. सम्राट कृष्णदेवराय रायचूरच्या विजापुरी सेनापतींशी क्रूरपणे वागला. अनेक विजापुरी सेनापतींनी त्यांच्या जमिनी गमावल्या. त्यांनी जाहीर केले की जर आदिल शाह त्यांच्याकडे आला, त्यांना शरण गेला आणि त्यांचे पायाचे चुंबन घेतले तर त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळतील. त्यानंतर सम्राट कृष्णदेवरायांनी त्यांचे सैन्य उत्तरेकडे विजापूरपर्यंत नेले आणि ते ताब्यात घेतले.
विजयनगरला परत आल्यावर सम्राट कृष्णदेवरायांनी इस्माईल आदिल खानच्या राजदूताला भेट दिली, ज्याने रायचूर किल्ल्यासह ताब्यात घेतलेल्या वस्तू परत करण्याची विनंती केली. सम्राट कृष्णदेवरायांनी आदिलशाहला शरण येण्याची अट घातली व ही बैठक मुदगल येथे नियोजित केली गेली, परंतु जेव्हा सम्राट कृष्णदेवराय आले तेव्हा आदिलशाह अनुपस्थित होता. संतापून सम्राट कृष्णदेवराय विजापूरवर चढाई करून गेला, आदिल शाह पळून गेला आणि सम्राट कृष्णदेवरायाने राजवाडा ताब्यात घेतला. शहर ताब्यात घेण्याचा सम्राटचा हेतू नसला तरी, विजापूरचे बरेच नुकसान झाले होते.
काही इतिहासकारांच्या मते कृष्णदेवराय शुक्रवारी युद्ध करण्यास तयार होते, परंतु त्यांच्या नगरसेवकांनी त्यांना त्यांचा हल्ला दुसऱ्या दिवसापर्यंत पुढे ढकलण्यास भाग पाडले, कारण शुक्रवार अशुभ होता. त्यानुसार युद्ध शनिवारी झाले, जो अमावस्येचा दिवस होता. विश्वासघात होऊनही मोठ्या धैर्याने लढत कृष्णदेवरायांनी जिंकलेली रायचूरची लढाई इतिहासातली एक अनवट लढाई ठरली.
सर्वेश बोरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.