Assembly Election Result 2023: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप पूर्ण बहुमतासह सरकार बनवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. आतापर्यंतच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम म्हणाले की, ''गांधी कुटुंब ही काँग्रेससाठी सर्वात मोठी 'पनवती' ठरत आहेत. राहुल गांधींमुळे काँग्रेसला सर्वत्र पराभवाचा सामना करावा लागत आहे.'' भाजप नेत्याची ही प्रतिक्रिया त्या संदर्भात आहे, ज्यात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना 'पनवती' म्हणत हल्ला चढवला होता.
भाजपचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळत आहे. या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे जनतेच्या सेवेसाठी समर्पित राहण्याचा राष्ट्रीय नेतृत्वाचा विचार आणि पंतप्रधान मोदींचे करिष्माई व्यक्तिमत्त्व.' ते पुढे म्हणाले की, ''गांधी कुटुंबाने पंतप्रधानांना जाणूनबुजून शिवीगाळ केली, मात्र असे असतानाही भाजप वेगाने पुढे जात आहे. पंतप्रधानांविरोधात केलेल्या अशोभनीय वक्तव्यावर जनतेने योग्य ते उत्तर दिल्याचे यावरुन सिद्ध होते. काँग्रेसने यातून धडा घेऊन राजकारणात असभ्य विधाने करणे थांबवावे.''
विरोधक या निवडणुकीत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करत होते. मात्र यानंतरही भाजपच आघाडी घेताना दिसत आहे. याचे कारण काय असू शकते? या प्रश्नावर भाजप नेते दुष्यंत गौतम म्हणाले की, ''देशातील जनतेचा एकतेच्या राजकारणावर विश्वास आहे. मात्र काँग्रेस आणि राहुल गांधी देश तोडण्याचे राजकारण करत आहेत. यामुळेच जनतेने काँग्रेसची विचारसरणी नाकारली.'' मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असेही ते पुढे म्हणाले.
गौतम पुढे असेही म्हणाले की, ''मागासलेल्या आणि दलित जातींना गेल्या 70 वर्षांत केवळ जातीच्या राजकारणाच्या नावाखाली बळीचा बकरा बनवले जात असल्याचे दिसून आले आहे. जे जातीचे राजकारण करतात, ते सत्ता मिळाल्यावर केवळ आपला फायदा पाहतात. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदीजींनी कल्याणकारी योजनांच्या सहाय्याने जातीचे राजकारण नष्ट केले आणि प्रत्येक जातीतील गरीबांचे कल्याण केले. यामुळेच आज जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास वाढत आहे आणि विरोधक प्रत्येक गोष्टीला तोंड देत आहेत.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.