Bihar Road Accident Six Dead Video: बिहारमधील अररिया जिल्ह्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली. या दुर्देवी दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. बैरगाछीहून सिकटीकडे जाणाऱ्या मार्गावरील बीडी पुलाजवळ भरधाव वेगातील स्कॉर्पियो अनियंत्रित होऊन थेट पुलावरुन खोल नदीत कोसळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
दरम्यान, या भीषण अपघातात गाडीतील सहा प्रवाशांचा पाण्यात बुडून आणि गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला, तर सुदैवाने एका तरुणाला स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. या जखमी तरुणावर सध्या अररिया येथील सदर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात (Accident) मृत्युमुखी पडलेले सर्वजण सुपौल जिल्ह्यातील पिपरा तालुक्यातील थुमहा गावचे रहिवासी होते. ते सिकटी तालुक्यातील ढेडुआ पंचायतीअंतर्गत येणाऱ्या भपटिया गावात एका तिलक समारंभासाठी गेले होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून आपल्या गावी परतत असताना ताराबाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैरगाछी-सिकटी मुख्य मार्गावरील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि स्कॉर्पियो थेट नदीत कोसळली. गाडी पाण्यात कोसळताच आतून आक्रोश ऐकू आला, मात्र काही क्षणांतच सर्वत्र शांतता पसरली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि वाटसरुंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. रात्रीच्या काळोखात पोलीस आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करुन दोरीच्या साहाय्याने गाडी नदीतून बाहेर काढली आणि प्रवाशांना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. या घटनेमुळे थुमहा गावातील आनंदाच्या वातावरणावर विरजन पडले असून पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.