Alana King Record: आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान महिला संघात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर चांगलाच सामना रंगला. विशेष या सामन्यात भारतीय वंशाच्या महिला खेळाडूने नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळणारी लेग-स्पिनर अलाना किंग (Alana King) हिने फलंदाजीत कमालीची कामगिरी करत महिला वनडे क्रिकेटमध्ये एक अनोखा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 विकेट्सच्या मोबदल्यात 221 धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येत अलाना किंगने अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले.
एका क्षणी ऑस्ट्रेलिया (Australia) महिला संघाची अवस्था खूपच नाजूक होती. 115 धावांवर त्यांचे 8 गडी बाद झाले होते. त्यानंतर 11 व्या क्रमांकावर असलेल्या बेथ मूनीला (Beth Mooney) साथ देण्यासाठी 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अलाना किंगने डाव केवळ सावरलाच नाही, तर एक लढण्यायोग्य धावसंख्या उभी करण्यात निर्णायक भूमिका बजावली. अलाना किंगने आपल्या 51 धावांच्या नाबाद खेळीत 3 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार लगावले. या खेळीमुळे अलाना महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारी जगातील पहिली खेळाडू ठरली.
यापूर्वी, विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या युलांदी वॅन डर मर्व हिच्या नावावर होता. तिने 2000 मध्ये भारतीय महिला संघाविरुद्ध 10 व्या क्रमांकावर खेळताना 42 धावांची नाबाद खेळी खेळली होती. मात्र आता अलाना किंगने हा 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
याच सामन्यात अलाना किंग आणि बेथ मूनी यांनी आणखी एक मोठा विक्रम मोडला. या दोघींमध्ये 9व्या विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी झाली. महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील 9व्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी, विक्रम ॲश्ले गार्डनर आणि किम गार्थ यांच्या नावावर होता. त्यांनी 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनीमध्ये 9व्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी खेळी होती. भारतीय वंशाच्या अलाना किंगच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 221 धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठली, ज्यामुळे सामन्यात रोमांच कायम राहिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.