पी. चिदंबरम Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Election: पी. चिदंबरम जादूगार नाहीत

गोव्यात भाजपधार्जिणे व अवसानघातकी राजकारण करू पाहाणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या नाकात वेसण घालण्यासाठी आलेले ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आल्याआल्या भेटीगाठींचा सपाटा लावलेला आहे.

दैनिक गोमन्तक

निरीक्षक पदावरील व्यक्तीकडून अशा प्रकारच्या प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा असली तरी चिदंबरम काही होत्याचे नव्हते करू शकणारे जादुगार नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यांच्याकडे जेमतेम चार महिन्यांचा काळ उपलब्ध असून, या एकशेवीस दिवसांत काँग्रेसला जडलेला संधीवात ते कितपत दूर करू शकतील, याविषयी शंका घेण्यासारखीच विद्यमान स्थिती आहे. पण त्यांनी जी सुरुवात केलीय ती आश्वासकच म्हणावी लागेल. पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात उठबस असलेला आणि थेट पक्षाध्यक्षांच्या विश्वासातला नेता आपले म्हणणे ऐकून घेतो या जाणिवेने काँग्रेसमधल्या गटातटांना दिलासा मिळेल. ऐनवेळी पक्षांत आलेल्या उपऱ्यांना उमेदवाऱ्यांची खिरापत वाटण्यातला धोका चिदंबरम यांना समजावून सांगण्यावर पक्षातल्या निष्ठावंतांनी आता भर द्यावा आणि त्याचबरोबर स्वतःची पक्षसेवा निष्काम असल्याचाही दाखला द्यावा.

चिदंबरम हे तसे बुद्धिमान व्यक्तिमत्त्व. स्वार्थी राजकारणाची चटक लागलेला तो कुणी गणंग नव्हे. हारवर्डसारख्या जगातील अव्वल विद्यापीठातले अध्ययन, विधी आणि वित्त या दोन महत्त्वाच्या क्षेत्रातील व्यवस्थापनाचा प्रगाढ अनुभव ही चिदंबरम यांची जमेची बाजू. प्रतिकूल परिस्थितीत पक्षासोबत राहून त्यांनी आपले राजकीय चारित्र्य अधोरेखित केले आहे. याआधी दिल्लीतून येणाऱ्या निरीक्षकांना तारांकित आतिथ्यात गुंडाळण्याची आणि सुटकेस दाखवून तृप्त करण्याची सवय लागलेल्या स्थानिक नेत्यांना चिदंबरम दाद देणार नाहीत, इतके निश्चित. गोव्यात येण्याआधी त्यांनी येथील पक्षसंघटना आणि तिचे प्रसारमाध्यमातले प्रतिबिंब यांचाही अभ्यास निश्चितपणे केला असेल आणि कोण किती खोल पाण्यात आहेत, याचा अंदाजही घेतला असेल. विरोधकांना पोकळ दंडाच्या बेटकुळ्या दाखवत फुटकळ विधाने करण्यापेक्षा पक्षसंघटनेला एका निश्चित दिशेने नेण्याचा त्यांचा यत्न दिसतो. तो कितपत समयोचित आहे हे पुढच्या चार महिन्यांत कळेलच.

चिदंबरम राजकीय शल्यचिकित्सेत पारंगत असले तरी गोव्यातली पक्षसंघटना रुग्णशय्या सोडून आता मृत्यूशय्येवर पोहोचली आहे, हे सत्य नजरेआड करता येणार नाही. स्वतःला केवळ नेतेच नव्हे तर चक्क मुख्यमंत्रीपदाचे भावी उमेदवार समजणारे आताही गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. काँग्रेस हा असा एकमेव पक्ष असेल ज्यांत नगरपालिकेची निवडणूकही न जिंकलेल्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडतात आणि त्यांच्या स्वप्नांना गोंजारणारेही भेटतात. स्वप्नरंजनात रमलेल्या या शेखचिल्लींच्या मर्यादा गोमंतकीय मतदाराला सहजपणे कळतात, ही बाब वेगळी. यातल्या काहींनी परपक्षीय आयातीतून आपल्याला समर्थन मिळेल अशी व्यवस्था करण्याचा सपाटा लावलेला आहे, पण ही आयात मतदारांच्या कसोटीवर उतरण्याची शक्यता अल्पच दिसते. निवृत्तीच्याही पार पुढे गेलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची सर्वांत मोठी समस्या म्हणजे त्यांना आपल्या पायाखाली काय जळतेय, तेही दिसत नसते. जमिनी सत्य किंवा वस्तुस्थितीचे भान नसलेले हे नेतृत्व केवळ निवडणुका दिसल्यावर हातपाय मारू लागते. गोमंतकीय मतदाराने सातत्याने काँग्रेसला लाथाडण्यामागचे कारण स्थानिक नेत्यांचे आत्ममग्न वर्तन. यातल्या ज्येष्ठांनी विरोधी पक्षाची जबाबदारीही अन्य पक्षांकडे वर्ग करण्याचा करंटेपणा दाखवला. विधानसभेत यांना कंठही फुटत नसतो. काहीजण सत्ताधारी पक्षाकडे आशाळभूतपणे नजरा लावून बसलेले तर काहींना गतआयुष्यातली वाममार्गी कुलंगडी बाहेर निघण्याचे भय. दिवाभीतांचा पक्ष अशी काँग्रेसची ओळख निर्माण होण्यामागचे या ढुढ्ढाचार्यांचे आणि निष्क्रियांचे योगदान चिदंबरम यांच्या जितके त्वरेने लक्षात येईल तितकेच ते पक्षाला लाभदायक ठरेल.

चिदंबरम केवळ दूत म्हणून गोव्यात आलेले नसून त्यांना काही कृती करण्याचे अधिकार पक्षाने दिल्याचे दिसते. विशेषतः समविचारी पक्षांना एकत्र करून भाजपाच्या विरोधात एक संघटित आघाडी उघडण्याचा त्यांचा यत्न असेल. भाजपाच्या व्यक्तीद्वेषी राजकारणाचा कडवट अनुभव त्यांनी घेतला आहे आणि भाजपाचे कट्टर विरोधक अशी आपली प्रतिमाही जपली आहे. दीर्घकाळ कैदेत टाकून त्यांचा तेजोभंग करण्याचा यत्न अमित शहा यांच्या नेतृत्‍वाखालील गृहमंत्रालयाने करून पाहिला, पण आजदेखील चिदंबरम भाजपावर आग ओकताना कोणतीही कसर सोडत नाहीत. पक्षाविषयी आणि नेत्यांविषयी आपले विचार ते परखडपणे मांडतात आणि सोनिया गांधी व त्यांची मुले या मतांचा आदर करतात. याच धारणांतून त्यांनी गोव्यातील वस्तुस्थितीचे वस्तुनिष्ठ परिशीलन केले तर त्यांना कळेल की भाजपाच्या सुसज्ज यंत्रणेशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही स्थानिक नेत्यांत नाही तर केवळ समविचारी पक्षांची युतीच भाजपासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकेल. भाजपाविरोधी मतांचे विभाजन झाले तर काँग्रेस संपल्यात जमा आहे, हे भाकीत त्यांच्या चाणाक्ष नजरेने टिपले असेल, याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. युतीसाठी स्थानिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घालण्याचे काम ते किती झपाट्याने करू शकतात, यावर त्यांच्या या भेटीचे यशापयश अवलंबून असेल. पक्षांतले त्यांचे वजन पाहाता गोव्यातील काँग्रेसमधल्या वळू आणि सांडानाही त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय पर्याय राहाणार नाही, हे नक्की. स्थानिक नेत्यांना स्वतःचे रागलोभ आणि फाजील महत्त्वाकांक्षा बाजूस सारून चिदंबरम यांच्या कृष्णशिष्टाईनुसारच यापुढे वागावे लागेल. ही त्यांच्यासाठीही शेवटचीच संधी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT