गोवा: सत्तरी तालुक्याजवळच्या सीमा भागात असलेल्या म्हादईच्या परिसराला निसर्ग सौंदर्यांचे मोठे देणे आहे. सत्तरी तालुक्यात म्हादई नदीचे भ्रमण आहे. या नदीच्या प्रवाहातून, परिसरातून फिरताना मनमुराद आनंद मिळत असतो. त्यामुळे म्हादईच्या परिसरात लोकांची गिरीभ्रमंती दिवसेंदिवस वाढतच आहे. नगरगाव व सावर्डे पंचायत क्षेत्रातील उस्ते, कडतरी, सोनाळ, नानोडा या गावातून पायी चालत कर्नाटक राज्यात कृष्णापुरला जाता येते. उस्ते भागातल्या, निर्जन लोकवस्तील्या झाडानी या गावातील बसवेश्वर मंदिराची कीर्ती दिवसें दिवस वाढतच चालली आहे. झाडानी (गोवा)हून चालत, यात्रा करत गोव्यातली बरीच मंडळी कृष्णापुरला (कर्नाटक), तिथे असलेल्या पिस्तेश्वर मंदिराला भेट द्यायला जातात. ‘पिस्तेश्वर’ ही तेथील राखण देवता आहे अशी भावना आहे.
म्हादईच्या तिरावर असंख्य गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाला वेगळेपण हे आहेच. पिस्तेश्वराचे पाषाण हे कृष्णापुर गावाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. लोकांची या देवावर मोठी श्रध्दा आहे. सोनाळ, उस्ते गावातून पायी चालत तिथे जावे लागते. त्यासाठी सुमारे 14 किलोमीटरचा पायी प्रवास घडतो. आधी उस्ते गावच्या, झाडानी येथे प्रथम बसवेश्वर मंदिर लागते व तिथून पुढचा प्रवास सुरु होतो. वाटेत म्होवाचो गुणो, कणसगाळ, काजरेधाट, कडवळ, साठेली, पेंडाळ अशी गावे भेटत जातात. सुमारे दोन अडीच तासांचा हा पायी होणारा प्रवास आहे. आधी म्हादई नदीचा प्रवाह ओलांडल्यानंतर डोंगराचे चढउतार तुडवावे लागतात.
डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत येथे जाता येते. पावसाळ्यात तिथे जाणे अवघड असते. पायी जाताना उंच-मोठ्या झाडांची मिळणारी सावली, थंड पाणी त्यामुळे त्रास जाणवत नाहीत. वाटेत असलेली पुरातन झाडे ही फार मोठ्या काळाची साक्ष देतात. मोठमोठी झाडे, त्यावर चढलेल्या विविध आकाराच्या वेली, आकर्षक फुले पाहून मन फुलून जाते. पिस्तेश्वरला पोहचले की प्रथम दिसतात ते पिस्तेश्वर कोंडीतील मोठे मासे. जाणारे लोक सोबत नेलेले तांदुळ, चुरमुरे या माशांना भरवतात. त्यावेळी हे मासे हातापाशी अगदी जवळ येतात. हे पिस्तेश्वर देवाचे मासे आहेत असे मानले जाते. त्यामुळे हे मासे कोणीही खात नाहीत. तसे बंधनही आहे. परिसरात दंगा मस्ती करणे, मांसाहार करता येत नाही. देवाची जागा असल्याने हा नियम पाळला जातो.
- पद्माकर केळकर
पिस्तेश्वर मंदिरात एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी नारळ ठेवून ‘आंगवणी’ करण्याची प्रथा आहे. मनोकामना पूर्ण झाली तर त्याची परतफेड म्हणून वर्षभरात आंगवणी पूर्ण करावी लागते. पिस्तेश्वराला दिलेला शब्द पाळावा लागतो. नाहीतर त्याचा विपरीत परिणाम होतो असे मानले जाते. त्यामुळे लोकांचे नेमाने येणे-जाणे होते. या परिसरात, जेवण बनविणे, आंघोळ करणे, पिस्तेश्वराची पूजा करणे, भोजन करणे, रात्रीची वस्ती केल्यास शेकोटीच्या सानिध्यात एकत्र राहणे हा अनुभव निसर्ग-आनंदाची प्रचिती देऊन जातो.
पिस्तेश्वर देवावरील श्रध्दा, भक्ती या बरोबरच निसर्ग सौंदर्याची झालेली सैर यामुळे ही यात्रा अविस्मरणीय बनते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.