Valley of Flowers
Valley of Flowers Dainik Gomantak
ब्लॉग

Valley of Flowers : नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान

गोमन्तक डिजिटल टीम

Valley of Flowers : समोर बघा’; विस्मयचकित झालेल्या होल्ड्सवर्थांचा उल्हसित स्वरातला आवाज ऐकून त्यांच्याबरोबर आलेल्या दोन गिर्यारोहकांनी, फ्रँक स्मिथ आणि एरिक शिप्टन यांनी, आपल्या डोळ्यांसमोर पाहिले. तेथे नुसत्या खडकांशिवाय त्यांना काहीच दिसले नाही. परत त्यांनी होल्ड्सवर्थांनी पुढे केलेल्या बोटाच्या दिशेने थोडा वेळ टक लावून बघितले आणि स्मिथ एकदम मंत्रमुग्धच झाले. दूरवर दृष्टी जाईल तेथपर्यंत समोरच्या दरीत जणू फुलांचा सुंदर गालीचा अंथरला गेला होता. आसपासच्या निळ्या फुलांचा टेकडीवर फाकलेला सौम्य निळसर प्रकाश वेगळीच चमक उधळत होता. या दरीतील रंगांची ही उधळण पाहून तिघेही अगदी भारून गेले. फ्रँक स्मिथ यांनी या दरीलाच नाव ठेवले ‘व्हॅली ऑफ फ्लावर्स’ आणि आपला अनुभव पुस्तकरूपाने वाचकांना सादर केला. या पुस्तकाचेही नाव त्यांनी ठेवले ‘व्हॅली ऑफ फ्लावर्स’.

1931 साली हे तीन गिर्यारोहक; फ्रँक स्मिथ, आर. एल. होल्ड्सवर्थ आणि एरीक शिप्टन, उत्तराखंड राज्यातील गढवाल येथील भारताच्या हिमालय पर्वतरांगांत 25,447 फूट उंचीवर असलेल्या ‘कामेट’ या शिखरावर गिरीभ्रमणासाठी गेले होते. यांपैकी होल्ड्सवर्थ हे वनस्पतीशास्त्रज्ञ होते. परत येताना ते तिघे रस्ता चुकले. काही केल्या त्यांना परतीची वाट सापडेना. गमसाळी गावातून धौलीच्या खोऱ्यात येऊन त्यांनी 16,668 फूट उंचीवर असलेल्या भ्युंदर खिंडीवाटे धौली आणि अलकनंदा खोऱ्यांचे विभाजन करणारी हिमालयाची झांस्कर रांग ओलांडली. त्यांना अलकनंदा आणि गंगोत्री या गंगेच्या उपनद्यांच्या उगमस्थानाचे, तेथील संपूर्ण पर्वतीय प्रदेशाचे भ्रमण अपेक्षित होते. थंडीचे दिवस होते, पावसाने सगळीकडे ओलावा आणि गारवा पसरला होता. रस्ता भरकटून ते या दरीत, पुष्पावती नदीच्या खोऱ्यात पोहोचले होते आणि रानफुलांनी बहरलेला हा निसर्गोत्सव बघून थक्क होऊन गेले होते. इतक्या मनोरंजक आणि अनपेक्षित रितीने या स्थानाचा शोध घेतला गेला होता. असे सांगितले जाते की, हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथांत या स्थानाचे वर्णन अनेक शतकांपासून केले गेले आहे.

‘व्हॅली ऑफ फ्लावर्स’ नावाने ओळखले जाणारे हे उद्यान पुष्पावतीच्या खोऱ्यात 30°41´उ ते 30°48´उ आणि 79°33´ ते 79°46´पू म्हणजे नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाच्या 23 कि.मी. वायव्येस (North-West) आहे. जोशीमठ नगराजवळ असलेल्या गोविंदघाटी या गावापासून घांगरियापर्यंत पोहोचल्यावर व्हॅली ऑफ फ्लावर्स फक्त 3 कि.मी. अंतरावर आहे. मधल्या काळात येथे लोकांचा अनियंत्रित वावर झाल्यामुळे काही उपक्रमांवर बंदी आणावी लागली. या स्थळाला 1982 साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. सध्या व्हॅली ऑफ फ्लावर्स आणि नंदादेवी राष्ट्रीय उद्यान या दोन्ही स्थानांना मिळून ‘नंदादेवी जैविक राखीव क्षेत्र’ (Nandadevi Biosphere Reserve) या नावाने संरक्षण दिले गेले आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान 1988 या वर्षी युनेस्कोच्या यादीत सूचीबद्ध करण्यात आले होते, तर व्हॅली ऑफ फ्लावर्स 2005 साली युनेस्कोच्या यादीत नंदादेवीला जोडले गेले. भारताच्या जैव-भौगोलिक वर्गीकरणाप्रमाणे व्हॅली ऑफ फ्लावर्स पश्चिम हिमालयीन जैव-भौगोलिक प्रांतात पडते. हे राखीव क्षेत्र पश्चिम हिमालयीन स्थानिक राखीव पक्षीक्षेत्रांमध्ये आहे.

भ्युंदर खिंडीच्या एका बाजूला व्हॅली ऑफ फ्लावर्स आहे तर दुसऱ्या बाजूला व्हॅली ऑफ फ्लावर्सला समांतर हेमकुंड खोरे आहे. शिखांसाठी हेमकुंड हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. व्हॅली ऑफ फ्लावर्समधून वाहणाऱ्या पुष्पावती नदीचा उगम येथील सर्वांत उंच शिखरावर, गौरी पर्वतावर, असलेल्या तिप्रा हिमनदीपासून होतो. वर्षातील आठ-नऊ महिने नोव्हेंबर-डिसेंबरपासून ते एप्रिल-मे महिन्यापर्यंत हे खोरे बर्फाच्छादित असते. उरलेल्या तीन-चार महिन्यांत मात्र पर्वतीय (alpine) फुलांचा येथे नुसता बहर आलेला असतो. या काळात स्वर्गीय नंदनवनच जणू पृथ्वीवर उतरल्याचा भास होतो. बृहदहिमालय आणि झांस्कर पर्वतरांग तसेच गढवाल आणि कुमाऊँ (Kumaon) यांच्या मीलनरेषांवर असल्यामुळे या स्थानात दोन्ही ठिकाणाच्या प्रजातींचे समृद्ध जैविक मिश्रण आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रकारची वैविध्यपूर्ण फुले हे येथील वैशिष्ट्य आहे. येथील वनस्पती दुर्मिळ आणि स्थानिक प्रजातीच्या आहेत, ज्या इतरत्र कुठेही आढळत नाहीत. येथे असलेल्या कितीतरी प्रजाती व्हॅली ऑफ फ्लावर्सचा परिचय व्हायच्याआधी जगाला ज्ञातही नव्हत्या. औषधी वनस्पतीही येथे पुष्कळ आहेत. येथील स्थानिक लोक सुमारे 45 प्रजातीच्या वनस्पतींचा औषधासाठी उपयोग करतात. जागतिक स्तरावर असुरक्षित असलेल्या सहा प्रजाती येथे आहेत. यांपैकी दोन केवळ पश्चिम हिमालयातच सापडतात, तर तीन प्रजाती उत्तराखंडातसुद्धा कुठेही सापडत नाहीत. अशा इतरही काही प्रजाती आहेत ज्या केवळ येथेच, व्हॅली ऑफ फ्लावर्समध्येच सापडतात. येथे सापडणारे ब्रह्मकमळ अतिशय दुर्मिळ आहे. स्थानिक लोकदेवीला वाहायला या फुलांचा उपयोग करतात. पण या प्रजातींच्या नुसत्या संख्यांमुळे किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारामुळे या स्थानाला अद्वितीय महत्त्व प्राप्त झालेले नाही, तर केवळ तीन-चार महिन्यात ज्या वेगाने आणि नैसर्गिक प्रक्रियेने एकामागून एक वेगवेगळ्या प्रजाती येथे उमलतात त्या पारिस्थितिक अनुक्रम बदलाच्या (ecological succession) प्रक्रियेमुळे या स्थानाला अद्वितीय महत्त्व प्राप्त झालेले आहे. या प्रजातींच्या समुदायाला ‘सीरल समुदाय’ किंवा सेरे (Seral community or Sere) असे म्हणतात.

कितीतरी वनस्पतीशास्त्रज्ञांनी येथे अभ्यास करून अनेक प्रजातींची नोंद केलेली आहे. त्या मानाने येथील वन्य प्राण्यांवर अभ्यास तसा कमी झालेला आहे आणि अधिक माहिती अजून मिळालेली नाही. अपृष्ठवंशी प्राण्यांत (invertebrates) 229 संधिपाद (arthropods), 14 मृदुकाय (molluscs) आणि 6 वलयांकित (annelids) प्रजातींची नोंद येथून झालेली आहे. तसेच पृष्ठवंशी प्राण्यांत (vertebrates) आठ उभयचर (amphibians), तीन सरीसृप (reptiles) सहित पक्ष्यांच्या 228 आणि सस्तन प्राण्यांच्या 29 प्रजातींची नोंद येथे झालेली आहे. येथे आढळून येणारे हिमबिबट्या (snow leopard), आशियाई काळे अस्वल (Asiatic black bear), हिमालयी तपकिरी अस्वल (Himalayan brown bear), कस्तुरी मृग (Musk deer), भरल (Himalayan blue sheep), हिमालयी तहर (Himalayan Tahr) हे प्राणी आइ.यू.सी.एन. या संस्थेने केलेल्या श्रेणींप्रमाणे असुरक्षित (यातील काही चिंताजनक) झाले आहेत.

इंद्राचे नंदनवन असे कित्येकांनी उल्लेखिलेल्या या व्हॅली ऑफ फ्लावर्सला 2005 साली तेथील उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्य (निकष 3) आणि दुर्मिळ जैविक संपदा व चिंताजनक अवस्थेत असलेल्या जैवविविधतेसाठी (निकष 4), अशा या दोन निकषांच्या (3 आणि 4) आधारे, नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाबरोबर जोडण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर; युरी आलेमाव यांचा आरोप

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT