काणकोण: गोवेकर पोदेर केव्हाच पडद्याआड गेले आहेत. आता हा व्यवसाय केरळ, कर्नाटक राज्यातील व्यावसायिकांच्या हातात गेला आहे. तरुण पिढी रेंदेर व्यवसायत येत नसल्याने आता गोव्यातील पारंपरिक रेंदेरांची संख्याही घटत चालली आहे. गोव्याला विस्तृत अशी सुमारे 105 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे आणि या किनारपट्टीला माडांच्या रांगांनी निसर्गसौंदर्य प्राप्त झाले आहे. एकेकाळी या माडावर रेंदेर समाज पोसला जात होता. त्यामुळे रेंदेर समाजाची वस्ती समुद्रकिनारी आहे. त्याकाळी राज्यातील रहिवाशांचे प्रमुख मद्यार्क पेय माडाची फेणी तसेच काजू हुर्राक व फेणी होते. आता त्याची जागा परदेशी बनावटीच्या मद्यार्काने घेतली आहे.
पूर्वीच्याकाळी बेकरी व्यवसायासाठी प्रामुख्याने माडाच्या सुरीचा वापर करण्यात येत होता. मात्र, आता त्या सुरीऐवजी इस्टचा वापर करण्यात येतो. सुरीपासून व्हिनेगर, गुळ तयार करण्याचा व्यवसाय गोव्यात चालू होता. हा व्यवसाय काही प्रमाणात अद्यापही सासष्टी तालुक्यात सुरू आहे. माडीपासून वेगवेगळ्या स्वादाचा मद्यार्क गाळण्यात येत होता. त्याच्यात प्रामुख्याने दुधवेली घालून गाळलेले दुधशिरे, जिरे व आले घालूनही माडी गाळण्यात येत होती. मात्र, आता त्याची मागणी घटली आहे आणि हा मद्यार्क गाळणारे व्यावसायिकही कमी झाले आहेत.
दर दहा सुरीच्या माडामागे दरमहा अबकारी खात्याला 24. 80 रुपये महसूल प्राप्त होतो. त्यामध्ये 8.40 रुपये माड कर व 16.40 रुपये अबकारी कराची प्राप्ती होते. ज्या माडापासून सूर काढली जाते, त्या माडावर रेंदेर दिवसातून तीन वेळा चढतो. सकाळी व संध्याकाळी सूर मिळवण्यासाठी व दुपारी पोंय बांधण्यासाठी. त्यामुळे नारळ बागायतींना माकड, खेती यांचा उपद्रव कमी होत होता.
राज्यात रेंदेर व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी अखिल गोवा रेंदेर संघटना प्रयत्नशील आहे. गेल्यावर्षी संघटनेने मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात कोविड महामारीमुळे त्या मागणीचा पाठपुरावा करणे शक्य झाले नाही. तौक्ते वादळात किनारी भागातील काही सुरीचे माड उन्मळून पडले. यामुळे त्याचा गंभीर परिणाम या व्यवसायावर झाला.
- रेमी बोर्जीस, रेंदेर संघटनेचे अध्यक्ष
काणकोणात फक्त 11 रेंदेर!
किनारी भागातील बहुतेक नारळाच्या झाडांचा उपयोग सूर (माडी) मिळविण्यासाठी करत. त्याच्या बदल्यात नारळ बागायतीच्या मालकाला दर नारळाच्या झाडामागे महिना ठराविक रक्कम रेंदेर व्यावसायिकांकडून देण्यात येत होती. पाळोळे, लोलये, आगोंद व अन्य भागात मोठ्या प्रमाणात रेंदेर होते. मात्र, त्यापैकी नव्वद टक्के रहिवाशांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून दिला आहे. अबकारी खात्याच्या काणकोण कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार काणकोणात फक्त 11 नोंदणीकृत रेंदेर असून 122 माडापासू सूर (माडी) काढली जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.