Tradition of lamps in Goa
Tradition of lamps in Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यातील दिव्यांची परंपरा

राजेंद्र केरकर

आकाशातील सूर्यचंद्राच्या प्रकाशात भटकणाऱ्या आदिमानवाला जेव्हा नवाश्‍मयुगात अग्नीचा शोध लागला तेव्हा रात्रीच्या अंधारात चाचपडणाऱ्या आणि हिंस्त्र जंगली श्‍वापदांशी संघर्ष करणाऱ्या त्याच्या जीवनात प्रकाशाचा मार्ग निर्माण झाला. प्रारंभी गुंफेत लाकडांची शेकटी रात्रीला पेटती रहावी म्हणून त्याला बरेच प्रयत्न करावे लागले. शिकार केलेल्या जनावरांच्या चरबीद्वारे त्याचप्रमाणे वनस्पतीजन्य तेलाच्या माध्यमातून मशाल आपणाला जेव्हा गरज आहे तेव्हा पेटती ठेवण्यात यश मिळवले. शेकोटी, मशाल यांचा उपयोग करता करता सत्तर हजार वर्षांपूर्वी त्याला दिव्याचा शोध लागला. फ्रान्स येथील लास्कोच्या नैसर्गिक गुंफेत सूर्याची किरणे जेथे पोहचत नाही, अशा जागेत तत्कालीन आदिमानवाने घोडे, हरणे, बैल आणि गव्यारेड्यांची जी चित्रे नैसर्गिक रंगांनी रंगवलेली आहेत ती जनावराच्या चरबीने तेवणाऱ्या दगडी दिव्यांच्या प्रकाशाच्या उपयोगाद्वारे काढल्याचे स्पष्ट झालेले आहे. लास्को येथील गुंफेत चाळीस हजार वर्षांपूर्वीपासून दगडी दिव्यांचा वापर होत असल्याचे मत पुरातत्त्व संशोधकांत रूढ आहे.

भूमध्य समुद्राकाठच्या भागातील प्रदेशात त्याचप्रमाणे पूर्वेकडील देशांत शिंपल्यांच्या दिव्यांचा वापर होत असे. पुढे ॲलेबॅस्टरसारख्या मऊ खनिजापासून, माती व धातू यांना शिंपल्यासारखा आकार देऊन दिवे तयार करण्यात आले.मेसोपोटेमियामध्ये करण्यात आलेल्या उत्खननात दहा हजार वर्षांपूर्वीचे वातीची चोच असलेले मातीचे दिवे सापडले आहेत. इजिप्त व चीनच्या संस्कृतीत बशीच्या आकाराचे मातीचे व काशाचे दिवे आढळलेले आहेत. ख्रिस्तपूर्व अनेक शतके चिनी लोक नैसर्गिक वायूचा प्रकाशासाठी उपयोग करण्यासाठी हा वायू बांबूच्या नळकांड्यांतून वर आणत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पाच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीतल्या मोहेंजोदडोतल्या उत्खनातून टांगण्याचे दिवे सापडले असून हमरस्त्याच्या टोकांना असलेले दिव्याचे खांब, त्याची प्रचिती देतात. फ्रान्सच्या प्राचीन संस्कृतीतल्या उत्खननातून तेथे आढळणाऱ्या रानटी मेंढ्यांच्या डोक्याचा आणि शिंगाचा वापर दिव्यांसाठी करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. ग्रीक, रोमन, इजिप्तच्या संस्कृतीत दिव्यांचा वापर होत असे. रोममध्ये भाजलेल्या मातीचे दिवे आढळलेले आहे. भूमध्य समुद्र प्रदेशात दिव्याची वात अंबाडी, लव्हाळीच्या धाग्यापासून तयार करून ऑलिव्ह तेलाद्वारे पेटवली जायची. ख्रिस्तपूर्व सुमारे सातशे वर्षांपासून ग्रीक संस्कृतीत भाजलेल्या मातीच्या दिव्यांचा वापर होत असे. दगड, भाजलेली माती, जनावरांच्या कवट्या, हाडे आदीपासून तयार केलेल्या दिव्यांना जनावराची चरबी, वनस्पतीजन्य तेल, खनिज तेल, नैसर्गिक उपयोग करून प्रज्वलित केले जायचे.

भारतीय संस्‍कृतीत भाजलेली मृदा, दगड, शिंपले, रानटी फळे, पिठापासून तयार केलेल्या विविध प्रकाराच्या दिव्यांचा वापर होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पश्‍चिम किनारपट्टीवर गोवा-कोकणात दिव्यांचा वापर केवळ प्रकाशाचा स्रोत म्हणून नव्हे तर लोकधर्मातले संचित म्हणून होत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. गोव्यात नाथपंथांच्या त्याचप्रमाणे तत्पूर्वी वावरणाऱ्या संप्रदायांशी संबंधित ज्या मानवनिर्मित गुंफा आढळलेल्या आहेत, त्या ठिकाणी प्रामुख्याने दगडाचे दिवे आढळलेले आहे. काळ्या त्याचप्रमाणे जांभ्या दगडांचा तसेच भाजलेल्या मातीचा वापर करून तयार केलेले दिवे गोव्यात ठिकठिकाणी आढळलेले आहे. या साऱ्या दिव्यांना शिंपल्यासारखी चोच आणि मधल्या भागात खोलगटपणा कोरून केले जायचे. त्यासाठी खष्ट, करंज, तीळ, खोबरे आदी वनस्पतीजन्य तेलाबरोबर गाईम्हशीच्या दुधापासून काढलेल्या तुपाचा वापर दिवे प्रज्वलित करण्यासाठी केला जायचा. गोव्यातल्या रानात, माळरानावरती गवळात वास्तव्यास असणाऱ्या पशुपालक धनगर समाजात पूर्वीच्या काळी तुपाच्या दिव्याचा उपयोग रात्रीपुरता केला जायचा. शिल्पकारांद्वारे गोव्यात ठिकठिकाणी आढळलेल्या दगडाच्या दिव्यांचे कोरीव काम केले होते.अशाप्रकारचे हे दगडी दिवे रानावनात उपेक्षितरित्या असलेल्या जुन्या आणि भग्न मंदिरांच्या जीर्णावशेषात पहायला मिळतात. आज दगडाचे हे दिवे वापरात नसल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी मातीत गाडलेले पहायला मिळतात.

कालांतराने दगडी दिव्याऐवजी कुंभाराद्वारे तयार केल्या जाणाऱ्या मातीच्या त्याचप्रमाणे भाजलेल्या मातीच्या दिव्यांचा जेव्हा पर्याय उपलब्ध झाला तेव्हा दगडापासून कोरून तयार केल्या जाणाऱ्या दिव्यांची मागणी कमी होत गेली. तांबे, पितळ व काशांसारख्या धातुपासून अत्यंत सुबक कलाकुसरीने युक्त एकापेक्षा एक सुंदर दिवे गोव्याल्या लोकमानसात रुजवण्याचे कार्य इथल्या कलाकारांनी केले होते. कासार, तांबट, वळार, काकणकार आदी नावांनी परिचित असलेल्या गोव्यातल्या या पारंपरिक कारागिरांनी आपल्या कलाकौशल्याद्वारे प्रेक्षणीय धातूच्या दिव्यांची निर्मिती करण्यात यश मिळवलेले आहे. सुरुवातीला दीपपात्राचा आकार अर्ध्यपात्रासारखा असे व त्याला एका बाजूला वात पेटवण्यासाठी चोच असलेल्या पणत्या कासारांनी तयार केल्या. परंतु नंतर पणतीच्या आकारात त्यांनी कलाकुसर आणली आणि त्याचे आकार-प्रकार विविध करण्यात यशस्वी ठरले. मत्स्यकूर्मादी दशावतार शंखचक्रादी विविध देवांची आयुधे, मोर, कीर, हंसासारखे पक्षी, सिंह, हत्ती, घोडा यासारखे पशु आदी कलाकृतींनी युक्त दिव्याची निर्मिती त्यांनी केली. मंदिरासमोरच्या दीपमाळेवरून गोव्यातल्या कासारांनी दीपवृक्ष म्हणजे एका पितळी स्तंभाला अनेक फांद्या निर्माण करण्याचा जो दीप विकसित केला, त्याला आज गोवा राज्याचे बोधचिन्ह होण्याचा सन्मान लाभलेला आहे.

गोव्यातल्या लोकधर्मात पणत्याप्रमाणे समईलाही मोठा मान असून अशी समई कुठे कमळासारखी असते, तर कुठे तिचा वरच्या भागावर देवासाठी घुमटी तर कुठे तिच्या शीर्षस्थानी मोर, हत्ती किंवा नागही बसवलेले असतात. सिंह, मोरावर आरूढ झालेल्या लक्ष्मीने युक्त दीपलक्ष्मीचा अष्टौप्रहर अखंड तेवत राहणारा नंदादीप, घरातल्या धार्मिक आणि लग्नसोहळ्यात वापरला जाणारा लामणदिवा तयार करण्याचे कलाकौशल्य गोव्यातल्या कासारांत असून, त्यांनी तांबे, पितळ, काशांच्या दिव्यांच्या निर्मितालाही एक नवा आयाम मिळवून दिलेला आहे. मंडपात अखंड तेवत असलेल्या या दिव्याला साक्षी ठेवून पारंपरिक लग्नगीतांचे एका विशिष्ट लयीत गायन करण्याची प्रथा इथे रूढ होती. षोडशोपचार पूजेत, काकडारतीत दिवा गरजेचा असतो. तीर्थक्षेत्रातल्या नद्यांच्या घाटावरती पानाच्या द्रोणात फुले व फुलवात ठेवून ती वात प्रज्वलित करून पात्रात सोडली जाते.

दिवाळीत आकाशातल्या आपल्या पितरांना प्रकाश देण्यासाठी आकाशदिवे टांगण्याची परंपरा गोव्यात रूढ आहे. दिव्याच्या अमावस्येला कणकेचे, तांदळाच्या उकडीचे किंवा अन्य धान्याच्या पिठाचे दिवे करून पूजतात. मंगळागौरीच्या पूजेत कणकेचे दिव्यांना पवित्र स्‍थान आहे. गोमंतकीय समाजात केवळ हिंदू धर्मियांतच नव्हे तर जेथे पिरांची पोर्तुगीज पूर्वकाळापासून दर्गे आहेत तेथील मुजावरही मुस्लिम धर्मीय मंडळी तिन्ही सांजेला दिवा पेटवून ठेवण्याची परंपरा आजही पाळत असलेली पहायला मिळते. ख्रिस्ती धर्मियांत पणती, समई याऐवजी मेणबत्ती पेटवण्याची परंपरा आहे. दिवा हे गोमंतकीय लोकमानसाला अग्नीचे तसेच तेजाचे प्रतीक म्हणून भावलेले असल्याकारणाने इथल्या सुवासिनी आणि कुमारिकांनी दिवज म्हणून त्याला धारण केलेले आहे. पेटलेल्या सुंदर दिव्यांच्या ओळींनी संपन्‍न होणारी गोव्यातली दिवाळी आपणाला जीवन, प्रकाश आणि सत्याकडे जाण्याची प्रेरणा देत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT