Antarctica trip Dainik Gomantak
ब्लॉग

Antarctica trip: शिखर गाठलेच

सुंदर निसर्गरम्य ठिकाणाहून पुन्हा वॉकिंग पोलच्या साहाय्याने आम्ही परतलो.

Ganeshprasad Gogate

अजय करमली

सूर्यास्त झाला त्याच वेळेला सूर्योदयही झाला. रात्र नव्हतीच. अंटार्क्टिकावर सहा महिने उजेड आणि सहा महिने रात्र असते, हे वाचून माहिती होते. पण, प्रत्यक्षात रात्र नसण्याचा अनुभव वेगळाच होता.

दिवस संपून त्याचवेळी पुन्हा दिवस सुरू होण्याच्या या संगमावर आम्हाला संशोधक दिसले. हे संशोधक तिथेच चार-पाच महिने राहतात आणि संशोधन करतात.

एव्हाना आम्ही लेमायर चॅनलमधून प्रवास करत होतो. जगातील काही मोजक्या व सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांपैकी हे एक. आम्ही सर्व पोर्ट चारकोटवर उतरण्यासाठी सज्ज झालो होतो. आमचे 12 गट होते.

आमच्याकडे लँडिंगसाठी 90 मिनिटांचा वेळ होता आणि बर्फाच्या डोंगरावरून 30 मिनिटे चालत रॉकवर पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

पोर्ट चारकोट, बूथ आयलंड येथे केर्न, लाकडी खांब आणि फलक ज्यावर जीन-बॅप्टिस्ट ई. ए. चारकोट यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या फ्रेंच मोहिमेत १९०४साली सामील झालेल्यांची नावे कोरलेली आहेत.

वॉकिंग पोलच्या साहाय्याने चालत टार्गेटवर पोहोचलो. वाटेत पेंग्विनच्या वसाहती, त्यांचे चालणे, त्यांचे आवाज आणि त्यांच्या मलमूत्राचा दर्प सहन करत आम्ही बर्फातून चालत होतो. चालता चालता माया खाली पडली आणि तिला सावरायच्या नादात मीही! तेवढ्यात मागून आम्हाला आमचे ग्रुपमेट विठ्ठलजी खाली पडून परत येताना दिसले.

पडण्यातही आम्ही एकटे नाही, ही भावना सुखावून जाते. पण, इथे बर्फाचा डोंगर चढताना नवखी माणसे पडणे अजिबात नवीन नाही. मऊ बर्फाच्या आत खोलवर पाय जातो. आपण बूट उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आत रुतून बसतो व पाय बूटमधून बाहेर येतो.

आमच्यासारख्या हौशींसाठी हे बर्फातून चालणे थोडे कठीण जात होते, पण आम्ही चालतच राहिलो. शेवटी आम्ही स्मारकापर्यंत पोहोचलो आणि तिथेही पुन्हा भारतीय ध्वज फडकवला.

सुंदर निसर्गरम्य ठिकाणाहून पुन्हा वॉकिंग पोलच्या साहाय्याने आम्ही परतलो. झोडियाकमधून जहाजावर आल्यानंतर तिथूनच हिमनग/ग्लेशियर्स आणि पर्वतांच्या दृश्यांचा आनंद घेत समुद्रपर्यटन केले. परतल्यावर जकूझी/पूल/सौना येथे मजा आली!

जौग्ला बेटावर फक्त एक नियोजित समुद्रपर्यटन केले. त्यानंतर आम्हाला ‘पक्ष्यांचे स्थलांतर’ या विषयावर माहिती देण्यात आली. यात पक्ष्यांच्या स्थलांतराचे विविध पैलू मांडण्यात आले. अल्बाट्रॉस हे मोठे समुद्री पक्षी आहेत ज्यांचे पंख 11 फूट इतके लांब असतात. ते 5 ते 6 वर्षांपर्यंत उडत राहतात आणि वर्षभरात 1,80,000 किमी अंतर कापतात. ते फक्त प्रजननासाठी किनाऱ्यावर येतात.

ऑर्न हार्बर एक मैल रुंद खाडी आहे, जी अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील डॅन्को कोस्टसह केप ऍनाच्या दोन मैल नैऋत्येस ग्रॅहम लँडच्या पश्चिम किनारपट्टीशी काही अंतर राखून आहे. एक उंच पर्वत होता, ज्यावर आम्ही चढणार होतो.

कोणत्याही बोट क्रूझसाठी किंवा उतरण्यासाठी कपडे घालणे हा एक दिव्य असते. पर्का जॅकेट ज्याला वर ४ ते ५ थर आणि आतल्या बाजूने ३ ते ४ थर असतात, लाइफ जॅकेट, हँड ग्लोव्ज, मोबाईल आणि कॅमेरे यांशिवाय मंकी कॅप आणि अंदाजे ३ किलो वजनाचे रबरी बूट घालून बर्फाळ डोंगर चढण्यासाठी पाऊल उचलणे महा-कर्मकठीण असते.

हा साजशृंगार एकदा अंगावर चढवला की आम्ही अंतराळवीरांसारखे दिसायचो. मी, माया आणि राधा, आम्हा तिघांनी साहस करण्याच्या हौसेपोटी हे दिव्य पार पाडले. बोटीत बसण्यापूर्वी आमचे की कार्ड स्कॅन करून बोटीतून कोण आत आणि बाहेर जात होते याची नोंद घेण्यात आली. दोन वॉकिंग पोलचा आधार घेऊन आम्ही चालू लागलो.

मोहीम पथकाने मार्ग उत्तम प्रकारे तयार केला होता आणि प्रत्येक वळणावर त्यांनी बसण्यासाठी विश्रांतीची जागा बनवली होती. जिथे थोडा वेळ थांबून, पुन्हा सर्व शक्ती एकवटून सर्वजण जोमाने पुढच्या प्रवासाला निघत. पर्वताची दुसरी बाजू पाहून असे वाटले की जणू पृथ्वी माता चमकदार मऊ बर्फाची पांढरी दुलई घेऊन आम्हा बालकांना जवळ बोलावत आहे.

आमच्या दुडुदुडु चालण्याचे कौतुक करत आहे. आम्ही चढत असताना त्या वेळी हलकीशी बर्फवृष्टीही होत होती. तीक्ष्ण उतार असलेल्या बिंदूच्या पलीकडे त्यांनी क्रॉस झेंडे लावले होते आणि आम्हाला त्याच्या जवळ जाण्याची परवानगी नव्हती. प्रत्येक निर्णायक बिंदूवर एक मोहीम तज्ज्ञ आम्हाला मार्गदर्शन करायचे.

आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करायचे. चढतीपेक्षा उतरती जास्त कठीण होती; निदान माझ्यासाठी तरी. पण, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे माया आणि राधा सहजपणे उतारावरून चालत होत्या. या चढउतारात मला स्वतःचा तोल राखणे कठीण गेले. मला खूप भीती वाटली. माझ्या मागे रांगा लागल्या होत्या.

प्रत्येक वळणावर मी माझ्या पाठीमागे असलेल्या लोकांना जाऊ दिले आणि पुन्हा माझ्या कूर्मगतीने पुढे सरकत राहिलो. या बाबतीत आमचे महिलामंडळ भलतेच धाडसी निघाले! डेकवर पोहोचताच त्यांचा थकवा त्यांनी मिल्कशेक पिऊन घालवला आणि मी वाइन प्राशन करून. आलेल्या थकव्यापेक्षाही काही तरी मिळवल्याचा, शिखर गाठल्याचा आनंद खूप मोठा होता.

अंटार्क्टिकमध्ये जाण्याचा हा आमचा शेवटचा दिवस होता. आमचा परतीचा प्रवास १६ तारखेपासून ड्रेक पॅसेजमार्गे पुन्हा एकदा उशुआया येथे संपणार होता आणि बसमध्ये चढण्यासाठी चेक आउट करणे आणि ब्युनोस आयर्सला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइट पकडणे हे सर्व करायचे होते.

हा शेवटचा आणि महत्त्वपूर्ण दिवस होता. आम्ही नेपच्युन्स बेलोजमधून डिसेप्शन बेटाच्या कॅल्डेरामध्ये जाणार होतो. आम्हाला खुल्या डेकवर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दोन्ही बाजूंनी बर्फाने झाकलेले मोठे पर्वत असलेल्या खाडीतून जात असताना ते दृश्य पाहण्यासाठी आम्ही जमलो.

मोठ्या प्रमाणात धुके दिसत होते. मंत्रमुग्ध करणाऱ्या ठिकाणाहून पुढे जाताना घेतलेला हा एक विलक्षण अनुभव होता. धुके असले तरी आम्ही जुन्या काळातील व्हेल प्रोसेसिंग स्टेशनची झलक पाहू शकलो. १९६६-६७च्या सुमारास ज्वालामुखीच्या उद्रेकात नष्ट झालेल्या चिली संशोधन केंद्राचे अवशेषदेखील आम्ही पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Goa Crime: ‘सोनारा’ने घातला 23 लाखांचा गंडा! अनेकांची फसवणूक; पेडणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

Siolim Crime: वाल्लोर!! शिवोलीतील तरुणाने केले दरोडेखोरांशी दोनहात; चाकूचे वार सहन करत हणून पाडला चोरीचा डाव

SCROLL FOR NEXT