goa  Dainik Gomantak
ब्लॉग

किशोरवयीन गर्भधारणा एक आव्हान!

आपल्या कुठल्याही समस्येसंबंधी मुलं मुक्तपणे बोलू शकतील अशा समुपदेशनाच्या सोयींची कधी नव्हे एवढी गरज आज समाजाला आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकणारे आरोग्य सेवा तज्ज्ञही मुलांसाठी सहज विनासायास उपलब्ध व्हायला हवेत.

गोमन्तक डिजिटल टीम

संगीता नाईक

दोन महिन्या पूर्वीची गोष्ट. पणजीतील एका शाळेतील आरोग्य शिबिरावेळी डॉक्टरांना एका विद्यार्थिनीच्या प्रकृतीतील बदल इतर मुलांपेक्षा थोडे वेगळे वाटले. चाचण्याअंती डॉक्टरांच्या लक्षात आलं की ती किशोरवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती होती!

डिसेंबर २०२३ मध्येच अशा शाळकरी विद्यार्थिनींच्या गर्भवती होण्याच्या चार केसेस गोव्यात नोंद केल्या गेल्या. २०२४ मध्ये आत्ता पर्यंत दोन केसेसची नोंद झाली आहे आणि त्यातील एका मुलीने बाळाला जन्मपण दिला आहे.

ढोबळ आकडेवारीनुसार २०२३ मध्ये अशा १६ तर मागील सहा वर्षात ७० वर केसेसची नोंद गोव्यात झालीय. केंद्रीय आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०२२ नुसार गोव्यात किशोरवयीन म्हणजे १५ ते १९ वयोगटातील मुलींना मातृत्व येण्याचे प्रमाण तीन टक्के एवढं आहे.

गोव्यातील किशोरवयीन मुलींच्या मातृत्वाचे बलात्कार हे एक प्रमुख कारण होय. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या(NCRB ) २०२२ मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार गोव्याचा ७.१ हा अल्पवयीन बलात्कार दर देशात सगळ्यात जास्त आहे. गोव्यात २०२२ मध्ये ७५ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली, त्यापैकी ५७ म्हणजेच ७६ टक्के पीडित १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुली होत्या.

खरतर ही अधिकृत आकडेवारी हिमनगाचे नुसते टोकच आहे. २०२३ मधील बलात्कारांचा आकडा ९७ आहे, पण वर्गवारी अधिकृतरित्या उपलब्ध नाही. एक आई म्हणून मी जेव्हा या चिंताजनक आकडेवारीकडे बघते तेव्हा छातीत धडकी भरते. गेली अनेक वर्षे प्रसारमाध्यमे अनेक प्रकारे या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधत आहेत. पण कुणा निर्णयकर्त्याला या विषयाचे गांभीर्य लक्षात आल्यासारखे वाटत नाही आणि म्हणूनच काहीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत.

स्वतःच्या मर्जीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या गोव्यातील किशोरवयीन मुलींचा आकडाही उल्लेखनीय आहे. प्रसारमाध्यमे, इंटरनेट, सोशल मीडिया, ओटीटी इत्यादीमार्फत लैंगिक संबंधांबद्दलची माहिती अतिशय कमी वयात मुलांपर्यंत पोहोचते.

खेदाची गोष्ट ही की या माध्यमांद्वारे ही माहिती योग्य प्रकारे क्वचित आणि विकृत, बीभत्स प्रकारेच जास्त करून दिली जाते. नैसर्गिक आकर्षण तर असतेच, मग स्वतःच्या बौद्धिक कुवतीनुसार या साऱ्यांचा अर्थ लावून मुलं लैंगिक प्रयोग करण्यास प्रेरित होतात. समवयस्काबरोबरच्या लैंगिक संबंधात जास्त करून मुलींएवढेच मुलगेही तसे परिणामांच्या कल्पनांची जाण नसलेलेच असतात.

जास्त चिंताजनक गोष्टी ही आहे की गोव्यातील अनेक केसेसमध्ये वयाने मोठे विवाहित पुरुष मुद्दाम ग्रूमिंग करून, गळ टाकून किशोरवयीन मुलींना लैंगिक संबंधांमध्ये अडकवताना आढळत आहेत. किशोरवयच असं असतं की जेव्हा दुसऱ्यांचे लक्ष सतत आपल्याकडे असावं असं वाटतं.

जरा काही मनाविरुद्ध झालं तर स्वतःवर प्रचंड अन्याय झाल्यासारखा वाटतो. समजून न घेणारे, वेळ न देऊ शकणारे, वा विभक्त कुटुंब असेल तर मग कुणीही थोडसं जरी जास्त लक्ष दिलं, लाड कोड केले, गोड बोललं, वागलं तर मुली त्या माणसांकडे आकर्षित होतात. मग त्यांच्याकडून शरीर सुखाची मागणी केली जाते.

मी तुझ्यासाठी एवढा जीव टाकतो, तू माझ्यासाठी एवढेही करू शकत नाहीस का असं म्हणत मुलींना ब्लॅकमेल केलं जातं. कधी त्यांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो वगैरे काढून ते व्हायरल करण्याचा धाक दाखवूनही मुलींचा गैरफायदा घेतला जातो. सोशल मीडिया, डेटिंग ॲप्स इत्यादी द्वारे मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार तर दिवसेंदिवस वाढतच आहेत.

ऑस्ट्रियन मानसोपचारतज्ज्ञ आणि शिक्षक रुडॉल्फ ड्रेकुर्स म्हणतो त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचे जीवनापासून सदाकाळ संरक्षण करू शकत नाही. म्हणूनच, त्यांना त्यासाठी तयार करणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे वयाबरहुकूम दिले गेलेले लैंगिक शिक्षण या समस्येवरील जादूची कांडी ठरू शकते.

मुलांच्या हातातील मोबाईलने त्यांना बरीच जुजबी माहिती दिलेली असतेच त्यावर योग्य प्रकारे शाळा तसेच पालकांनी टॉप-अप केलं तर मुलं या विषयावर मुक्तपणे विचार करू शकतील, बोलू शकतील आणि स्वतःच्या शंकांचं निरसनपण करून घेतील.

विश्वासू माध्यमांतून या कुतुहलाच्या विषयावर योग्य प्रकारे योग्य माहिती मुलांपर्यंत पोहोचली तर मुलांचा लैंगिक संबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत किंवा एकांगी होणार नाही आणि वृथा गैरसमजानाही वाव उरणार नाही.

पालक, शाळा आणि एकूणच समाज व्यवस्थेनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की पाप, पुण्य यासारख्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टीवर आधारित नैतिकतेच्या ह्याआधीच्या काळातील कल्पनांना आजच्या पिढीच्या आयुष्यात जास्त वाव नाही. माहितीने समृद्ध ही पिढी जास्त व्यावहारिकही आहे.

त्यांना कुठलीही गोष्ट करण्यास प्रवृत्त करायचं असेल किंवा एखादी गोष्ट करण्यापासून परावृत्त करायचं असेल तर व्यावहारिकतेच्या दृष्टिकोनातूनच त्यांना ती समजावून सांगणे क्रमप्राप्त आहे. तरच ते त्यांच्या पचनी पडते आणि ती त्या गोष्टींचं पालनही करतात.यासाठी त्यांच्या रोजच्या वापरातील सोशल माध्यमांचा योग्य वापरही प्रभावीपणे होऊ शकतो.

किशोरवयीन लैंगिक संबंधांचे दीर्घकालीन मानसिक, शारीरिक, करियरवरील तसेच एकूण भविष्यावरील परिणाम यांची योग्य कल्पना त्यांना दिली तर वेळ येईल तेंव्हा सारासार विचार करून त्यांच्याकडून समर्पक निर्णय घेतले जातीलच.

आपल्या कुठल्याही समस्येसंबंधी मुलं मुक्तपणे बोलू शकतील अशा समुपदेशनाच्या सोयींची कधी नव्हे एवढी गरज आज समाजाला आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकणारे आरोग्य सेवा तज्ज्ञही मुलांसाठी सहज विनासायास उपलब्ध व्हायला हवेत. मुलांसंबंधीचे POCSO, गोवा बाल हक्क कायदा इत्यादीसारखे प्रभावी कायदे आपल्याकडे आहेतच.

त्यांच्या योग्य अंमलबजावणीद्वारे कायदा आणि न्यायव्यवस्थेचे भक्क्म पाठबळ मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. टोकाची भूमिका न घेता, जजमेंटल न होता मुलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणाऱ्या, मुलांना मदतीचा हात आणि खंबीर साथ देणाऱ्या यंत्रणा उभ्या करणं ही आम्हा सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे.

सोशल मीडिया, डेटिंग ॲप्स इत्यादीद्वारे मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार तर दिवसेंदिवस वाढतच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT