कोविड पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला, एक टक्क्यावर आला, मोठ्यांचे लसीकरणही (Vaccination) झाले, ही समाधानाची बाब आहे. पण पहिलीपासून शाळा सुरू करताना सर्व दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. शाळांतील स्वच्छतेबरोबरच येण्या-जाण्याचा प्रवासही सुरळीत होईल, हेही पाहिले पाहिजे. अद्याप अनेक ठिकाणी गावात पोचायला बसेस नाहीत. कोविड काळात बंद झालेली वाहतूक व्यवस्था अद्याप सुरू झालेली नाही. फक्त घोषणाबाजी करून काहीही होणार नाही, तर डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. विचार करून सर्व सुरळीतपणे सुरू राहील, याकडेही लक्ष द्यायला हवे.
कोविड आला आणि गेला, असंही काही झालेलं नाही, तो कुठेतरी लपून बसलेला आहे. तो पुन्हा येईल म्हणून सांगणार नाही, कारण सांगणारे पुन्हा येत नाहीत. पण आपण गाफिल राहिलो, तर तो निश्चितपणे येणार आहे. तिसरी लाट येणार नाही, आली तरी सौम्य असेल, असेही म्हटले जाते. पण अन्य देशांत कोविडचे वेगवेगळे प्रताप सुरू झालेत. त्यामुळे आंतरराज्य, आंतरदेशीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर पर्यटनाबरोबर कोविड येणार नाही, असे कोणीही म्हटलेले नाही. परिस्थिती साशंक आहे. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी कॅसिनोसह इतर व्यवहारही सुरू करण्यात आले आहेत. ९ वी ते १२ वी वर्गाबरोबरच आता २३ सदस्यीय तज्ज्ञ समितीने पहिली ते आठवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. कृती दल चर्चा करून निर्णय घेणार आहे. पण कोण कोणाच्या कोर्टात चेंडू टाकतोय, तेच समजत नाही. दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होणार, हे निश्चित आहे. काही शाळांनी तर यापूर्वीच शाळांतून काही वर्ग घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे शासनाचा निर्णय योग्य की अयोग्य, हे येणारा काळच ठरवणार आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष आभासी पद्धतीने सुरू झाले. पहिलीच्या वर्गात किंवा प्राथमिक स्तरावरून माध्यमिकमध्ये, उच्च माध्यमिकमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्या शाळेचे, तेथील शिक्षकांचे मुखदर्शनही घेतलेले नाही. अनेक वर्गांतील विद्यार्थी व शिक्षकांची ओळखही झालेली नाही. अशा अवस्थेत ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने वर्ग सुरू झाले. ऑनलाईन शिक्षण घेताना रेंज समस्या, मोबाईल समस्या निर्माण झाल्या. सुरवातीला सगळीकडे गोंधळ, ताणतणाव निर्माण झाला. पण अलीकडच्या काळात काही प्रमाणात सुसूत्रता आली आणि शाळांतून घेतलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षाही झाल्या. काहींनी मोठ्या धारिष्ट्याने काही वर्गही सुरू केले. आता शिक्षण खात्याने दिलेल्या मानक प्रक्रिया प्रणालीचे पालन (एसओपी) शाळांतून झाले पाहिजे. तरच आपले विद्यार्थी सुरक्षित राहाणार आहेत. राज्य शासनाने परिपत्रक जाहीर केले म्हणून सर्व सुरळीत होईल, अशा भ्रमात पालक नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात किती विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, हे शाळा सुरू झाल्यावरच कळणार आहे.
आता कोविड गायब झालाय, अशीच भूमिका शासनाने घेतली असून समुद्र किनाऱ्यावर शॅकमध्ये मौजमजा करणारेसुद्धा मास्क किंवा सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष करीत आहेत. राज्यात धावणाऱ्या अगदीच मोजक्या बसेसचेही निर्जंतुकीकरण नियमितपणे केले जात नाही. आठवड्याला एकदाच बस स्वच्छ केली जात असावी. राज्यात अलीकडच्या काळात कुठेही नियमांचे पालन होत नाही, सगळीकडे दुर्लक्ष होत आहे. अशा काळात फक्त शाळांतूनच एसओपीचे पालन होईल, याबद्दल पालकवर्गाला विश्वास वाटत नाही. पर्यटकांचे लोंढे राज्यात धडकत आहेत, एकही रस्ता मोकळा दिसत नाही. दररोज वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. शासन दरबारी अनागोंदी सुरू असून विधानसभेसाठी इच्छुकांच्या दररोज सभा, चर्चा होत आहेत. काहीजण प्रचंड संख्येने शक्तिप्रदर्शन करीत आहेत. शासनातर्फे सरकार तुमच्या दारी, घर घर चलो अभियान, जागृती मेळावे सुरू आहेत. कोणालाच कोविडचे बंधन, भीती राहिलेली नाही. त्यात शाळाही सुरू केल्या जात आहेत. परंतु त्या शाळांतून एसओपीचे पालन होईल का, याबद्दल कोणीच काही सांगत नाहीत.
शिक्षण खात्याने विद्यार्थी, पालक, विद्यालयांसाठी आदर्श अशी आरोग्यविषयक नियमावली दिली आहे. त्यांचे पालन करणे संस्थाचालकांनाही बंधनकारक आहे. संस्था चालकांनी काटेकोरपणे नियम, अटींचे पालन करायला हवे, तरच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित राहाणार आहेत. विद्यमान सरकार आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कार्यक्रम हाती घेत आहे. विरोधक संधी मिळेल तेथे विरोध करीत आहेत, नवे पक्ष आपली जागे शोधत आहेत. यापैकी कोणीही शाळा सुरू होणार, त्या कशा होणार, विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी असेल, याबद्दल ब्र ही काढत नाहीत. तेव्हा शाळा व्यवस्थापन, पालक संघटना व पालकांनी स्वतःच आपल्या पाल्याची, विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांना जपायला हवे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.