Swachhata Hi Seva Dainik Gomantak
ब्लॉग

Swachhata Hi Seva: गांधीजी आणि स्वच्छता मोहीम

स्वच्छतेला आपण ज्या दृष्टिकोनातून पाहू, त्याच दृष्टिकोनातून आपला समाजही पाहतो.

दैनिक गोमन्तक

सुशीला सावंत मेंडीस

दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आली की, आम्हांला स्वच्छता आठवू लागते. त्याआधी किमान महात्मा गांधींच्या पुतळ्याला तरी स्वच्छ ठेवावे, हे आमच्या मनातही येत नाही.

गांधीजींनी स्वच्छतेसाठी अथक प्रयत्न केले, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला तेवढ्यापुरतेच मर्यादित ठेवायचे का?

‘स्वच्छता स्वच्छता स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाची आहे’, असे गांधीजी म्हणत. स्वच्छतेला त्यांनी आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवले. सर्वांसाठी संपूर्ण स्वच्छता हे त्यांचे स्वप्न होते. शारीरिक आरोग्य आणि निरामय वातावरणासाठी स्वच्छता सर्वांत महत्त्वाची आहे.

गांधीजींसाठी स्वच्छता ही ईश्वरभक्तीपेक्षाही श्रेष्ठ होती. १७७८साली जॉन वेस्ली यांनी स्वच्छतेशिवाय ईश्वरकृपा होणार नाही, असे मत मांडले. ‘स्वच्छ मन अस्वच्छ देहात राहू शकत नाही आणि स्वच्छ शरीर अस्वच्छ शहरात राहू शकत नाही’, असा विचार गांधीजींनी मांडला.

’एक तारीख- एक घंटा’ हा उपक्रम महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वच्छता पखवाडा-स्वच्छता ही सेवा २०२३’योजनेचा एक भाग म्हणून आज देशभरात राबवण्यात येणार आहे. सर्व लोकांच्या नेतृत्वाखालील मोठ्या स्वच्छता मोहिमेचा हा देशव्यापी कार्यक्रम गांधीजयंतीच्या पूर्वसंध्येला होणार आहे.

आपला परिसर, आपला देश स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ ही भारत सरकारने दि. २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू केलेली देशव्यापी मोहीम आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १४५व्या जयंतीदिनी ही राष्ट्रीय चळवळ देशभर सुरू झाली.

भारत सरकारच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९५४मध्ये पहिला औपचारिक स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्यात आला. १९८२मध्ये, राष्ट्रीय स्वच्छता कव्हरेज फक्त २% होते. यानंतर १९८६मध्ये केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम (सीआरएसपी) राबवण्यात आला.

‘स्वच्छ भारत अभियान’ हा भारत सरकारचा सर्वांत महत्त्वाकांक्षी स्वच्छता उपक्रम आहे. स्वच्छ भारत मिशन ‘राजकारणाच्या पलीकडे’ असून ते ‘देशभक्ती’ने प्रेरित आहे. गांधीजींनी पाहिलेले ‘स्वच्छ व विकसित भारता’चे स्वप्न ही यामागची प्रेरणा आहे.

काही दिवसांपूर्वी मला राष्ट्रीय सामाजिक सेवा प्रभारी प्रमुखांनी, माझ्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्याची विनंती केली होती. ही प्रतिज्ञा प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात घेतली जाते आणि त्यात अतिशय अर्थपूर्ण शब्द आहेत:

‘मी कचरा टाकणार नाही आणि इतरांनाही कचरा टाकू देणार नाही. मी स्वत:, माझे कुटुंब, माझा परिसर, माझे गाव आणि माझ्या कामाच्या ठिकाणी स्वच्छतेचा आग्रह धरेन. जगात देश स्वच्छ दिसतात, कारण त्यांचे नागरिक कचरा टाकत नाहीत किंवा कचरा होऊ देत नाहीत, असा माझा विश्वास आहे’.

‘गावातील टाक्यांचा वापर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी केला जातो. अनेक गावातील टाक्याही गुरेढोरे वापरतात. म्हशी अनेकदा त्यात डुंबताना दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गावातील टाक्यांचा असा दुरुपयोग होऊनही, गावे साथीच्या रोगाने नष्ट झालेली नाहीत.

वैद्यकीय पुरावे पाहिल्यास असे दिसते की, गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठ्याचा अभाव, हा गावकऱ्यांना होणाऱ्या अनेक आजारांसाठी कारणीभूत आहे’, असे परखड विचार गांधीजींनी दि. ८ फेब्रुवारी १९३५ रोजी ’हरिजन’मध्ये लिहिलेल्या लेखात मांडूनही समाजात फारसा बदल झालेला नाही.

गांधीजींना अस्पृश्यतेची प्रथा आपल्या समाजातून काढून टाकायची होती आणि लोकांनी एकमेकांचा आदर करावा, अशीही त्यांची इच्छा होती. अशा प्रकारे, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी स्वत: स्वच्छता करण्याचे काम सुरू केले, जेणेकरून इतरांनी त्यांच्याकडून शिकावे.

ज्यांना एकेकाळी ‘अस्पृश्य’ म्हटले जात असे, अशा हिंदू जातिव्यवस्थेतील सर्वांत खालच्या स्तरातील लोकांना मैला वाहण्याच्या कामावर ठेवणाऱ्या प्रथेचा गांधींनी वारंवार तीव्र निषेध केला.

आपली कोरडी शौचालये आपणच हाताने स्वच्छ करावीत किंवा गावकऱ्यांनी स्वत:च आपल्या शेतातील कचरा गोळा करावा, असे आवाहन त्यांनी देशवासीांना केले.

गांधींनी १९१९पासून संपादित केलेल्या ‘नवजीवन’ या साप्ताहिक वृत्तपत्राच्या मे १९२५च्या एका आवृत्तीत त्यांनी शौचालये स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व लिहिले. ‘मी ३५ वर्षांपूर्वी शिकलो की शौचालय ही ड्रॉइंग रूमइतकी स्वच्छ असावी.

मी हे पाश्चिमात्य देशांत शिकलो’. गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी सफाई कामगाराचे काम आलटून पालटून केले. त्यांनी खंदक शौचालये सुरू केली. गांधींनी अभिमानाने सर्व पाहुण्यांना हा नवा प्रयोग दाखवला.

त्यामुळे, आपसूकच श्रीमंत आणि गरीब, नेते आणि कामगार, भारतीय आणि परदेशी या सर्वांना या शौचालयांचा वापर करावा लागला. या प्रयोगाने सनातनी सहकारी आणि आश्रमातील महिलांच्या मनातून हळूहळू सफाईविषयीची घृणा नष्ट होऊन, सफाई करणाऱ्यांविषयी आदरभाव वाढीस लागला.

स्वच्छतेच्या अनेक घोषणा गांधीजींनी दिल्या होत्या, ज्या आपण अंमलात आणल्या पाहिजेत आणि त्यांचा पुन्हा उद्घोष जनमानसात रुजवला पाहिजे.

‘घाणेरडे वातावरण रोग आणि दुःख वाढवते’, ‘स्वच्छ परिसर आरोग्य आणि आनंद निर्माण करतो’, ‘स्वच्छता हे गरिबांचे शस्त्र आहे’, ‘सर्व सद्गुणांचे इमले ज्यावर उभे राहतात, तो पाया म्हणजे स्वच्छता’, ‘तुमचा परिसर स्वच्छ ठेवल्यास हे जग राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनेल’, अशा अनेक घोषणा गावागावांत निनादत होत्या.

प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट गेल्या पाच वर्षांत (२०१४-२०१९) स्वच्छ भारत अभियानने गाठले आहे. २०१४मध्ये असलेली ग्रामीण भारतातील शौचालयांची व्याप्ती ३९% वरून २०१९-२०मध्ये १००% पर्यंत वाढली आहे.

स्वच्छ भारत मिशनने शौचालयात जाणे आणि त्याच्या वापरासंदर्भात लाखो लोकांचे वर्तन बदलले आहे. एका बाजूने हे सत्य असले तरी २०२३च्या उत्तरार्धात पाऊल टाकताना आम्ही कचरा टाकणे थांबवलेले नाही.

आपल्या नद्यांमधील पाणी विषारी झाले आहे आणि आपण श्वास घेत असलेली हवा प्रचंड प्रदूषित आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे! जरी बेकायदेशीर असले तरी माणसांनी मैला वाहणे भारतात अद्याप सुरूच आहे.

‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा उद्देश २ ऑक्टोबर २०१९पर्यंत संपूर्ण भारत पूर्णपणे स्वच्छ करण्याचा होता. स्वच्छता हा तारीख देऊन पूर्ण करण्याचा कार्यक्रम नाही. ती कायम व नित्यनेमाने करावीच लागते.

स्वच्छ मन, स्वच्छ शरीर आणि स्वच्छ परिसर अशी तीन टप्प्यांतील स्वच्छतेची कल्पना गांधीजींनी मांडली होती. स्वच्छतेला आपण ज्या दृष्टिकोनातून पाहू, त्याच दृष्टिकोनातून आपला समाजही पाहतो.

त्यामुळेच, सामुदायिक सहभागातून स्वच्छता साध्य करण्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. या महान राष्ट्राचे नागरिक आणि बापूजींच्या वारशाचे वारसदार या नात्याने, आपल्या राष्ट्रपित्याला आदरपूर्वक भेट देण्यासारखे आपल्याजवळ बरेच काही आहे.

स्त्री-पुरुष समानतेची, अस्पृश्यतेविरुद्धच्या लढाईची, हिंदू मुस्लिम एकात्मतेची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक राष्ट्र म्हणून आपले सामूहिक अस्तित्व अबाधित ठेवण्याची, आपले शरीर, मन आणि आत्मा स्वच्छ ठेवण्याची भेट आपण त्यांच्या जयंतीदिनी त्यांना देऊ शकतो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT