Dainik Gomantak
ब्लॉग

सुर्लाची बाराजणांची राय

जैवविविधता कायदा २००० द्वारे सुर्लातील जोशीभाट येथील सर्वेक्रमांक ५७/१जागेतल्या देवराईला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. जेथे जैविक संपदेच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलुचे दर्शन घडते आणि पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रात त्या जागेचा समावेश करून तेथील नैसर्गिक संपत्तीच्या समस्त घटकांचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली तालुक्यातील मांडवी नदीच्या उजव्या काठावरती वसलेला सुर्ला गाव एकेकाळी जंगल समृध्द होता. येथील जमीन सुपीक असल्याने आणि बारामाही वाहणारा नाला गावातून वाहत असल्याने, शेती- बागायतीला आवश्‍यक जलसिंचनाची सुविधा लाभलेली होती.

त्यामुळे हा गाव सुजलाम्, सुफलाम् होता आणि त्यामुळे गोव्याच्या विविध भागांतूनच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातून इथे नानाविविध जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदाने रहात होते. देवी नवदुर्गा आणि सिध्देश्‍वराच्या कृपासावलीत वावरणारा हा गाव पारंपारिक ज्ञानाचा वारसा मिरवत होता. कष्‍टकरी जातीजमातींबरोबर नृत्य, कला, नाट्य, साहित्य, संस्कृती याविषयी आवड असणाऱ्यांचे इथे वास्तव होते.

कृषींचा समृध्द वारसा सुर्लाला पूर्वापार लाभल्याकारणाने इथल्या लोकमानसाची निसर्ग आणि पर्यावरणात वावरणाऱ्या देवदेवतांवरती अमाप श्रध्दा होती. कोंतीनच्या आजोबाची राय, नारायणभाटातली राय, म्हारदाण्याची राय, बाराजणाची राय... अशा नावांनी परिचित असलेल्या देवराया इथल्या लोकमानसाने शेती, बागायतीचा व्यवसाय करताना जैविक संपदेचा वारसा मिरवणाऱ्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन आत्मीयतेनं केले होते.

देवरायांची लोकपरंपरा सुर्ला गावच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारश्‍याची प्रचिती आणून देतात. इथल्या देवरायांपैकी बाराजणांची म्हणजेच पूर्वातली देवराई जैविक संपदेच्या वैविध्याने परिपूर्ण असून, गोवा राज्यातले पहिले वारसा स्थळ म्हणून तिला सन्मान लाभलेला आहे. ७३०० चौरसमीटर क्षेत्रफळात वसलेल्या या देवराईची मालकी श्री वेताळ देवस्थानाकडे आहे.

दरवर्षी विजयादशमीच्या पर्वदिनी ढोल-ताशांच्या निनादात जेव्हा तरंगामेळ मिरवणूकीने रस्त्यातून जातात, तेव्हा न चुकता भाविक मानवंदना देण्यासाठी इथे थांबतात. सुर्ल गावात असलेले सिध्देश्‍वर देवस्थान, शेकडो वर्षांपासून भाविकांचे श्रध्दास्थान असून, या गावात भूताखेतांचा अधिपती म्हणून वावरणारा बेताळ इथल्या लोकांना मनःस्ताप देत होता आणि त्याच्याविषयी भीतीयुक्त दरारा त्यांच्यात होता. सिध्देश्‍वर देवाकडे भाविक दरदिवशी बेताळासंदर्भात तक्रारी घेऊन जायचे.

एकदिवस दक्षिण गोव्याच्या एका टोकाला वसलेल्या काणकोण महालातून तेथील कष्टकरी आदिवासी समाज आपणाचे आराध्य दैवत मल्लिकार्जूनासह सुर्लात आले आणि हिरव्यागार शेताभाटांनी नटलेल्या गावाचे वैभव पाहून इथेच कायमस्‍वरुपी रहाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मल्लिकार्जून देवाने जेव्हा सिध्देश्‍वराकडे आपणास स्थायिक होण्यास जागा मागितली तेव्हा त्याने बेताळाच्या त्रासापासून सुर्लाला मुक्त करण्यास सांगितले. आणि त्याबदल्यात गावाच्या कामकाजानुसार त्याला प्रधानपद देण्याचे आश्‍वासन दिले.

मल्लिकार्जूनाने बेताळाच्या आवडीनिवडीचा अभ्यास करून, त्याला विशेष आवडणाऱ्या रसबाळ्या केळ्याचा पिकलेला घड आणला. त्याला घडाला पाहताच बेताळाला त्याचे भक्षण करण्याची इच्छा झाली तेव्हा मल्लिकार्जूनाने तो घड एका खोल विहिरीत ठेवला आणि बेताळाला केळी पाहिजे तर त्याला हात न लावता, तोंडाने खाण्याची अट समोर ठेवली.

पिवळ्याधमक केळ्यांचा आस्वाद घेण्यासाठी बेताळाने मागचा पुढचा विचार केला नाही. तो विहिरीच्या तळाकडे जाऊन पिकलेली केळी खाण्यात मग्न झाला. त्याचवेळेला मल्लिकार्जूनाने त्या विहिरीच्या मुखावरती महाकाय दगड ठेऊन, बेताळाला जेरबंद केला.

त्या दिवसापासून सिध्देश्र्वर राजा आणि मल्लिकार्जूनदेव प्रधान म्हणून सुर्लात राहू लागला आणि बेताळाच्या एकंदर आतंकापासून लोकांची मुक्तता झाली. जेरबंद केलेल्या बेताळाचे वास्तव्य पूर्वातल्या देवराईत असल्याकारणाने आज ही दुपारी, तिन्हीसांजेला आणि रात्री या देवराईतून सहसा कोणी जाण्याचे धाडस करत नसे. विहिरीचे तोंड भल्या मोठ्या दगडाने बंदिस्त केलेले असताना देखील बेताळाविषयीचा दरारा आजही लोकांत असून, त्यामुळेच या देवराईचे इथल्या लोकमानसाने पावित्र्य जपलेले आहे.

जेथे पूर्वी विहिरीची जागा होती, तेथे दगडावरती कोरलेल्या दोन पावलांच्या मुद्रा असून भाविकांनी त्यांचा संबंध बेताळाशी जोडलेला आहे.या राईत जाताना वाटेवरती जांभ्या दगडात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या देवराईत पूर्वी पायात चप्पले घालून भाविक जात नसत. तसेच थुंकण्यास, लघवी करण्यास इथे सक्त मनाई आहे.

या देवराईचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न पूर्वीच्या काळीभाविक श्रध्दापूर्वक करायचे. देवराईशी संलग्न शेतजमीन असून, दरवर्षी शेत कापणी झाल्यानंतर इथे खळ नावाचा विधी केला जायचा. फणसाच्या सावलीत शेतकरी एकत्र येऊन नव्या धान्यांपासून शिजवलेले अन्न मोठ्या आवडीने जपतात. खळलोकविधीची ही परंपरा पूर्वातल्या रायच्या शेजारी संपन्न होत असते.

या देवराईत माडत, किंदळ, करमल, रान, आंबाडा अशी जंगली वृक्षसंपदा आहे, त्याचप्रमाणे पारंपारिक वनौषधी उपयुक्त वनस्पती, झुडपे, वेली आहेत. पानगळतीच्या वृक्षवनस्पतींच्या नानाविविध प्रजातींचे वैभव या देवराईत होते. आणि त्यामुळे गळलेल्या पानाचा खच वाळवीसाठी खाद्यान्न ठरायचे. वाळवीमुळे देवराईत वारूळ असून, पावसाळ्यात रोयण अळम्याची पैदासी होत असते.

जैवविविधता कायदा २००० द्वारे सुर्लातील जोशीभाट येथील सर्वेक्रमांक ५७/१जागेतल्या देवराईला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. जेथे जैविक संपदेच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलुचे दर्शन घडते आणि पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रात त्या जागेचा समावेश करून तेथील नैसर्गिक संपत्तीच्या समस्त घटकांचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते.

सुर्ला गावात लोहखनिजाचे साठे प्राचीन काळापासून तेथील भूगर्भात असल्याकारणाने, पोर्तुगीज अमदानीत इथे खनिज उत्खननाला प्रारंभ झाला. गोवा मुक्तीनंतर लोहखनिजाच्या लालसेपायी बेधुंदपणे जे उत्खनन करण्यात आले, त्यामुळे येथील शेती, बागायतीच्या क्षेत्राबरोबर वनसंपदेच्या वारेमाप नाश करण्यात आला. लोहखनिजासाठी गावातल्या सुपिक, सुजलाम् जमिनीचा विध्वंस करण्यात आलेला आहे.

त्यामुळे अशा पार्श्‍वभूमीवरती पूर्वातल्या देवराईला वारसा स्थळाचा सन्मान लाभून, वर्तमान आणि भविष्यात इथे हाती घेतल्या जाणाऱ्या खनिज उत्खननावरती कायद्याने प्रतिबंध आलेले आहे. नैसर्गिक वारसास्थळ म्हणून ही देवराई अधिसूचित झाल्याने, त्यामुळे वृक्षवेली, पशुपक्षी, कृमीकीटक अशा जैविकसंपदेच्या विविध घटकांना नैसर्गिक अधिवास हक्काचा लाभलेला आहे.

गोवा राज्यातले जैवविविधतेसाठी राखून ठेवलेले हे पहिले नैसर्गिक वारसा स्थळ असून त्याला शेकडो वर्षांचा इतिहास आणि संस्कृतीची परंपरा लाभलेली आहे. लोहखनिजाच्या हवा, ध्वनी, जल, मृदा प्रदुषणाची शिकार ठरलेल्या सुर्ला गावातली ही देवराई इथल्या लोकमानसाच्या श्रध्दा, भक्तीचे तेजस्वी संचित आहे. या देवराईच्या संवर्धन, संरक्षणाद्वारे जैविक संपदेच्या समृद्‍ध स्थळाला राज्य सन्मानच लाभलेला आहे.

लोहखनिजासाठी गावातल्या सुपिक, सुजलाम् जमिनीचा विध्वंस करण्यात आलेला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT