Sizzler Dainik Gomantak
ब्लॉग

चटपटीत सिझलर्स

पणजीत चांगलं ''सिझलर'' कुठे मिळतं? याच्या शोधात होते. फक्त ''सिझलर्स'' मिळतील अशी ''ब्रँडेड'' रेस्टोरंट एकेकाळी पणजीत करंझाळे भागात होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास'' अशी मराठीत म्हण आहे आणि या म्हणीचा प्रत्यय आपण सध्याच्या तापलेल्या दिवसात घेत आहोत.

मोठ्या उत्साहात खूप काही करावंसं वाटणारा पण या रणरणत्या वातावरणात आपल्या उत्साहावर, उल्हासावर पाणी घालणारा म्हणजेच आपले मनसुबे अयशस्वी करणारा असा हा फाल्गुन महिना. ऋतूंनुसार आहाराचा विचार करताना या महिन्यात अधिकाधिक फळं खाल्ली पाहिजेत असं म्हणतात.

बाजारात देखील एक चक्कर मारली तर हा फळांचाच काळ आहे हे जाणवतं. डाळिंब, चिक्कू, पेरू, अननस हि फळं असतात पण खास याच हंगामात आंबा, फणस, कलिंगड, कोकम हे जास्त भाव खाऊन जातात.

या दिवसात दुपारच्या उन्हाच्या तिरपेवर भरपूर पाणी पिणं आणि ताजी रसाळ फळं खाणं हाच पोटाला शांत ठेवणारा उपाय वाटू लागतो. पण जसा उन्हाचा जाळ ओकणारा सूर्य अस्ताला जाऊ लागतो तसं काहीतरी चटपटीत खावंसं वाटू लागतं. हेच तर या फाल्गुन महिन्याचं वैशिष्ट्य आहे. अशा दिवसात ''वन डिश मील'' सारखा पर्याय जास्त बारा वाटतो. ''वन डिश मील'' म्हणलं कि ''सिझलर्स''ची आठवण येते.

पणजीत सिझलर्सचा शोध

पणजीत चांगलं ''सिझलर'' कुठे मिळतं? याच्या शोधात होते. फक्त ''सिझलर्स'' मिळतील अशी ''ब्रँडेड'' रेस्टोरंट एकेकाळी पणजीत करंझाळे भागात होती. पण ती देखील बंद पडली. कोणत्यातरी वेगळ्याच पदार्थासाठी ओळख असणाऱ्या रेस्टोरंटच्या मेनूकार्डवर ''सिझलर्स'' असणं वेगळं आणि फक्त तऱ्हेतऱ्हेची सिझलर्सचं मेनूकार्डवर असणं वेगळं. अशा फक्त तऱ्हेतऱ्हेची सिझलर्स मिळणाऱ्या रेस्टोरंटची पणजीत उणीव आहे. कदाचित आपल्या मासेखाऊ मंडळींचा सिझलर प्रकारावर अजून म्हणावा तसा ''जीव'' जडला नाही म्हणून हा खाद्यप्रकार उपेक्षित राहिलाय कि काय असं उगाचंच वाटतं. महाविद्यालयीन काळात कधीतरी पुण्यातल्या कुठल्याशा रेस्टोरंटमध्ये जाणं झालं होतं.

तेव्हा रेस्टोरंटमध्ये जाण्यासाठी निमित्त लागायचं. असंच एका रेस्टोरंटमध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलो असता वेटर मोठ्या आदबीनं हातावर ताव्यासारख्या तापलेल्या चपट्या थाळीतून धूर निघणारा आणि त्यासोबत ''चुर्रर्र... '' आवाज देखील येणारा पदार्थ घेऊन आला. रेस्टोरंटमध्ये असलेले सर्वजण आपल्या समोरचा पदार्थ सोडून हा काय आता प्रकार म्हणून बघू लागले. सूर्यफूल जसं मोठा ''आ'' करून सूर्याच्या दिशेनं बघत असतं.

तसं त्या रेस्टोरंटमधले सर्वजण हातावर सिझलरचा तवा तोलून धरणाऱ्या त्या वेटरकडे आणि मग ज्या टेबलवर सिझलर मागवलं होतं त्या टेबलकडे काहीजण उत्सुकतेनं तर काही तुच्छतेनं बघू लागले. ''काय बाई हे सगळीकडे धूर पसरवून यांना असलं खायला कसं आवडतं?'' अशी काहींची प्रतिक्रिया असते तर रेस्टोरंटच्या गर्दीत ''छे! सिझलर मागवता आलं असतं उगाच डोसा मागवला'' असं हळहळत बघणारा एक चेहरा दिसतो.

अनेक पदार्थांच्या भाऊगर्दीत सिझलरसारखा पदार्थ भाव खातोच. आम्ही देखील कायम डोसावाल्या ''कॅटेगरीत'' अडकणारे. दोन वर्षांपूर्वी पणजीतल्या नेवगीनगर भागातून जात असताना ''द फिश कॅफे'' नावाचं रेस्टोरंट नजरेस पडलं. नावावरून हे मासळीसाठी प्रसिद्ध असणार हे लक्षात येत होतंच पण तिथं जाताच हे रेस्टोरंट ''सिझलर''साठी देखील प्रसिद्ध आहे हे समजलं. इतके दिवस ज्याचा शोध घेत होते तेच अचानक असं समोर आलं. इथं गेल्यावर मेनूकार्ड बघायची गरज पडली नाही.

ते न बघताच आम्ही सिझलर ऑर्डर केले. एक चिकन सिझलर आणि एक फिश सिझलर. मी यापूर्वी कायम ''व्हेज सिझलर'' खाल्लं होतं. इथं ''फिश सिझलर'' खाऊन बघा असा इथल्या शेफचा सल्ला होता आणि खरोखरीच हे बेस्ट सिझलर होतं. पण करोनाच्या काळात ''द फिश कॅफे'' बंद पडलं आणि परत सिझलर खायला मिळालं नाही. पुन्हा चांगल्या सिझलरचा शोध सुरु झाला जो पणजीतल्या ''टेक्सास रेस्टोरंट अँड बार'' पाशी येऊन थांबला. पणजीत आझाद मैदान जवळ ''टेक्सास रेस्टोरंट आणि बार'' आहे.

इथं देखील आम्ही मासळी खायला गेलो होतो पण इथल्या शेफने ''सिझलर''ची प्रशंसा केली आणि आमचा खाण्याचा बेत बदलला. टेक्सासमध्ये उत्तम ''फिश सिझलर्स'' मिळतात. भरलेल्या पापलेटचं, प्रॉन्सचं, खेकड्याचं सिझलर आणि शिवाय सर्व सीफूडचं एकत्रित सिझलर इथं मिळतं. चिकन खाणारे खवय्ये असतील तर चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारांचं सिझलर बनवून देतात.

सिझलर्सचा इतिहास

सिझलर हि मूळ जपानी पाककृती. ''टेप्प्यान्याकी'' नावाचा जपानी पदार्थ हा सिझलरचा उगम असलेला पदार्थ आहे. मांस, भाज्या गरम तव्यावर भाजून त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, सॉस घालून खायला देण्याची पद्धत. दुसऱ्या महायुद्धानंतर हि आगळीवेगळी शैली अमेरिकन लोकांना आवडली आणि कॅलिफोर्नियात १९५०च्या दरम्यान ''सिझलर्स'' नावानं रेस्टोरंट सुरु झालं. अमेरिका पाठोपाठ सिझलर्स भारतात प्रसिद्ध झालं.

याच काळात फिरोझ इराणी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी सिझलरची चव चाखली. त्यांना हे इतकं आवडलं कि फिरोज इराणी यांनी १९६३ ला मुंबईत एक्सेलसियर सिनेमा जवळ ''सिझलर'' नावाने रेस्टॉरंट सुरु केलं होतं. फिरोज इराणी याची पत्नी जपानी होती. सिझलरची मूळ पाककृती जपानी असल्यामुळे त्यांना मुंबईत सिझलर्स सुरु करताना अडचण आली नाही.

यांच्याच मुलाने १९७१ साली ''द प्लेस - टच द सिझलर'' नावाचं पुण्यात रेस्टॉरंट सुरु केलं. पुण्यातलं पहिलं सिझलर देणार रेस्टॉरंट म्हणून ओळखलं जातं. पुणे कॅम्प भागात वेस्टएंड सिनेमा थिएटर शेजारी हे आजही तिथं आहे.

भारतात मिळणाऱ्या सिझलर्सला अस्सल भारतीय मसाल्यांची चव आहे. ज्यामुळे ते इतर सिझलर्सपेक्षा वेगळे ठरतात. पुण्यात आता कोबे सिझलर्स, याना सिझलर्स यासारखी असंख्य रेस्टोरंटस आहेत जे फक्त सिझलर्ससाठी प्रसिद्ध आहेत.

पण प्रभात रोडवरील ''दर्शन रेस्टोरंट'' सिझलर्ससाठी माझं आवडतं रेस्टोरंट. सिझलर हे ''वन डीश मील'' या प्रकारात मोडतं. धातूच्या किंवा दगडाच्या जाड प्लेटवर भाज्या, मांस, काहीवेळा भात तर काहीवेळा कटलेट शिजवलं जातं.

या गरम प्लेटवर ठेवलेल्या पदार्थांचा येणारा ''सिझल सारखा आवाज म्हणून याला ''सिझलर'' असं म्हणलं जातं. जपानचा पदार्थ अमेरिकेत गेला आणि त्याच काळात फिरोज इराणींमुळे भारतात ते देखील पहिल्यांदा मुंबईमध्ये रुजला. जपान इतकंच भारतातलं सिझलर्स चविष्ट होण्यामागे इथल्या स्थानिक शेफची निर्मितीशीलता कारणीभूत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT