प्रसन्न शिवराम बर्वे
Attributes of religion धर्म ही व्यापक संकल्पना असल्यामुळे त्याची सर्वसमावेशक अशी एकच एक व्याख्या करणे शक्य नाही. संदर्भानुरूप धर्माची व्याख्या केली जाते. जरी असे असले तरी पुरुषार्थ चतुष्टयातील ‘धर्म’ हे पहिले मूल्य आणि त्याविषयीचे गैरसमज याविषयी आपण मागील लेखात विचार केला.
या पुरुषार्थ चतुष्टयाचा विचार करताना धर्म याचा अर्थ कर्तव्यपालन असा ढोबळमानाने होतो. पण तेवढ्यापुरतीच त्याची व्याप्ती मर्यादित नाही.
धर्म म्हणजे नेमके काय, हा फार व्यापक विषय असला तरी या पुरुषार्थ चतुष्टयाच्या संदर्भात धार्मिक कुणाला म्हणावे यासंबंधी उपनिषदांत व अनेक स्मृतींमध्ये उल्लेख आढळतात. ‘माणसाने माणूस म्हणून कसे वागावे याचे नियम’, असे साध्या पद्धतीने वर्णन करता येईल.
आचरणाचे नियम, असेही आपण म्हणू शकतो. पण, बदलत्या काळानुसार, दर्शन, पंथ किंवा मतानुसार याचा क्रम किंवा स्वरूप बदलत जाते. आपण समाजात कसे वागावे, याचे संकेत प्रत्येक पिढीत थोडेथोडे बदलत जातात.
तसे ते बदलणेही आवश्यक असते. तरी त्याचा मूळ गाभा तसाच राहतो. जैन, बौद्ध, शैव, शाक्त आणि अनेक स्मृतींमध्येही आपण पाहिल्यास हे बदल जाणवतात.
साधारणपणे, धृती (धैर्य/स्थिरता), क्षमा, दम(मनोनिग्रह) , अस्तेय, शुचिता, इंद्रियनिग्रह, धी (ज्ञान), विद्या, सत्य, अक्रोध ही दहा लक्षणे ज्याच्यामध्ये आहेत तो धार्मिक. धर्माचे पालन करायचे असल्यास या दहा लक्षणांचे आचरण आपणास आयुष्यात करावे लागेल.
धृती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत न घाबरता, विचलित न होता, स्थिर राहून संकटाला धैर्याने सामोरे जाणे. हे जसे बाहेरील गोष्टींस लागू पडते तसे स्वत:साठी व मनालाही लागू पडते.
वडिलांनी मोबाइल दिला नाही म्हणून मुलाने जीव दिल्याचे वाचतो, तेव्हा मुलांना आपण हे शिकवत नाही याचा त्रास होतो.
त्यांनी मागायच्या आधी आपण सगळेच हजर करतो. नकार पचवणे, परिस्थिती समजून घेणे व जगण्यावर नितांत प्रेम करणे आपण मुलांना शिकवतच नाही.
क्षमा हा मोठा गुण आहे. ‘करण्या दुसऱ्यास क्षमा, भगवन् माणूस व्हावे लागते’, असे वा. वा. पाटणकर म्हणतात ते खरेच आहे. माणूस चुकू शकतो हे आपण (स्वत:ला सोडून) इतरांच्या बाबतीत अजिबात सहन करत नाही.
एक मूल, नवरा व बायको अशा तिघांच्याच संसारात दररोज भांडणे होतात, कुणीच माघार घ्यायला तयार होत नाही. हेतू पाहून चुकीला क्षमा करीत नाही तेव्हा आपण अधर्मच करत असतो.
दम याचा अर्थ वाईट विचारांवर, विकृतीवर नियंत्रण मिळवणे. खाली घसरणे ही प्रकृती आहे. आपण एक नासका आंबा इतर आंब्यासोबत ठेवल्यास इतर सर्व आंबे नासतात.
पण, इतर नासक्या आंब्यांसोबत एक चांगला आंबा ठेवला, तर ते नासके आंबे चांगले होत नाहीत, उलट चांगला आंबाही नासका होतो. स्वत:मधील दोषांना ओळखून त्यावर नियंत्रण ठेवणे (त्यांना दाबणे नव्हे), योग्य जागी त्यांचा निचरा करणे म्हणजे दम.
अस्तेय म्हणजे चोरी न करणे. अन्न, धान्य, धन यांची चोरी करू नये. न सांगता घेणे म्हणजे चोरीच. आपल्या देवाला घालायला फुले हवीत म्हणून सकाळी सकाळी चालायाला जाताना इतरांच्या घरासमोरील फुले तोडून आणणे हीसुद्धा चोरीच आहे.
हा अधर्मच आहे, भले मग कपाळाला गंध, गळ्यात तुळशीमाळ घातलेली असली तरी ती व्यक्ती धार्मिक नसून अधर्मी ठरते.
शौच म्हणजे शुचिता, शुद्धता. आंघोळ करणे, घर स्वच्छ ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे तो मलीन होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे शौच. याचबरोबरीने आपले मनही मलीन होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे शौच.
आपण अंतर्बाह्य शुद्ध असलो की, आपण धार्मिक आहोत. आपले घर स्वच्छ ठेवून इतरांच्या जागेत कचरा टाकणे हा अधर्मच.
कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांच्यावर ठेवलेले नियंत्रण म्हणजे इंद्रियनिग्रह. आपली इंद्रिये आपल्या ताब्यात असली पाहिजेत. वाट्टेल तसे वागणे योग्य नसून संयम ठेवणे आवश्यक आहे. आपण इंद्रियांच्या आधीन झालो आहोत. आयुष्यातील अनेक प्रश्न या संयामानेच सुटतात. संयम सुटला की, अनेक प्रश्न निर्माण होतात.
धी म्हणजे बुद्धी. इंद्रियांवर मनाचे स्वामित्व असते, मनावर बुद्धीचे. मन कायम संकल्प आणि विकल्प करत राहते. जी निश्चय करते ती बुद्धी. मन विचार करते, तर बुद्धी विवेक. विचारान्ती वेळेत कर्म करणे म्हणजे विवेक. त्यासाठी बुद्धीच लागते.
अनेक ऋषी मुनींनी, स्मृतीकारांनी विद्येचे अनेक प्रकार सांगितले आहे. तीन विद्यांपासून ते चौदा विद्यांपर्यंत हे प्रकार सांगितले आहेत. विद्येमुळे आपल्या आचरणात फरक पडतो. कुठल्याही विद्येत मिळवलेले प्रावीण्य व त्याचा तारतम्याने केलेला वापर हे धर्माचे लक्षण आहे.
सत्य म्हणजे खरेपणा, सच्चेपणा. आपद्धर्म वगळता कायम सत्य बोलावे, सत्य वागावे. सचोटी, प्रामाणिकपणा आणि सत्य यांचा कधीही त्याग करू नये. असत्य वागल्याचे परिणामही खोटेच होतात. आपले हेतू व कृती दोन्ही सत्यच असावीत.
क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. क्रोध सगळ्या गुणांवर पाणी फिरवतो. क्रोधावर नियंत्रण मिळवणे म्हणजे अक्रोध. रागावल्याने प्रश्न सुटत नाहीत. रागावणेसुद्धा इतरांच्या भले करण्याचे हेतूने त्यांच्यावर रागावणे असावे. त्यामागे लोभ असू नये.
ही दहा लक्षणे असणे म्हणजे आपण धार्मिक आहोत, असे म्हणायला हरकत नाही. यात कुठेही उपास्य देवतेविषयी काहीही नाही. साधा उल्लेखही नाही. देव आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपण पूजा वगैरे करण्याला धार्मिक कार्य म्हणतो, ते चुकीचे आहे.
त्याला ‘देवकार्य’ असा शब्द आहे. आपल्याकडे देव आणि धर्म वेगवेगळे असल्यामुळे आपण सहजपणे बोलतानाही ‘देवधर्म केला’, असे म्हणतो. या उलट, पंथापासून देवाला वेगळे करणे शक्य नाही.
शिव बाजूस काढला तर शैव पंथ राहणार नाही. तसेच अल्लाला बाजूला केल्यास इस्लाम शिल्लक राहणार नाही. पण देव बाजूस काढला तरी धर्म शिल्लक राहतो.
धर्माची ही लक्षणे पाहिल्यास असे लक्षात येते की, अगदी देवाचे अस्तित्व न मानणाराही धार्मिक असू शकतो आणि कायम देवदेव करणारा माणूस अधर्मी असू शकतो. नास्तिक धार्मिक असू शकतो आणि आस्तिक अधर्मी असू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.