Karma Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: गहना कर्मणो गति:

Kavya Powar

गीतेच्या अठरा अध्यायांपैकी नऊ अध्यायांमध्ये प्रामुख्याने कर्माचाच विस्ताराने विचार आहे. गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकात ‘गहना कर्मणो गति:’ संपूर्ण जगच कर्माधीन, कर्मावर चालते, त्या कर्माची गति(व्याप्ती) खूप गहन आहे, असे म्हटले आहे. पण, अगम्य, न कळणारी नाही. म्हणूनच कर्म जाणून घेणे आवश्यक आहे. कर्माचे ज्ञान होणे गरजेचे.

सोप्या भाषेत सांगायचे तर कृती, क्रिया म्हणजे कर्म आणि क्रियेची प्रतिक्रिया म्हणजे कर्माचे फळ किंवा दैव. दैव हेसुद्धा आपले कर्मच असते, वेगळे काही नाही. शास्त्रात प्रत्येक कृती किंवा क्रिया म्हणजे कर्म, असे म्हटलेले नाही.

काहीतरी मिळवण्याचा हेतू धरून व तसा संकल्प करून केलेली क्रिया, कृती म्हणजे कर्म. याचाच विस्तार पुढे विकर्म आणि अकर्म असा होतो. ‘वि’ हा उपसर्ग लागतो तेव्हा तो दोन अर्थांनी लावला जातो. एक विशेष या अर्थाने आणि दुसरा विपरीत किंवा वाम, वाईट अशा अर्थानेही वापर होतो. पण, इथे त्याचा विशेष असा अर्थ होतो. साधारणत: मन आणि बुद्धी एकत्र लावून केलेले कर्म म्हणजे विकर्म.

आपल्या अनेक क्रिया केवळ सवयीने घडत असतात. विशिष्ट लयीत हातपाय हलवत राहणे, अशी अनेकांना सवय असते. ही सवयीने घडलेली क्रिया म्हणजे कर्म नव्हे. ज्याला कर्म म्हटले जाते ती मिळवण्याच्या निश्चयाने केलेली कृतीही आपण मन लावून करत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूजा.

आपण विशिष्ट हेतू धरून पूजा करतो, पूजेचा संकल्पही करतो. पण, पूजा करताना मन देवाकडे, त्या पूजेत असायचे सोडून अन्यत्र कुठेतरी भटकत असते. परीक्षेत उत्तम गुण मिळावेत, इयत्ता उत्तीर्ण होता यावी, म्हणून आपण वर्गात शिक्षक काय शिकवतात ते ऐकत असतो.

पण, आपले मन त्यावेळेस क्रिकेटच्या मैदानात असेल, तर काय शिकवले हे कळणार नाही. अभ्यास करण्याचा फक्त देखावा होतो, अभ्यास होतच नाही. नेमके तेच आपले आयुष्यभर घडत असते. इच्छा, हेतू प्रामाणिक असतात. पण, मन व बुद्धी लावून नेटकेपणाने प्रयत्न मात्र होत नाहीत. ते फक्त कर्म होते, विकर्म होत नाही.

कर्माकडून आपला प्रवास विकर्माकडे झाला पाहिजे. हेतू धरून, संकल्प करून, मन व बुद्धी यासह केलेल्या कर्माच्या फळाची आशा सोडणे म्हणजे अकर्म. कर्म विकर्मामध्ये आणि विकर्म अकर्मामध्ये ओतता आले पाहिजे. पण, हे लिहिणाबोलण्याइतके सोपे निश्चितच नाही. त्यातही महत्त्वाचा भाग म्हणजे जरी कर्मफलाची आशा सोडून कर्म केले तरी कर्मफल मिळायचे सुटत नाही. ते मिळतेच.

आपल्या हातून एखादी चूक घडली तर त्याची शिक्षा आपल्याला किती मिळावी, हेही आपणच ठरवतो. चूक जाहीर झाली व तिची जबाबदारी ढकलता येत नाही की आपण ती चूक स्वीकारतो, ‘नाही म्हणजे माझं चुकलंच. पण, म्हणून इतकं रागवायचं का माझ्यावर?’, असा प्रश्न आपण सहज विचारतो. त्यामागेही कर्माची, क्रियेची तीव्रता व त्यानुसार त्याची प्रतिक्रिया, कर्मफळ याची आपण अपेक्षा धरतो. ही अपेक्षा न धरता, जे कर्मफल मिळेल ते कोणतीही तक्रार न करता स्वीकारणे म्हणजे अकर्म.

कर्मफळाचा विचार करताना सामान्यत: ‘जशास तसे’, असा दृष्टिकोन ठेवला जातो. त्यातूनच चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते, असे आपण म्हणतो पण, ते योग्य नाही. कारण, कर्माचे फळ ‘जशास तसे’, असे नसून ‘जेवढ्यास तेवढे’ असे मिळते. आपल्या क्रियेची प्रतिक्रिया आपल्याला जेवढ्यास तेवढी व विरुद्ध दिशेने प्राप्त होत असते. ती आपण जशी करू तशीच असेल असे सांगता येत नाही. म्हणूनच चांगल्याचे फळ चांगलेच मिळते, हे तितकेसे खरे नाही.

मानवी मुंडक्यांचे मिनार रचणाऱ्या आक्रमकाला, ‘जशास तसे’ या न्यायाने कर्मफळ मिळत असेल, तर किती जन्म आपले मुंडके छाटून घ्यावे लागेल? पण, तेच त्याने शस्त्रक्रिया करून अनेकांचा जीव वाचवला असेल तर? जेवढे जीव घेतले तेवढे जीव वाचवले तर, वाचवणे हे त्याच्या जीव घेण्याच्या कर्माचे फल असू शकते. अर्थात, कुणी डॉक्टर, शल्यविशारद जीव वाचवत असेल तर लगेच, ‘याने मागल्या जन्मी कुणाचा तरी जीव घेतला असावा’, या निष्कर्षावर येणे चुकीचे ठरेल.

कर्म हे कर्मच असते. ते चांगलेही नसते आणि वाईटही नसते. तसेच त्यापासून मिळणारे फळही निरपेक्ष असते. आपण आपल्या चांगल्या वाइटाच्या, पाप पुण्याच्या सापेक्ष कल्पना त्याच्याशी जोडतो. काहीही न करता मिळणे किंवा कितीही सांभाळले तरी गमावणे म्हणजे दैव नव्हे. आपल्या कर्माचे फल किंवा क्रियेची झालेली प्रतिक्रिया म्हणजे दैव.

कर्म कुणालाच चुकले नाही. प्रत्येक कर्माला किंवा क्रियेला प्रतिक्रिया असतेच. आपण करत असलेल्या कर्माचे फल कमी कालावधीत म्हणजे हा जन्म असेपर्यंत मिळते त्याला ‘क्रियमाण’ म्हणतात. जन्म संपेपर्यंत मिळत नाही, साचून राहते ते ‘संचित’. हेच संचित पुढल्या जन्मी प्राप्त झाले की त्याला ‘प्रारब्ध’ म्हणतात.

कर्माची व्याप्ती प्रचंड आहे. जे काही सुख व दु:ख आपण उपभोगतो ते आपल्या कर्मानेच आपल्याला मिळत असते. आपण सुखी होणार की दु:खी, हे आपले कर्मच ठरवते. असे असेल तर एक प्रश्न इथे उभा राहतो; सगळे कर्मामुळेच मिळते तर मग देव हवा कशाला? याचा विचार आपण पुढील लेखात करू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT